‘भारत विकास परिषदे’च्या डोंबिवली शाखेचा लेखाजोखा

04 Jan 2023 12:03:43

भारत विकास परिषद


शिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि संस्कार या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत संस्था म्हणजे ‘भारत विकास परिषद.’ शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. तसेच मुंबई आणि परिसरात मोठ्या संख्येने मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत. त्यामुळे या मराठी शाळा सुरु राहाव्यात म्हणूनही ‘भारत विकास परिषदे’चे कार्य चालते. त्याचबरोबर मुलांना शुल्क भरण्यासाठी मदत करणे, शाळांना विविध पातळीवर साहाय्य करणे यासाठीही ‘भारत विकास परिषद’ सक्रियपणे कार्यरत आहे. तेव्हा, अशा या शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवून भरीव योगदान देणार्‍या संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
लै १९९९ मध्ये ‘भारत विकास परिषदे’ची स्थापना करण्यात आली. डोंबिवलीतील माधव जोशी, सुधीर जोगळेकर, जयंत कुलकर्णी, विनोद करंदीकर, दीपक नामजोशी या व अशा अनेक मान्यवर मंडळींनी परिषदेच्या डोंबिवली शाखेची स्थापना केली. त्यावेळी माधव जोशी हे संस्थापक-अध्यक्ष व सुधीर जोगळेकर हे संस्थापक-सचिव होते. सेवा, संपर्क, सहयोग, संस्कार आणि समर्पण या पंचसूत्रीवर संस्था आजही कार्यरत आहे.

‘भारत विकास परिषद’ ही देशव्यापी संघटना असून या संस्थेच्या देशभरात एकूण १४०० शाखा आहेत. प्रांतस्तरीय विभाग, विभागस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरही संस्था कार्यरत आहे. संस्थेतर्फे एखादे खेडेगाव दत्तक घेऊन व्यापक पातळीवर त्या गावाच्या विकासासाठी काम केले जाते. तसेच नैसर्गिक आपत्तीत देशव्यापी मदतीसाठीही ‘भारत विकास परिषदे’तर्फे पुढाकार घेतला जातो. ‘जयपूर फूट’चे ‘मॅन्युफॅक्चरिंग’ करून दिव्यांगांना त्याचे मोफत वाटप करण्याचा संस्थेचा उपक्रमही तितकाच कौतुकास्पद आहे. संस्थेच्या पनवेल शाखेच्या माध्यमातून सैनिकांना दरवर्षी २० हजार लाडू आणि फराळची पाकिटे पाठविली जातात.

कोकण प्रांतात ‘भारत विकास परिषदे’च्या एकूण १४ शाखा आहेत. वाशी, पेण, पनवेल, नवी मुंबई, कल्याण, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, ठाण्याला तीन शाखा, मुंबईत दादर अशा विविध ठिकाणी शाखा विखुरलेल्या आहेत. डोंबिवलीजवळ असलेल्या कुष्ठरोगांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना संस्थेतर्फे मदतीचा हात दिला जातो. त्याचबरोबर संस्थेच्या डोंबिवली शाखेतर्फे राष्ट्रीय समूहगान (हिंदी आणि संस्कृत) स्पर्धा, ‘भारत को जानो’ आणि ‘गुरूवंदन छात्र अभिनंदन’ या नियमित कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. आपण ज्या गावात राहतो, त्या परिसराची माहिती असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ‘डोंबिवली को जानो’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही संस्थेतर्फे आयोजन केले जाते.

त्याचबरोबर दरवर्षी आषाढी एकादशीला तुळशी रोपांच्या वितरणाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न होतो. हा कार्यक्रम म्हणजे संस्थेच्या दृष्टिकोनातून धार्मिक, आरोग्य आणि संस्कारांचाच भाग आहे. याशिवाय घर हेच संस्कार घडविणारे मुख्य स्थळ असल्याने कुटुंब प्रबोधनाचे विविध कार्यक्रमही संस्थेतर्फे आयोजित केले जातात. यामध्ये दासबोधाचे वाचन कसे करावे, यांसारख्या आध्यात्मिक कार्यक्रमांचाही समावेश आहे. ‘भारत विकास परिषदे’च्या डोंबिवली शाखेने ‘दिलासा’ नावाने दिव्यांग मुलांसाठी अनेक वर्षं शाळाही चालविली. राष्ट्रगीताच्या शताब्दीवर्षानिमित्त डोंबिवलीतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रगीत गायनाचाही अनोखा कार्यक्रम यशस्वी करुन दाखवला होता. हा उपक्रम डोंबिवलीतील तब्बल ४६ संस्थांनी एकत्रित येऊन हाती घेतला होता, हे विशेष. या उपक्रमात ‘भारत विकास परिषदे’चादेखील सिंहाचा वाटा होता. शाळकरी विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या पाच कडव्यांचे संपूर्ण जन-गण-मन हे राष्ट्रगीत डोंबिवलीतील हजारो नागरिकांसमोर गायले. असा हा राष्ट्रीय एकात्मतेचा एक आगळावेगळा उपक्रम. तसेच संस्थेच्यावतीने सुमारे १००हून अधिक दिव्यांग बंधूंना कृत्रिम हातपाय व ’कॅलिपर्स’ मोफत दिले, जेणेकरून ते त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य माणसांसारखे जगू शकतील.



भारत विकास परिषद
 
एवढ्यावरच ‘भारत विकास परिषदे’चे कार्य थांबलेले नाही. डोंबिवलीत ५५ ठिकाणी शोषखड्डे करून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा पर्यावरणपूरक उपक्रमही संस्थेने राबविला. हा शोषखड्डे प्रकल्प आप्पा जोशी यांनी पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष राबवून गावात स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण व घरांसाठी परसबागही उभी केली. यासाठी डोंबिवली शाखेने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. कसार्‍याजवळील विहीगाव या आदिवासी पाड्यावर विवेकानंद सेवा मंडळाचे सेवाकार्य सुरु होते. दरवर्षी तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. याठिकाणी ‘भारत विकास परिषदे’तर्फे जलसंधारण प्रकल्प राबवून गावातील तीन विहिरी दुरूस्त करण्यात आल्या व दोन नवीन बंधार्‍यांचे काम करून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही संस्थेने सोडविला.




हा प्रकल्प भारत विकास महाराष्ट्र कोस्टल प्रांत व डोंबिवली शाखा यांनी संयुक्तरीत्या यशस्वी केला. या कामाची प्रगती पाहून भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सदर गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले. ‘कुटुंब प्रबोधन’ उपक्रमांतर्गत शिक्षक व पालक यांचे संयुक्त शिबीरही आयोजित करण्यात आले व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. डोंबिवलीतील ‘स्त्रीशक्ती’, ‘लक्ष्मीनारायण ट्रस्ट’, डोंबिवलीतील ‘अभिवादन न्यास’ या प्रथितयश संस्थांबरोबर ‘भारत विकास परिषदे’तर्फे संयुक्तपणे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. देशभरात आणि परदेशातही गौरविलेल्या व डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवणार्‍या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ‘भारत विकास परिषद’तर्फे सक्रिय पातळीवर सहभाग घेतला जातो.


 
गरजूंना वेळोवेळी शैक्षणिक व वैद्यकीय आरक्षणासाठी आर्थिक मदतीसाठीही ‘भारत विकास परिषदे’ने आजवर मोलाचे योगदान दिले आहे. आदिवासींच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनातही संस्थेचा सक्रिय आर्थिक सहभाग असतो. कोरोना काळातील वैश्विक महामारीदरम्यान हातावर पोट असलेल्या सुमारे ७०० कुटुंबीयांना १५ दिवसांचा शिधा संस्थेतर्फे पुरविण्यात आला होता. तसेच आजारी व्यक्तींसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला गेला व त्यांना ‘ऑक्सिलेटर’ मशीनही दिले.
डोंबिवलीमधील १८०० गरजू विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क तसेच शाळेमध्ये आवश्यक असलेल्या बाबी ‘एकलव्य योजनें’तर्गत प्रवीण दुधे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली प्रदान करण्यात आल्या. संस्थेने सुरू केलेल्या ’एकलव्य शिक्षण साहाय्य योजना’ या उपक्रमात आजतागायत अंदाजे १,०४३ विद्यार्थ्यांसाठी रुपये दीड हजार प्रत्येकी याप्रमाणे निधी संकलित झाला आहे.




तसेच डोंबिवली शहरातील १६ मराठी माध्यमांच्या व क्षितीज मतिमंद मुलांच्या शाळेत विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय - विष्णुनगर, महात्मा गांधी विद्यालय - गणेशनगर, कोतकर विद्यालय, राधाबाई साठे माध्यामिक विद्यालय, डी. पी. म्हैसकर प्राथमिक विद्यालय, शांतीनगर विद्यालय, क्षितीज मतिमंद मुलांची शाळा, तोंडवळकर विद्यावर्धिनी, स्वामी विवेकानंद शाळेच्या गोपाळनगर, गणेश पथ, रामनगर या शाखेसह शिवाई बालक मंदिर, जिल्हा परिषद शाळा, बळवली यांना वस्तुरूपी मदत करण्यात आली आहे. या योजनेतून एकूण १५ लाख, ६५ हजार इतकी रक्कम मदत करण्यात येणार असून त्यातील ६ लाख ७१ हजार ४४५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम ही नजीकच्या काळात मदत स्वरूपात देण्यात येणार आहे.

 
‘अ‍ॅनिमियामुक्त भारत’ या योजनेअंतर्गत डोंबिवलीतील सातवी ते दहावी या वर्गातील जवळपास ३५० मुलींच्या रक्तातील ‘हिमोग्लोबिन’ तपासणी, तसेच गरजू विद्यार्थ्यांना औषधपाणी व उपचारार्थ सल्लाही ‘भारत विकास परिषदे’तर्फे दिला जातो. पूर्वांचल संकटाच्या वेळी सर्वाधिक आर्थिक सहभाग ‘भारत विकास परिषदे’च्या डोंबिवली शाखेतून नोंदवण्यात आला होता, हे इथे उल्लेखनीय. ‘ट्रेक क्षितीज’ संस्थेच्या आदिवासी पाड्यातील ‘पुस्तकालय’ प्रकल्पाला भरघोस मदत करण्यात आली होती. अशा प्रकारचे अनेक सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन ‘भारत विकास परिषदे’ची शाखा कार्यरत आहे.


‘भारत विकास परिषदे’च्या डोंबिवली शाखेचे सध्या १०० हून अधिक सभासद आहेत. डोंबिवली शाखेने कोकण प्रांताकरिता अनेक कार्यकर्ते दिले आहेत. डोंबिवली शाखेचे शरद माडीवाले हे कोकण प्रांताचे अध्यक्ष होते व विद्यमान कार्यकारी मंडळामध्ये विनोद करंदीकर हे उपाध्यक्षपद अगदी समर्थपणे सांभाळत आहेत. सध्या डोंबिवली शाखेची धुरा अध्यक्ष सीए जयंत फलके, सचिव संदीप केळकर, कोषाध्यक्ष संतोष प्रभू देसाई समर्थपणे सांभाळत आहेत. पुढील वर्षी डोंबिवली शाखा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. या संस्थेला त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...


भारत विकास परिषद

Powered By Sangraha 9.0