वैघई धरणाची कथा

31 Jan 2023 13:37:43
धरण बांधण्याचा सरकारचा निर्णय प्रशासन जेव्हा व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही तेव्हा होणारी सर्वांचीच अपरिहार्यता निर्वासित होणाऱ्या धरणग्रस्तांच्या पिढ्यापिढ्यांतून आयुष्यभर ठसठसत असते. १९५८ साली वैघई नदीवर धारण बांधून झाले. त्या धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच १० वर्षांचा काळ या कादंबरीतून पाहायला मिळतो. कादंबरी म्हणजे निव्वळ कल्पनाविस्तार असला तरी तथ्य आणि अनुभवांच्या आधारावर या काल्पनिक कथांचा डोलारा उभा असतो. कथा मरुभूमीची ही वैर मुत्तू यांनी लिहिलेली मूळ तामिळ कादंबरी कृषिप्रधान संस्कृतीतील समाज व्यवस्था, तामिळनाडूची भौगोलिक परिस्थिती, स्त्री व पुरुषांचे भावविश्व्, दारिद्र्य आणि तत्कालीन समाजाच्या श्रद्धा व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांवर भाष्य करते.
 
katha marubhumichi
 
कळ्ळीकाट्टु इतिहासस् असे मूळ पुस्तकाचे नाव श्रीप्रकाश अधिकारी यांनी मराठीत अनुवाद केल्यानंतर कथा मरुभूमीची असे ठेवले. हे धरण बांधताना वैरमुत्तू हे आपल्या आईचा हात धरून गुढगाभर पाण्यातून दिशाहीन होताना फक्त पाच वर्षांचे होते. काही पाहिलेलं, काही अनुभवलेलं, काही न सांगता कळलेलं असं सर्व मिश्रण या पुस्तकातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. वैरमुत्तु हे चित्रपट गीत लेखन करणारे प्रसिद्ध गीतकार आहेत तसेच ते कादंबरीकारही आहेत. त्यांच्या 'कळ्ळीकाट्टु इतिहासम्' या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट गीत लेखक म्हणून भारत सरकार कडून सात वेळा सन्मान पदके त्यांनी मिळविली आहेत. 1980 मध्ये प्रकाशित झालेल्या 'निळलघळ' या चित्रपटांतील 'पोन्मालै पोळूदया' चित्रपटासाठी सर्वप्रथम लिहीलेल्या गाण्यापासून सुरुवात करुन आजपर्यंत त्यांनी 7500 गाणी लिहीली आहेत. आत्तापर्यंत 11 कविता संग्रह, 10 कादंबऱ्या, 7 निबंध संग्रह, 2 प्रवासवर्णने, अनेक चित्रपट गीतांच्या संग्रह, अनेक भाषांतर, अनेक लघुकथा संग्रह अशी एकूण 38 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.
 
त्याचबरोबर या कादंबरीचा मराठी अनुवाद करणारे श्रीप्रकाश अधिकारी हे तमीळ, मराठी, इंग्रजी भाषांतून सातत्याने अनुवाद करीत आले आहेत. ह्यापूर्वी त्यांनी तीन तमीळ कादंबऱ्या, एक तमीळ कथासंग्रह आणि एक तमीळ कविता संग्रह मराठीत अनुवादित केले आहेत. मु. मेता यांच्या 'आधायत्तक्कू कडूत्तवीडू' या तमीळ कविता संग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य अकादेमीने 2018 मध्ये प्रसिद्ध केला होता. तसेच रंगनाथ पठारे यांच्या 'भरचौकातील अरण्यरुदन' ह्या मराठी कादंबरीचा त्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केला आहे. ते रायगड मिलीटरी स्कूल महाडचे निवृत्त प्राचार्य आहेत.
 
अत्यंत हाल अपेष्टा सोसणारी ही कृषिप्रधान संस्कृतीतील कुणबी कुळे आणि त्या काळच्या जातिव्यवस्थेचे वर्णन लेखकाने निःपक्षपातीपणे मांडले आहे. दोन जातीत होणाऱ्या रोटी बेटी व्यवहारासोबतच गणिका आणि गावाला सोडलेल्या रखेलीचा त्याकाळात केला जाणारा मान सन्मान, तसेच त्यांच्यामार्फत गावाला संकटकाळात होणारे उपयोग मांडताना लेखक ग्रामीण विचारपद्धतीवर भाष्य करतो. कृषिप्रधान संस्कृतीत स्त्रीचं असलेलं स्थान आणि निराधार आश्रितांची मनस्थिती अगदी घराघरातील उदाहरणांतून स्पष्ट होते. पैशाच्या अभावी समाजात प्रतिदिनी जन्माला येणारी दुःख, त्यातून मार्ग काढताना झालेली भावनांची कुतरओढ आणि त्यातून ढासळलेला नातेसंबंधांचा दर्जा प्रत्येक परिच्छेदातून अधोरेखित होतो.
 
२०२२ मध्ये साहित्य अकादेमीने या पुस्तकाचे भाषांतर करून मराठी प्रथम आवृत्ती प्रकाशित केली आहे. पुस्तकाची किंमत २७५ रुपये इतकी आहे. इंडिया प्रिंटिंग वर्क्स येथून छापलेले हे पुस्तक माधुरी खैरे यांनी टाईप केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0