प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्रावर पारितोषकांचा वर्षाव

सर्व तिन्ही वर्गवारी मध्ये महाराष्ट्राला तीन पारितोषके, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले सर्वांचे अभिनंदन!

    31-Jan-2023
Total Views |
मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे झालेल्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राला चित्ररथाबद्दल दोन पारितोषके तर सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल एक पारितोषक अशी एकूण तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्ररथ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक, लोकप्रिय चित्ररथ श्रेणीमध्ये तिसरा क्रमांक आणि आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक अशी महाराष्ट्राने पारितोषकाची लय लूट केली आहे.
 

chitrarath 
 
दिल्ली येथे आज संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या राज्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी ही पारितोषके स्विकारली.
 
यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त, महाराष्ट्राने "साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" या विषयावर चित्ररथ साकारलेला होता. अतिशय दिमाखदार पद्धतीने संचलित झालेल्या या चित्ररथाला अनेकानी उत्स्फूर्त दाद दिली होती. अप्रतिम देखावे, सुंदर नृत्य आणि सर्वांग सुंदर गीत यामुळे या चित्ररथाने अनेकांची मने जिंकली होती.
 
संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीतील सदस्यांनी या चित्ररथास सर्वोत्कृष्ट चित्ररथ श्रेणीत दुसरा क्रमांक देऊन गौरव केला तर लोकप्रिय चित्ररथ श्रेणीमध्येही महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला. आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूने "धनगर नृत्य" यावर आधारित शानदार सादरीकरण केले होते. या सादरीकरणास देशात दुसरा क्रमांक मिळाला होता.
 
महाराष्ट्राला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले आहे. तिन्ही श्रेणीमध्ये तीन पुरस्कार मिळणे ही गोष्ट महाराष्ट्राला अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.