कार्यकाळ संपलेले उद्धव ठाकरे कोणत्या पदावर?

31 Jan 2023 14:06:53
Uddhav Thackeray

मुंबई : “मुख्यमंत्री पद गेले, पक्ष गेला, पक्ष चिन्हही गेले आणि २३ जानेवारीनंतर पक्षप्रमुख पदही गेले, ही अवस्था आहे, कधीकाळी शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या उद्धव ठाकरे यांची.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाची धुरा सांभाळणार्‍या उद्धव ठाकरे यांची पक्षांतर्गत फुटीमुळे चहुबाजूंनी कोंडी झाली आहे. त्यात पक्षचिन्हाचा वाद सुरू असतानाच त्यांच्या पक्षप्रमुख पदाचादेखील पेच निर्माण झाला आहे.


उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांनी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली किंवा सद्यःस्थिती कायम ठेवावी,” अशी विनंती निवडणूक आयोगाला केली. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपला आहे, त्यामुळे ते सध्या कोणत्या पदावर आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.


२३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कार्यकाळ संपला. या पक्षप्रमुख पदाच्या निवडीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठीची मागणी केली होती, निवडणूक शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख पदावर कायम करण्याची मागणी करण्यात आलेली होती.


निवडणूक आयोगात याबाबत प्रत्यक्ष कायदा नाही. मात्र, राज्यपाल पदाबाबतचा संदर्भ देऊन पक्षप्रमुखपदाबाबत माहिती देण्यात आली आहे.सर्वधारण कायद्यानुसार राज्यपाल हे पाच वर्षांसाठी असतात, मात्र त्यांचा कालावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत ते पदावर असतात. राज्यपालांच्या निवडीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत होऊ शकते. नवीन कोणाची निवड झाली नाही, तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदावर राहतील, असे घटनातज्ज्ञांनाचे मत आहे. मात्र, त्यावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे आजघडीला स्वत:च्याच पक्षात कोणत्याही पदावर नसल्याचेच दिसते.

Powered By Sangraha 9.0