‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे ठाकरे गटाचे वस्त्रहरण

31 Jan 2023 14:20:27
Rishikesh Khaire
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांची एक ऑडिओ क्लिप ‘व्हायरल’ झाली आहे. या क्लिपवरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अधिकार्‍यांच्या बदल्या करून देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. या क्लिपमुळे ठाकरे गटाचे वस्रहरण झाल्याची टीका केली जात आहे. याप्रकरणी ऋषिकेश खैरे यांनी सारवासारव केली करत स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या मुलगा ऋषिकेश खैरे यांनी पैसे घेऊन बदली केल्याची ऑडिओ क्लिप ‘व्हायरल’ झाली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पैसे घेऊन अधिकार्‍यांच्या बदल्या होत होत्या का? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. ऋषिकेश हे युवासेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे मविआ आणि ठाकरे गटावर चौफेर टीका केली जात आहे.ही क्लिप ‘व्हायरल’ झाल्यानंतर आता ऋषिकेश खैरे यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत व्यवहारचा विषय वेगळा आणि बदलीचा विषय वेगळा असा खुलासा केला आहे.

मुलाच्या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील एका अधिकार्‍याला बदली करून देतो म्हणून पैसे घेतल्याचा आरोप ऋषिकेश खैरे यांच्यावर आहे.

पैसे घेऊनही काम करत नसल्यामुळे अधिकारी संताप व्यक्त करताना या क्लिपमध्ये दिसून येत आहे. बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लिपमधून होत आहे. त्यावरून ठाकरे गटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0