यात्रा ठीक, पण सदनाचे काय?

    31-Jan-2023
Total Views |
Rahul Gandhi 'Bharat Jodo Yatra'


राहुल गांधींची यात्रा झाली. मात्र, त्यामुळे संसदेत भक्कम विरोधी पक्ष येण्याची शक्यता आहे का?


राहुल गांधींची बहचर्चित ‘भारत जोडो यात्रा’ कन्याकुमारी येथून सुरू होऊन श्रीनगरला जाऊन संपली. पक्षीय, परपक्षीय आणि माध्यमातल्या बुणग्यांनी गाजवलेली ही यात्रा कंटाळवाण्या गावजत्रेसारखीच होती. म्हणजे तिची सुरूवात तर उत्साहात झाली, पण नंतर त्याचा पायपोस नव्हता. कोणी थकलाभागला ‘सेलिब्रिटी’ सहभागी झाला किंवा राहुल गांधींनी महाराष्ट्रात संघ व सावरकरांविषयी तारे तोडले. तसे तारे तोडले की यात्रा चर्चेत यायची. आपल्यावर एक पक्षप्रमुख पद लादलेले आहे, याची पूर्ण कल्पना असतानाही राहुल गांधींनी ऊन, वारा, पाऊस सहन करीत ही यात्री काढली, त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक आहे. देशाचा सत्ताधारी कोण, यात आता कोणताही प्रश्न किंवा शंका राहिलेली नाही. आत गरज आहे, ती चांगल्या विरोधी पक्षाची. आपण कितीही टीका केली, तरी असा राष्ट्रीय विरोधी पक्ष देण्याची क्षमता ही काँग्रेसचीच आहे.


आपल्या तत्त्वांच्या विरोधात जाऊन सत्तेसाठी एकत्र येणारे लोक शासन, प्रशासन याचा कसा बट्याबोळ करतात. त्याचा ताजा भाग आपण महाराष्ट्रात पाहीला. काँग्रेसही यात सहभागी झाली होती. मोंदीचा विरोध करणार्‍या गाढवाशीही पाट लावायला तयार असलेल्यांची भाऊगर्दी ही सध्या विरोधाच्या पोकळीची मुख्य समस्या आहे. सरकारचा विरोध म्हणून संजय राऊत वगैरे लोक जे काही बरळत असतात त्याचे संसदीय मूल्य शून्य आहे. विरोधी पक्ष नेता कसा असावा हे देवेन्द्र फडणवीसांनी गेल्या दोन वर्षातील पाच भाषणांनी दाखवून दिले होते. देशात आणि राज्यात आज नेमकी ती जागा रिकामी आहे. काँग्रेसच्या बाबत एक सत्य आहे आणि ते म्हणजे नेता चांगला मिळाला किंवा नेता सक्रिय झाला, तर काँग्रेसचा म्हणून जो मतदार आहे तो बाहेर पडून मतदान करतो. राहुल गांधींच्या यात्रेने त्यांचे कार्यकर्ते तरी कामाला लागले. आता ते त्यांच्या मतदाराला तरी बाहेर काढू शकतात का. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


लहान राज्यात काँग्रेस जीवंतही होत जाते, तिचे अस्तित्व काही केल्या संपत नाही. नुकत्याच गोव्याला झालेल्या निवडणुकीमध्ये हाच अनुभव आला होता. निवडणुकांपूर्वीचे दोन-तीन महिने काँग्रेस किंवा आप कशी बाजी मारू शकतात, याचीच चर्चा सुरू होती. त्याठिकाणी राहुल गांधींनी एखादा दौरा केला आणि बाकी मतदार-स्थानिक लोकांवर सोडून दिली. मग काँग्रेसचे जे व्हायचे ते झाले. खरी स्थिती ही अशीच आहे. पंजाबमध्येही राहुल गांधींनी असेच केले. सत्ता राखू शकणार्‍या अमरिंदर सिहांना दुखावणे आणि मग सिद्धूसारख्या विदूषकाला मोठे करणे हे राहुल गांधींच्या काँग्रेसचे कर्तृत्व. खरेतर काँग्रेसचा खरा शत्रू आम आदमी पक्ष आहे. कारण, काँग्रेसचा आक्रसत जाणारा जनाधार आपच्या ताब्यात जाईल, अशी शक्यता आहे. या यात्रेतून राहुल गांधींना दुसर्‍या फळीतील नेत्यांची उभारणी करता आली, तर बरंच! कारण, आपसारख्या पक्षाला अंगावर घेणे नेत्यांना काँग्रेसमधल्या बुजुर्गांना कमी पणाचे वाढते.


स्थानिक पक्षांची जन्मच मुळी इंदिरा गांधींच्या अहंकारामुळे झाला असल्याने त्याला पर्याय देण्यापेक्षा राहुल गांधी त्यांच्याच गळ्यात गळा घालून फिरताना दिसले. महाराष्ट्रात ही यात्रा ज्या ठिकाणी येऊन गेली, ती ठिकाणे काही महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी नाहीत. इथे त्यांच्या यात्रेत आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे वगैरे मंडळी सामील झाली, पण त्यांचा प्रभाव हा जगजाहीर आहे. त्यानंतर मेधा पाटकरांसारखे लोक होते, ज्यांना विरोधाशिवाय काहीच साध्य करता आलेले नाही. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत संपूर्ण मेळा हा अशाच बुणग्यांचा होता. काश्मीरला तर फारूक अब्दुल्लांना राहुल व प्रियांका गांधींना पाहून रडू कोसळले आणि त्यांनी त्या दोघांना कडकडून मिठीत घेतले. आपल्या गुलछबू राजकारणासाठी आणि वारसाहक्काने आलेल्या बेफिकीरीमुळे असे कष्ट करून आलेल्या माणसांविषयी त्यांना कळवळा वाटणे, साहजिकच आहे. तो त्यांनी व्यक्तही केला.


घराणेशाही पक्षात कधीही क्रमांक एकच्या जागेसाठी महत्त्वाकांक्षा बाळगायची नसते. कारण, ती नेहमी राजपुत्रांसाठी राखून ठेवलेली असते. संजय राऊतांना हे बरोबर समजले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात यात्रेत सहभागी होणे पुरेपूर टाळले. ते काश्मीरला जाऊन राहुल गांधींच्या गळ्यात हात घालून फोटो काढून पसार झाले. या अशा सगळ्या चित्रविचित्र घटनाक्रमांची गडबड म्हणूनच यात्रेकडे पाहिले पाहिजे. संसदीय लोकशाहीची सर्वात जमेची बाजू म्हणजे, या लोकशाहीत कुणालाही पंतप्रधान पदासारख्या महत्त्वाच्या पदावरही विराजमान होण्याचे स्वप्न पहाता येते. राहुल गांधींचं काय, अन्य कुणालाही तसे स्वप्न पाहण्याचा अधिकार देते. मात्र, त्यासाठी जी योग्यता सिद्ध करावी लागते, ती यात्रेच्या निमित्ताने सिद्ध झाली का, याचा विचार काँग्रेसला करावा लागेल.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.