‘पुण्यभूमी भारत’

    31-Jan-2023
Total Views |
Punyabhoomi bharat

‘अखंड भारत व्यासपीठ’च्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती ते प्रजासत्ताक दिन या काळात ‘पुण्यभूमी भारत’ या विषयावरती विविध महाविद्यालये आणि शाळांमध्ये व्याख्याने आयोजित केली होती. या शृंखलेचा भाग म्हणून डॉ. वडके यांचे या विषयावरील व्याख्यान या महाविद्यालयात आयोजित केले गेले होते.

'अखंड भारत व्यासपीठ’ या संस्थेच्यावतीने कोंकण प्रांतात अनेक महाविद्यालये व शाळांमध्ये पुण्यभूमी ‘भारत परिचय अभियान’ आयोजित केले. याव्यतिरिक्त प्रजासत्ताक दिन दि. २६ जानेवारी व स्वातंत्र्य दिन दि. 15 ऑगस्ट रोजी विविध शाळा-महाविद्यालये व हौसिंग सोसायटींमध्ये झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय विचारांच्या संदर्भात चर्चा व्हावी, म्हणून ‘अखंड भारत व्यासपीठ’तर्फे दरवर्षी एक ’विचारपत्रक’ काढले जाते. महाविद्यालये, शाळा, तसेच हौसिंग सोसायटींच्या पदाधिकार्‍यांना अशी विनंती केली जाते की, त्यांनी या राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विचारपत्रकांचे वाचन करावे. या उपक्रमाला खूप शाळांमध्ये तसेच विविध हौसिंग सोसायट्यांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढावी, असा विचार विविध क्षेत्रांतील नामवंतांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत न डॉ. वडके यांचे ’पुण्यभूमी भारत’ या विषयावरील व्याख्यान ठाणे येथे ए. पी. शहा इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित केले होते. उपस्थितांसमोर विषय मांडणी करताना ते म्हणाले की “पाप’ या शब्दाला इंग्रजी मध्ये ’सीन’ हा शब्द आहे. परंतु, ’पुण्य’ या शब्दाला इंग्रजीमध्ये प्रतिशब्द नाही. त्याचे कारण पाश्चात्य विचारसरणीत ‘पाप’ या संकल्पनेचा विचार केला गेला आहे. परंतु, तिथे ‘पुण्य’ ही संकल्पनाच नाही आणि त्यामुळे ’पुण्यभूमी भारत’ हा विषय जर समजून घ्यायचा असेल, तर ‘पुण्य’ आणि ‘भूमी’ या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे,” या दोन्ही शब्दांचा अर्थ आणि भारतीयांची मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे असेही ते म्हणाले. अखंड भारत व्यासपीठ व ए. पी शहा महाविद्यालयातर्फे प्रसिद्ध होणार्‍या ‘अंतरंग’ या नियतकालिकाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘अखंड भारत व्यासपीठ’च्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती ते प्रजासत्ताक दिन या काळात ’पुण्यभूमी भारत’ या विषयावरती विविध महाविद्यालये आणि शाळांमध्ये व्याख्याने आयोजित केली होती. या शृंखलेचा भाग म्हणून डॉ. वडके यांचे या विषयावरील व्याख्यान या महाविद्यालयात आयोजित केले गेले होते. “ज्यांना भविष्यातील सामर्थ्यशाली भारत घडवायचा आहे, त्यांनी आपला भारत आणि भारतीय संस्कृती याची ओळख करून घेतली पाहिजे,” असेही प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

“स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला आपल्या देशाची खरी ओळख किंवा इतिहास सांगितला गेला नाही, तो जाणून घेण्याची आवश्यकता आहे,” असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी प्रदर्शित केलेल्या ‘पीपीटी’द्वारे इतिहासातील अनेक पराक्रमी आणि कल्याणकारी हिंदू राजांची उदाहरणे दिली व “मुस्लीम व इंग्रजांच्या राजवटीत भारतीय इतिहास दाबला गेला,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. संपूर्ण भारतभर असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणार्‍या सश्रद्ध हिंदू समाजाची परंपरा, देशाच्या चार दिशेने चार ठिकाणी स्थापित केलेले आद्य शंकराचार्य यांची पीठे किंवा ‘आसेतु हिमाचल’ असलेल्या या प्रदेशातील नद्या, पवित्र स्थळे यांच्या विषयी सर्व सामान्य भारतीय समाजाला असलेली आपुलकी हेच दर्शविते की, भले आमच्या भाषा विविध असतील. परंतु, सिंधपासून आसामपर्यंत व काश्मीरपासून श्रीलंकापर्यंत आम्ही एक आहोत.


पूजापद्धत भिन्न असू शकते, पण सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक होतो. “पराक्रमाने ओतप्रोत असलेला भारतीय इतिहास समजून घेत आपण भविष्याकडे पाहिले, तर विश्वगुरू भारत होण्याचे स्वप्न आपले साकार होऊ शकते,” असा आत्मविश्वास डॉ. वडके यांनी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दिला.भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात डॉ. वडके यांनी विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘अखंड भारत व्यासपीठा’चे उपाध्यक्ष सुनील ढेंगळे यांनी ‘अखंड भारत व्यासपीठ’ या संस्थेचा परिचय करून दिला. ‘अखंड भारत’ ही संकल्पना संकुचित नसून त्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आहे, भारतीय उपखंडातील सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या या समाजाला वसाहतवादी मानसिकतेमधून मुक्त करण्याचे सामर्थ्य या ’अखंड भारत’ शब्दात आहे व हाच विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘अखंड भारत व्यासपीठ’ करत आहे, असेही ते म्हणाले.


 पुढे आभारप्रदर्शनाची जबाबदारी माझी होती. उपस्थितांचे आभार मानताना मी म्हंटले, ”स्वामी विवेकानंद जयंती ते प्रजासत्ताक दिन या कालावधीत संपन्न होत असलेल्या ‘पुण्यभूमी भारत’ परिचय अभियानाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे”. ए. पी. शहा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे डॉ. उत्तम कोळेकर, कौन्सिलर दर्शना जैन तसेच महाविद्यालयाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डीन डॉ. समीर नानिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घाडगे व ’सांस्कृतिक भारत’चे संपादक प्रवीण देशमुख व संघटक मोहन अत्रे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.



-सुनिल ढेंगळे



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.