असंसर्गजन्य रोग

31 Jan 2023 12:10:45
 
Non-communicable diseases
 
‘जागतिक आरोग्य संघटने’ने मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ‘एनसीडी’ आजारांचे जास्त ओझे नोंदवल्याने ‘एनसीडी’ जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेले दिसत आहेत. यामुळे माणसाच्या जगण्याच्या गुणवत्तेचा दर्जा एकंदरीतच ढासळलेला दिसून येत आहे.
 
जगभरात असंसर्गजन्य रोग दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष लोकांचा बळी घेतात. हे प्रमाण जगभरातील सर्व मृत्यूंपैकी 70 टक्के आहे. ते रोग अनुवांशिक, शरीरविज्ञान, पर्यावरण आणि वर्तणूक यासारख्या अनेक घटकांच्या संयोजनाचे परिणाम आहेत. ते ‘कोविड’सारख्या संसर्गजन्य आजारांसारखे एका व्यक्तीपासून दुसर्‍याला संसर्गाने लागू शकत नाहीत आणि दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. असंसर्गजन्य रोगाचे कर्करोगाव्यतिरिक्त मुख्य प्रकार म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोडलेले रोग आणि तीव्र श्वसन रोगाचे अनेक प्रकार. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगाचे काही प्रकार हे व्यक्तीच्या जीवनशैलीच्या जगण्याशी व निवडीशी मोठ्या प्रमाणात जोडलेले असतात आणि म्हणूनच त्यांना जीवनशैलीचे आजार किंवा लाईफस्टाईल आजार म्हणून ओळखले जाते. आज सर्व जगात जीवनशैलीविषयक आजार सार्वजनिक आरोग्याची अत्यंत महत्त्वाची समस्या मानली जाते. असंसर्गजन्य रोगांचा एक उपसंच (एनसीडी) हे आपण ज्या प्रकारे जगतो, काम करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात जसे वावरतो त्याचा परिणाम आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये, आपला आहार अस्वास्थ्यकर बनला आहे, आपली जीवनशैली सुस्त झाली आहे आणि आपल्यापैकी बरेच जण अजूनही अल्कोहोलचा, तंबाखूचा व सिगारेटचा जीवनात सातत्याने गैरवापर करताना दिसतात. या जोखीम घटकांमुळे लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसाचा जुनाट आजार आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग या जीवनशैलीविषयक रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.
 
‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’  च्या माहितीनुसार असंसर्गजन्य आजार जगातील मृत्यूदरांचे प्रमाण वाढण्यासाठी तर कारणीभूत आहेतच आणि त्याचवेळी जागतिक स्तरावर सर्वांगीण विकासासाठी सर्वांत मोठा अडथळा बनत चालले आहेत. शिवाय, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या ‘एनसीडी’ आजारांचे जास्त ओझे नोंदवल्याने ‘एनसीडी’ जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेले दिसत आहेत. यामुळे माणसाच्या जगण्याच्या गुणवत्तेचा दर्जा एकंदरीतच ढासळलेला दिसून येत आहे.
 
‘एनसीडी’साठी लागणार्‍या उपचारांच्या खर्चाच्या तुलनेत रोगाचा भार कमी करून आरोग्य संवर्धन करणे आणि प्रतिबंधात्म ‘क’ आरोग्य पद्धती राबवणे ही धोरणे सध्याची सर्वांत प्रभावी धोरणे आहेत. तथापि, ‘एनसीडी’ प्रतिबंध करणे आणि नियंत्रण आणणे केवळ आहार नियोजन आणि शारीरिक व्यायामाद्वारे केले जाऊ शकत नाही. यासाठी आरोग्य सेवा प्रदाते, राज्य आणि सरकारे यांच्यासोबत अनेक स्तरांवर संयोजित कृती करणे आवश्यक आहे. आज बहुतेक देशात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रयत्न जीवनशैलीविषयक रोगांचे जोखीम घटक कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. परंतु, मानसिक लवचिकता वाढवण्यानेदेखील लक्षणीय फरक पडू शकतो याचे शास्त्रीय पुरावे आज दिसून येत आहेत. हार्वर्डचा एका नवीन अभ्यास, जीवनाबद्दल आशावादी दृष्टिकोन बाळगल्यास अनेक चांगल्या गोष्टी घडतील अशी सर्वसाधारण अपेक्षा, लोकांना दीर्घकाळ जगण्यास मदत करू शकते, असे सूचित करत आहे. त्यांच्या नवीन निष्कर्शानुसार, आपण आशावाद वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जो निरोगी वर्तन जोपासण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्याच्या निरोगी प्रयत्नांशी संबंधित आहे, असे दर्शविले गेले आहे.
 
त्या अभ्यासामध्ये 2004 ते 2012 पर्यंत नावनोंदणी करण्यात आलेल्या 70 हजार महिलांच्या आरोग्य माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा अभ्यास दर दोन वर्षांनी सर्वेक्षणांद्वारे महिलांच्या आरोग्याचा मागोवा घेणारा दीर्घकाळ चालणारा अभ्यास आहे. त्यांनी सहभागी महिलांच्या आशावादाची पातळी आणि इतर घटक पाहिले.
 
त्यांच्या अभ्यासातील विश्लेषणातून सर्वांत आशावादी दृष्टिकोन असलेल्या महिलांना कमीत कमी आशावादी महिलांच्या तुलनेत कोणत्याही रोगामुळे असणारा मृत्यूचा धोका जवळपास 30 टक्के कमी होता, असे आढळून आले. सर्वांत आशावादी महिलांना कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका 16 टक्के कमी होता, तर हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 38 टक्के कमी होता. याशिवाय त्यांच्यात श्वासोच्छवासाच्या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका 38 टक्के कमी आणि संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका 52 टक्के कमी दिसून आला. सकारात्मक विचार किंवा आशावादी वृत्ती म्हणजे कोणत्याही विपरित परिस्थितीत चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा तुमचा सराव व सवय. या सवयीचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही कठीण व अवघड वास्तवाकडे दुर्लक्ष करता किंवा समस्यांची तीव्रता कमी करून टाकता. याचा सरळसाधा अर्थ असा आहे की अनेक नकारात्मक गोष्टी भविष्यात चांगल्या होतील या अपेक्षेने तुम्ही जीवनातील चांगल्या आणि वाईट गोष्टींकडे लक्ष देता.
 
सकारात्मक विचारांना कधी कधी वाईट प्रतिष्ठा मिळते किंवा त्या विचारांची खिल्ली उडवली जाते. का? कारण बर्‍याच लोकांचा असा समज आहे की, तो एक प्रकारचा स्वप्नाळू विचार आहे. त्याच्यात काही दम नसावा. जे लोक सकारात्मकतेचा विचार करतात ते बहुदा वास्तविकतेला नाकारत असावेत. बर्‍याच जणांना असेही वाटते की, अशा प्रकारची स्वप्नाळू प्रवृत्ती आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. कारण ती आपल्याला कठीण भावना किंवा नकारात्मक भावनांवर प्रक्रिया करू देत नाही. तथापि, आपण आपला गैरसमज दूर केला पाहिजे. कारण, सकारात्मक विचार म्हणजे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे नव्हे, तर त्याऐवजी ठाम प्रयत्न करणे आणि खात्रीपूर्वक पुनर्रचना करणे आणि संभाव्य उपायांवर लक्ष केंद्रित करणे. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न म्हणजे आपण मागच्या बिकट परिस्तिथीत ना अडकता नवीन पथ शोधण्यासाठी मोकळे असणे आणि काहीतरी आशावादी क्षितिज शोधणे असा आहे. जीवनातील अनेक अनिश्चितता आणि आव्हानांना मानसिक आणि भावनिकरित्या सामोरे जाण्यासाठी हा एक उपयुक्त रस्ता असू शकतो. आता सकारात्मक विचारसरणीमुळे आपल्या शारीरिक आरोग्यालाही फायदा होऊ शकतो हे दाखवणार्‍या वैज्ञानिक अभ्यासांची संख्या वाढत आहे.
 
प्रत्येक नकारात्मक विचार मन आणि शरीर यांच्यातील भागीदारी कमकुवत करते.
 
-दीपक चोप्रा
Powered By Sangraha 9.0