शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

31 Jan 2023 12:18:22
 
panchmahabhute
 
माणसाच्या शरीरामध्ये निसर्गात असणारी पंचमहाभूते अस्तित्वात असतात व त्यामुळेच या पंचमहाभूतांचे गुण हे शरीरालाही बंधनकारक असतात.
 
ही पंचमहाभूते जशी निसर्गात कार्यरत असतात त्याचप्रमाणे ती शरीरांतर्गतही कार्यरत असतात. पंचमहाभूतांपैकी पहिले म्हणजे पृथ्वीतत्व. पृथ्वीतत्व म्हणजे आकार ज्याला आकार आहे,जडणघडण आहे. जे अवयव व्यवस्थित आकारात शरीरात विराजमान आहेत. त्याच्यामागे पृथ्वीतत्वच कार्य करत असते. पृथ्वीतत्व म्हणजे जडत्व, पृथ्वीतत्व म्हणजे स्थिरता, शरीरप्रकृती व शरीराची ठेवण ही याच पृथ्वीतत्वपासून चालू होते.
 
शरीरातील दुसरे तत्व म्हणजे अग्नीतत्व, अग्नी म्हणजे ‘दाहकता’. अग्नी म्हणजे उष्णता, अग्नीमध्ये जाळून टाकण्याची व भस्म करण्याची क्षमता असते. शरीरात पचनक्रिया जी होत असते ती या जठरातील अग्नीमुळे ज्याला आपण ‘जठाराग्नी’ म्हणतो त्यांच्यामुळे होत असते. याच अग्नीतत्वामुळे शरीरातील चयापचय क्रिया पचनक्रिया पूर्ण होत असते. अग्नीतत्व फक्त शरीरातच असते, असे नाही तर ते माणसाच्या मनातदेखील असते. हे अग्नीतत्व जर माणसाने सकारात्मतेने वापरलेले तर त्यातून खूप रचनात्मक गोष्टी माणूस करू शकतो व वाईट गुण आणि सवयी जाळून टाकू शकतो. पण तेच जर नकारात्मक दृष्टिकोनातून वापरले, तर मात्र प्रचंड राग चिडखोरपणा येऊन माणसाला त्याचा त्रास होऊ लागतो.
 
अग्नी तत्वाचे मुख्य कार्य हे पचनक्रिया पार पाडणे हे होय, त्याचबरोबर पचन झालेल्या अन्नाचे शरीरात शोषून घेतले जाणे हेही याच तत्वामुळे शक्य होते, अग्नीतत्व इतक्यावरच थांबत नाही,तर पचन झालेल्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्यासाठीसुद्धा अग्नी तत्वाचीच आवश्यकता असते, म्हणजेच काय तर शरीराला मुख्य ऊर्जा पुरवण्याचे व शरीराला सर्व उपयुक्त घटक पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य हे अग्नीतत्व करत असते. इथे फक्त भौतिक स्वरुपातील अन्नाचा उल्लेख करून भागणार नाही, तर मनामध्येही हा अग्नी चांगलाच कार्यरत असतो-
 
जेव्हा आपण कुठल्याही गोष्टींचे ज्ञान घेत असतो किंवा कुठल्याही प्रकारच्या अध्यात्मिक किंवा इतर प्रकारची माहिती शिकत असतो ते फक्त अग्नी तत्वामुळेच अग्नीतत्व जर शक्तीलाही असेल, तर माणूस दीर्घायुषी होतो. शरीरातील चैतन्यशक्तीला उभारी येते, चैतन्यशक्तीची ताकद फार वाढीला लागते, शरीर निरोगी राहते, अग्नीतत्वामुळे मनाचीदेखील शुद्घता होते व मनातील विचारांना दिशा मिळते. अग्नीतत्वाला पुरक अशा अनेक गोष्टी शरीरात आधीपासूनच दिलेल्या असतात. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील स्राव. शरीरातील स्राव, आम्ल, जठरातील आम्ल तसेच पित्त हे आतड्यांमधील स्राव तसेच तोंडातील लाळ हे सर्व स्राव अग्नीतत्वालाच पुरक असे असतात व त्यांच्यामधूनच अग्नीतत्व आपले कार्य पार पाडत असते.
 
अग्नीतत्वामुळे शरीरातील चैतन्यशक्ती मजबूत होण्यास सहाय्य होते. त्याचमुळे काही बदल होतात ते आपण पुढील लेखात पाहूया. (क्रमश:)
 
- डॉ. मंदार पाटकर
Powered By Sangraha 9.0