दुष्यंतने जीव दिला; पण कबूल केला नाही इस्लाम

31 Jan 2023 14:42:43
Dushyant Chaudhary conversion

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील २३ वर्षीय दुष्यंत चौधरीने तीन वर्षांपूर्वी मुस्लीम युवतीशी लग्न केले. त्यानंतर त्यास सासरच्यांकडून धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्याने त्या त्रासाला कंटाळून इस्लाम कबूल करण्याऐवजी राहत्या घरात फाशी घेऊन या जगाचाच निरोप घेतल्याची हृदय हेलावून सोडणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत चौधरी हा तरुण शनिवारी आपल्या खोलीत झोपला होता. सकाळी बराच वेळ तो खोलीच्या बाहेर न आल्यामुळे त्याची आई शिक्षादेवी यांनी खोलीत जाऊन बघितले, तर दुष्यंतचा मृतदेह लटकत होता.त्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर आत्माहत्येचे मुख्य कारण समजेल, असे वैद्यकीय अधिकारी अरविंद चौरसिया यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मृत दुष्यंत याने तीन वर्षांपूर्वी मेरठ येथील फरहा नावाच्या मुस्लीम मुलीशी नातेवाईकांच्या परवानगीशिवाय लग्न केले होते. त्यानंतर काही दिवस ते आपापल्या घरी राहिले. दुष्यंत आपल्या पत्नीला आपल्या घरी घेऊन येणार होता.पण त्याच्या सासरच्या लोकांनी अगोदर धर्मपरिवर्तन करण्याची अट घातली.

जर तू इस्लाम धर्म स्वीकारत धर्मपरिवर्तन केले, तर मुलगी त्याच्याबरोबर पाठवू असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती मृत दुष्यंत याचा चुलतभाऊ जॉनी चौधरी याने सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी फरहासहित तिच्या कुटुंबातील चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दुष्यंत या युवकाने सासरच्यांच्या दबावापुढे बळी पडत धर्मांतरण करण्याऐवजी स्वत:चाच जीव देत धर्माभिमान कायम ठेवला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




Powered By Sangraha 9.0