गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी अब्बासीला मृत्यूदंड!

एनआयए विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा

    31-Jan-2023
Total Views |
Ahmad Murtaza Abbasi

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अहमद मुर्तझा अब्बासी या हल्लेखोरास फाशीची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, देशात इसिसचे जाळे निर्माण करण्याचा त्याचा मनसुबा असल्याचे एनआयए तपासामध्ये स्पष्ट झाले होते.


उत्तर प्रदेशातील लखनौतील विशेष एनआयए न्यायालयाने दि.३० जानेवारी रोजी अहमद मुर्तझा अब्बासी याला फाशीची शिक्षा सुनावली. अब्बासी यास गेल्या वर्षी एप्रिलमध्ये गोरखनाथ मंदिरात बळजबरीने प्रवेश करून आवारात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर विळ्याने हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी सलग ६० दिवस या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर अब्बासी यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १२१ (युद्ध पुकारणे, युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यास प्रवृत्त करणे) आणि कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे) अन्वये दोषी ठरवले आहे.


उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अब्बासी यास इसिसने प्रशिक्षण दिले होते. अब्बासी नेपाळमध्येही गेल्याचे आणि दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीने प्रभावित झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जिहादी साहित्य आणि प्रक्षोभक ऑडिओ आणि व्हिडिओदेखील जप्त केले आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.