दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचे ४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन

नवभारताचे स्वप्न साकार करणारा केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प

    30-Jan-2023
Total Views |
pm-modi-to-inaugurate-delhi-mumbai-expressway-s-sohna-dausa


नवी दिल्ली
: देशाचे राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईदरम्यानचे अंतर अवघ्या १२ तासांवर आणणाऱ्या दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वेच्या पहिल्या सोहना – दौसा या टप्प्याचे उद्घाटन येत्या ४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

देशाच्या दोन प्रमुख शहरांमधील अंतर रस्तेमार्गाने अवघ्या १२ तासांवर आणणाऱ्या दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वेची उभारणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू आहे. या महामार्गामुळे दोन शहरांमधील १ हजार ३८० किमीचे अंतर अवघ्या १२ तासांमध्ये कापता येणार आहे. सध्या या महामार्गाची उभारणी अतिशय वेगात सुरू आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे हरियाणामधील सोहना ते राजस्थानमधील दौसा या पट्ट्याचे उद्घाटन येत्या शनिवारी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे दिल्ली ते जयपूर हे २६८ किमीचे अंतर अवघ्या २ तासांमध्ये पार करता येणे शक्य होणार आहे.


हा महामार्ग दिल्ली – हरियाणा – राजस्थान – मध्य प्रदेश – गुजरात - महाराष्ट्र अशा सहा राज्यांमधून जाणार आहे. त्यासाठी ९८ हजार कोटी रुपये खर्च येणार असून हा देशातला सर्वांत लांब १ हजार ३८० किलोमीटरचा अत्याधुनिक असा ‘हाय वे’ होणार आहे. तब्बल १२ मार्गिका असलेला (सध्या ८ मार्गिका, भविष्यात ४ बांधण्याचे नियोजन) हा महामार्ग उत्तर प्रदेशात बांधल्या जाणाऱ्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी)सोबत या पाच राज्यांना जोडणार आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरील जयपुर, किशनगढ, अजमेर, कोटा, चितोडगढ, उदयपुर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या पाच राज्यांमधील महत्वाच्या शहरांदरम्याची कनेक्टिव्हीटी वाढून रोजगाराच्या लाखो नव्या संधी उदयास येणार आहेत.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवभारत’ (न्यू इंडिया) या स्वप्नाची पूर्ती करणाऱ्या या महामार्गाची सुरुवात २०१८ साली झाली, त्यानंतर २०१९ साली तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते त्याचे भूमिपुजन करण्यात आले होते.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.