कर्णबधिर ‘ऑडिओलॉजिस्ट’ची ‘अपूर्वाई’

    30-Jan-2023   
Total Views |
 
जन्मजात कर्णबधिर असलेल्या, नंतर बोलायलाही शिकलेल्या अपूर्वा जोशीने मूकबधिरांना ऐकायला शिकवायचं, हे उद्दिष्ट ठेवून ‘ऑडिओलॉजिस्ट’ म्हणून वेगळी वाट निवडली. तिच्या या अपूर्वाईविषयी…
 
 
apurva joshi
 
जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे अनुभव घेणं, त्या अनुभवांना आपल्या विचारांची जोड देणं. त्यांचाच आधार घेऊन आपली मतं प्रभावी होतात. ही आकलनशक्ती, विचारशक्ती आपल्याला कोणत्याही व्यक्तीकडे/वस्तूकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रदान करते. आपली पंचज्ञानेंद्रियं यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसंच ती सर्व एकमेकांवर कमी-अधिक प्रमाणात विसंबून असतात. ज्याला दृष्टी नाही, तो कल्पनाचित्र रंगवू शकेल काय? तसंच ज्याला श्रवणदोष आहे, तो इतरांसारखं बोलू शकत नाही. त्यात त्याच्या स्वरयंत्राचा दोष नसतो. जर श्रवणदोष लवकर लक्षात आला, तर त्यावर योग्य ते उपचार घेऊन बाळ व्यवस्थित बोलू शकतं, इतरांसारखं सामान्य आयुष्यही जगू शकतं. अपूर्वाला जन्मत:च श्रवणदोष आहे. व्यंग घेऊनच जन्माला आलेली अपूर्वा जोशी आज दहिसर येथे स्वतःचं क्लिनिक चालवते.
 
अपूर्वा जन्मत:च कर्णबधिर. परंतु, यावर मात करून तिने ‘ऑडिओलॉजी’आणि ‘स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी’ या विषयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं. कर्णबधिर मुलांमधले दोष ओळखून त्यांच्या अनेक चाचण्या घेऊन ती त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन सध्या करते. आपल्या कमतरतेवर मात करून अपूर्वाने त्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचं कौतुक तर आहेच, त्याहीपेक्षा जास्त तिच्याबद्दल उत्सुकता आहे. तिच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि तिचा हा प्रवास जाणून घेण्याच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा.
 
 
 
अपूर्वाला बालपणीचं फार अंधुक आठवतं. आईबाबा तिला ट्रेनमधून अली यावर जंग केंद्रामध्ये घेऊन जात. तेव्हा, तिच्याशी सतत गप्पा मारत, हेही तिला आठवतं. तसंच तिच्या आईवडिलांनीही तिला काही आठवणी सांगितल्या. अपूर्वाला इतर मुलांप्रमाणे ऐकू येत नाही, हे ती फार लहान असतानाच तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. तिच्यावर योग्य वेळी उपचार केले गेले. सहा महिन्यांची अपूर्वा कोणत्याही हाकेला, आवाजाला प्रतिसाद देत नव्हती. ती इतकी आत्ममग्न असे की कुकरची शिटी झाली तरी तिला भीती वाटत नसे, अगर तिच्या ते ध्यानीही येत नसे. तेव्हापासूनच आईबाबांनी तिला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं. अगदी ज्या प्रसूतिगृहात तिचा जन्म झाला होता, त्या दवाखान्यातील डॉक्टरांचासुद्धा सल्ला घेतला.
 
तिच्यात श्रवणदोष आहे, हे ती 11 महिन्यांची असताना निदान झालं. तिला अली यावर जंग केंद्रामध्ये उपचार सुरू केले. ती 11 महिन्यांची झाल्यावर तिला श्रवणयंत्र दिलं गेलं. त्यानंतर नियमित ‘स्पीच थेरपी’ देऊन तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी फार मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला यश येऊ लागलं. आतापर्यंत अतिशय शांततेत जीवन जगणार्याी अपूर्वाच्या कानावर आता आवाजाचा भडिमार होऊ लागला. तिचे आई-वडील तर तिच्याशी बोलतच, तसंच इतर व्यक्तीही तिच्याशी बोलू लागल्या. ’तवा गरम आहे’, ’तव्याला हात लावल्याने हात भाजतो’ अशी वाक्यं सतत तिच्या कानावर पडू लागली. ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र बसवल्यानंतर नियमित थेरपी घेऊन मात्र तिला व्यवस्थित ऐकू येऊ लागलं. आईबाबांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. परंतु, ज्या शाळेत तिला घातलं होतं, तेथे ती इतर मुलांचं पाहून हातवार्यां च्या भाषेत संवाद साधू लागली. वयाच्या सव्वा वर्षांपासून ती तीन शाळांमध्ये जात असे - एक कर्णबधिर मुलांची शाळा होतीच, सोबतच उच्चार व भाषा शुद्ध व्हावी म्हणून तिला आईबाबा संस्कृत भाषा शिकवणार्याु शाळेतही पाठवत, त्यानंतर लेले आजींकडे खाऊच्या शाळेत ती जात असे. संध्याकाळी दादरवरून तिला आईबाबा पुन्हा कल्याणला घेऊन येत.
 
लहानपणापासूनच अपूर्वा शाळेत इतर मुलांप्रमाणे सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, तसंच बक्षीसंही मिळवायची. वक्तृत्व स्पर्धा असो, श्लोकपठण असो.. सर्वच उपक्रमांत ती अग्रेसर असे. आता तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. ऐकू न येणार्याअ मुलांना ‘कॉक्लियर इम्प्लांट’ (उलहश्रशरी ळाश्रिरपीं) करून ‘स्पीच थेरपी’ देऊन शिकवता येतं. त्यांना शिकवण्यासाठी तिला आपल्या क्लिनिकपर्यंत दुचाकीवरून प्रवास करावा लागे. त्यासाठी परवाना मिळवण्यासाठीसुद्धा तिला फार कष्ट घ्यावे लागले. श्रवणदोष असल्याने तिला वाहन चालकाचा परवाना मिळू शकत नव्हता. तिला या श्रवणदोषाचा फायदाही होतो. अभ्यास करायचा असेल तेव्हा, रात्री झोपताना ती यंत्र काढून झोपते. यंत्र काढल्यानंतर तिला काहीही ऐकू येत नाही. हे फारच छान नाही? आपण डोळे बंद करतो, पण कान काही बंद करता येत नाही.
 
ती स्वत:बद्दल बोलताना तिच्या पेशंट्सबद्दलही सांगते. काही मुलांवर श्रवणयंत्राचा उपयोग होत नाही. त्यांच्यासाठी ‘कॉक्लियर इम्प्लांट’ तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. ज्या मुलांवर श्रवणयंत्राचा उपयोग होत नाही, त्यांच्यासाठी शासनाने अनेक उपक्रम राबवले आहेत. ज्या मुलांवर श्रवणयंत्राचा काहीही उपयोग होत नाही व ज्यांच्या पालकांकडे इतर उपचारांसाठी पैसे नाहीत, त्या मुलांना सरकारकडून काही प्रमाणात मदत मिळू शकते. तसंच काही सामाजिक संस्थासुद्धा अशा मुलांना काही मर्यादेपर्यंत मदत करतात. अपूर्वाला जन्मत:च श्रवणदोष आहे. परंतु, आज ती श्रवणदोष असणार्याम इतर लोकांना ऐकायला शिकवते! तिची जिद्द आणि चिकाटी याच्या बळावर तिने सर्वसामान्य मुलांना ज्या शाळेत प्रवेश मिळतो, त्या शाळेतून कोणत्याही प्रकारची सवलत न वापरता 91 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. आता ती ‘स्पीच ऑडिऑलॉजिस्ट’ म्हणून काम करते व दहिसर येथे तिची स्वत:चं क्लिनिक आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तिला अनेकानेक शुभेच्छा!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.