...म्हणून उद्धव ठाकरेंची आनंद आश्रमाकडे पाठ

आता आनंद आश्रमासाठी ठाकरे गटाचा कायदेशीर लढा

    30-Jan-2023
Total Views |
Uddhav Thackeray


ठाणे 
: “गेली ३० हून अधिक वर्ष टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना रोखण्यात आले नव्हते. मात्र, आनंद आश्रमाला शिंदे गटाने नाव देऊन आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे,” असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमाकडे फिरकणे टाळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आनंद आश्रम निष्ठावंत शिवसैनिकांचा असून यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचा इशारादेखील ठाकरे गटाने दिला आहे.


“धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त दि. २६ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात आले असताना आनंद मठाकडे पाठ फिरवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या दिवशी शिंदे गटाने आनंद आश्रमास ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.


“अशा प्रकारे आनंदा आश्रमाचे रूपांतर वातानुकूलित कॉर्पोरेट ऑफिसमध्ये करण्यात आले असल्यामुळे या आनंद आश्रमाचे मूळ उद्दिष्ट नष्ट होत चाललेआहे. ज्या आनंद आश्रमातून शिवसेना वाढली त्याच आनंद आश्रममधून नगरसेवक, आमदार, खासदार, उद्योजक तयार केले, बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या, अन्यायाविरुद्ध लढून अनेकांना न्याय मिळवून दिला जात होता. हे पाहूनच त्या जागेचे पारशी असलेलेमूळ मालक त्यांनी ही जागा आनंद दिघे यांना दिली होती. हे आनंद आश्रम निष्ठावंत शिवसैनिकांचे आहे व राहणार यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढून मिळवून घेऊ,” असे ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर, समिधा मोहिते, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, अनिश गाढवे आदी उपस्थित होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.