‘ऐसा कोई सगा नहीं...!’

    30-Jan-2023   
Total Views |
Nitish Kumar


‘ऐसा कोई सगा नहीं नीतीशने जिसको ठगा नहीं।’ होय...हे खरयं. बिहारच्या राजकारणात स्वतःला विकासपुरूष म्हणून मिरवून घेणार्‍या नितीश कुमार यांनी धोका दिलेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे. आधी देवीलालनंतर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव आणि मागे भाजपसोबतही त्यांनी दगाबाजी केली. नुकतेच भाजपत येण्याच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता त्यांनी मी मरेन, पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हटले. माझ्यासोबत सरकारमध्ये असताना लालू आणि तेजस्वी यांना गोवण्याचे काम भाजपने केल्याचे नितीश यांनी बोलून दाखवले. आता तेजस्वी आमच्यासोबत आहे, त्यांना हटवण्यासाठी भाजप पुन्हा त्यांना अडकवण्याचे काम करत आहे. भाजप आता जुना भाजप राहिला नसल्याचेही नितीश म्हणाले. नितीशबाबूच्या कोलांटउड्यांची नोंद ठेवली, तर एखादा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर झाला असता. परंतु, विस्मरणाची सवय फार वाईट. तुम्ही मातीत मिसळून जाल. पण, भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणणारे नितीश भाजपसोबत गेले आणि सत्तेत आले. विशेष म्हणजे भाजपचे जास्त आमदार निवडून येऊनही भाजपने मित्रधर्म निभावत नितीश यांना मुख्यमंत्री केले. परंतु, शब्दाला जागतील ते नितीश कसले. ते नंतर पुन्हा लालू यादवांचे सुपुत्र तेजस्वी यादवला सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले. आधी त्यांना राजद म्हणजे जंगलराजची आठवण यायची. परंतु, भाजपशी दगाबाजी करून ती आठवणही ते विसरले. भाजप प्रदेश कार्यकारीणीत बिहारचे भाजप प्रभारी विनोद तावडे यांनीही नितीशसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. नितीश यांच्या कोलांटउडीनंतर बिहारमध्ये सगळ काही आलबेल आहे, असे नाही. बिहारमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा आणि महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथांवर हल्ले होत आहेत. दरम्यान, नितीश यांना ‘जेडीयू’च्या संसदीय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह आणि माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीही सोडचिठ्ठी दिली. नितीश यांनी कुशवाह यांच्यासोबत 35 तर आरसीपी सिंह यांच्यासोबत 22-23 वर्ष काम केले. परंतु, तरीही त्यांनी साथ सोडली. सत्ता व खुर्चीसाठी नितीश यांनी तत्व आणि विचारधारेला वारंवार तिलांजली दिली. सध्या ते मुख्यमंत्री असले तरीही त्यांचे राजकारण त्यांनी स्वतः संपवले. कारण, भविष्यात लालूपुत्राचे मन सांभाळावे लागेल आणि भाजपची दारं काय म्हणून ठोठावणार?
राऊतने जिसको ठगा नही!

नुकताच सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ विरोधात काढलेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू समाज सहभागी झाला होता. राजकीय पक्षविरहीत हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या कालावधीनंतर अशी हिंदूंची एकजूट मुंबईने पाहिली. परंतु, या मोर्चावर एक व्यक्ती नेहमीप्रमाणे नाराज राहिली. ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत. हिंदू आणि मराठ्यांनी मोर्चा काढला की राऊतांना मोर्चावर टीका केल्याशिवाय चैन पडत नाही. हिंदूंचा हा ‘जनआक्रोश मोर्चा’ कुणाविरोधात होता हे कळलेच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. पण, केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना हा मोर्चा काढण्याची गरज काय होती? असा सवाल राऊतांनी केला. हा मोर्चा मोदी आणि शाह यांच्या विरोधात असल्याचा दावाही त्यांनी केला. ती भाजपची रॅली होती. मोर्चाचे नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण, भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढल्याची बडबड राऊतांनी केली. हिंदूंचा आक्रोश काय आहे हे पाहायचं असेल, तर मोर्चेकर्‍यांनी काश्मीरला जाऊन काश्मिरी पंडितांचा आक्रोश पाहण्याचा सल्लाही राऊतांनी दिला. दरम्यान, हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेण्यात भाजप कधीही कचरत नाही. हिंदूहितासाठी पक्ष झटत असेल, तर तो मोर्चात सहभागी होणारच. आता ठाकरे सेना हिंदूहित जपत नसल्याने मोर्चाला विरोध केला असे म्हणावे लागेल. उलटपक्षी ठाकरे गटाने अनेकदा हिंदुत्वाशी फारकत घेतली. मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणार्‍या राऊतांना उद्धव ठाकरेंनी समज सोडा साधे दटावल्याचे आठवत नाही. तेव्हा ठाकरेंना हा मराठा समाजाचा अपमान सहन झाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागणारे हेच ते राऊत. महाराजांच्या वंशजांचा जाहीरपणे अपमान करणार्‍या संजय राऊतांचा साधा धिक्कारही त्यावेळी उद्धव यांनी केला नाही. मुळात राज्यपालांविरोधात काढलेल्या मोर्चाला तीन पक्ष मिळून जेमतेम गर्दीही जमली नाही. एवढेच काय, तर एखादा ‘ड्रोन शॉट’ घेता येईल एवढी गर्दीही ठाकरे सेनेला जमवता आली नाही. तेव्हा, राऊतांनी तोंडात बूच टाकले होते का? अवघ्या एका मताने खासदार झालेल्या राऊतांनी संन्यासाची तयारी सुरू करावी. कारण, राऊतांच्या बड्या-बड्या बातांना शिंदे अस्राने आस्मान दाखवले आहे.







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.