अजून किती गर्तेत जाणार?

30 Jan 2023 21:47:07
pakistan crisis


रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या कागदाच्या किंमती भारतीय वृत्तपत्रसृष्टीनेच पचवल्या. पाकिस्तानात मात्र वह्या पुस्तकांच्या किमती वाढल्या म्हणून १० लाख मुलांनी शाळा सोडल्या आहेत.

एक देश, त्याची दुर्दैवी फाळणी होते. फाळणीचे कारण केवळ धर्मांधता आणि एका समुदायाला आणि त्याच्या नेत्याला त्याच्या समुदायाविषयी असलेला फाजिल आत्मविश्वास. दुसरा देश लोकसंख्येने विपुल. त्याला लाभलेली वैविध्यता ‘शाप की वरदान’ हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. फाळणी तर लादलेलीच. उलट ज्याने आपल्या देशाचे तुकडे केले त्याला मदत म्हणून ३५ कोटींही द्यायचे आहेत. ही कहाणी आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांची. एक देश जगद्गुरू होण्याचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरा भाकरीच्या तुकड्यासाठी लवकरच दंगे व्हावेत अशा परिस्थितीकडे सरकत आहे. पाकिस्तान खंगला आहे.

 राष्ट्र म्हणून हा देश पूर्ण फसला आहे. धर्माच्या आणि भौगोलिक राजकारणाच्या जागतिक पटलावर जाहीर कळसूत्री म्हणून नाचविला जाणारा पाकिस्तान सगळे प्रयत्न करूनही आज पूर्णपणे फसला आहे. या पडत्या काळातच शहाणपण येत असते. पाकिस्तानला आलेले शहाणपण किती विखारी असू शकते याचा पुरेपूर अनुभव भारताने घेतला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुरती कोलकडली आहे. पाकिस्तानी चलन परवा इतके कोलमडले की, ते पुन्हा कसे उभे राहील हा प्रश्न आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषातून ‘पुलंचा अंतु बरवा’ म्हणतो तसा दिवाळखोरीचा अर्ज हवा होता. आता पाकिस्तानकडे फक्त तीन आठवड्यांचे परकीय चलन शिल्लक आहे. हे संपले की, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी लागणारा निधीही त्यांच्याकडे नसेल.


परदेश व्यापारातून येणारे अन्नधान्य, औषधे हेदेखील हा देश सरकार म्हणून विकत घेऊ शकणार नाही. पर्यायाने देशांतर्गंत महागाई भयानक वाढली आहे. २० किलो पीठाच्या गोणीची किंमत आज पाकिस्तान ३१०० रु. इतकी झाली आहे. याचे परिणाम प्रकट व्हायला सुरुवातही झाली आहे. अर्थातच २० किलोच्या पोत्याची ही किंमत अफाट आहे व ती परवडणारी तर मुळीच नाही. भाकरीच्या तुकड्यासाठी रस्त्यावर उतरून केला जाणारा संघर्ष आता अटळ आहे. ज्या धर्मवेडेपणाने या देशाला झाहील ठेवले त्या धर्माची अन्य राष्ट्रेही पाकिस्तानच्या मदतीला यायला तयार नाहीत. त्यांना माणुसकी म्हणून पाकिस्तानची दया येत नाही असे नाही.

मात्र, वारंवार भीक मागायला येणार्‍या भिकार्‍याला आपण हुसकावूनच लावतो तशी ही गत आहे. या सगळ्याला धर्मांधतेतून आलेल्या दहशतवाद्यांचीही साथ आहेच. ही टोळकी आता साठमारीच्या कामात पुढे आहे. या टोळ्या आपापले समूह सुरक्षित ठेवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच या देशात कधीही मध्यमवर्ग नावाच अर्थगट तयार झाला नाही. खूप श्रीमंत किंवा खूप गरीब अशी इथली विभागणी आहे. अमन की आशा वाल्या भारतीयांनी पाकिस्तानात कितीतरी पाकप्रदक्षिणा केल्या तरीही पाकिस्तान काही सुधारू शकला नाही. तालिबानला परत येण्यासाठी पाकने सर्व प्रकारची मदत केली होती. आता तालिबान ‘तेहरिके तालिबान’च्या पाकिस्तानी शाखेला सर्वतोपरी मदत करायला उभा राहिला आहे. त्यांचे धेय्य या राजकीय बुणग्यांना पदच्युत करून सूंपर्ण ‘शरिया’च्या आधारावर चालणारा पाकिस्तान उभा करण्याचे आहे. याचा परिणाम म्हणून त्यांनी पाकिस्तानातले दहशतवादी हल्ले वाढविले आहेत यातून मशिदीही वाचलेल्या नाहीत. हा सगळाच सावळा गोंधळ सुरू आहे. विजेचे संकट मोठे आहे.

पाकिस्तानात आजतागायतचा सगळ्यात मोठा काळा २४ तासांचा अंधार मागच्या आठवड्यात झाला. वीज नसल्याने पाकिस्तान २४ तास अंधारात होता. सरकारने विजेची बचत करण्यासाठी संध्याकाळी ८ नंतर सार्वजनिक ठिकाणांची वीज बंद करायला सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालयांवरही याचा परिणाम झाला आहे. पुस्तकांची व वह्या पुस्तकांची किंमत परवडेनाशी झाल्याने पाकिस्तानातल्या सुमारे दहा लाख मुलांनी शाळेला राम राम ठोकला आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा एक परिणाम म्हणून कागदाच्या किंमती प्रंचड वाढल्या होत्या. भारतात वृत्तपत्रांना घ्यावा लागणारा व वह्या पुस्तकांसाठी लागणारा कागदही महागला होता. कागदा संबधित उद्योगांनी भारतात अधिक पैसे देऊन हा कागद विकत घेतला. आता या किमती पुन्हा स्थिरावल्या आहेत. पाकिस्तानात मात्र दहा लाख मुले यामुळे शिक्षणाला मुकली.


पाकिस्तानी लष्कराने लादलेली राजकीय अस्थिरता हादेखील अजून चिंतेचा विषय. इम्रान खानने लष्कराविरोधात विधाने केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांची व्यवस्थित हकलपट्टी केली आणि त्यांच्याजागी शेहबाज शरीफ यांचे सरकार आले आहे. महासत्ता म्हणून नावारूपाला आलेल्या प्रत्येकाकडे आज पाकिस्तान भिखेला जाऊन पोहोचला आहे. अमेरिका आणि चीन नंतर आता पाकिस्तानच्या आशा रशियाकडूनच आहेत. रशियाला पाकिस्तानशी संबंध सुधारायचे असतील, तर ते गॅस पुरवठ्याच्या दृष्टीनेच असतील. आता मूळ मुद्दा हाच गॅस पुढे भारतात न्यायचा असेल, तर भारतासोबत संबंध चांगले ठेवण्याचे आव्हान पाकसमोर असेल. ज्या देशाची निर्मिती आणि वाटचालच भारत द्वेषावर झाली त्या देशाला स्वत:त इतका आमूलाग्र बदल करणे अशक्य आहे. पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानात स्थिरावलेला तालिबान हाही कळीचा मुद्दा आहेच. भारत वगळता शेजारच्या सर्वच देशात कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. पाकिस्तान अराजक असल्याचे रंजक कथांसाठी जगाचे त्याच्याकडे लक्ष आहे. इतके अर्तविरोध असूनही भारत आपली वाटचाल यशस्वी का करीत आहे याचा विचार आपण केला पाहिजे.

Powered By Sangraha 9.0