‘मार्ने’ची चीनला धास्ती

30 Jan 2023 10:56:09
French Navy ship Marne

मार्ने युद्धनौका (Credit - @ThingsNavy)


कोरोनाने आधीच घायाळ झालेल्या चीनला निसर्गाबरोबरच जागतिक स्तरावर बदलत्या समीकरणांनीही हैराण केले आहे. एकेकाळी मोठा डामडौल असणार्‍या चीनला आता देशातील अंतर्गत कलह सांभाळणे मुश्किल झाले आहे. त्यातच आता फ्रान्सच्या एका चालीने चीनला पुन्हा धक्का बसणार हे नक्की.


भारत-चीनमधील सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्सचे सर्वात धोकादायक अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका मुंबईत आली आहे. त्यामुळे चीनला धडकी भरणे साहजिकच. फ्रान्सच्या या पावलाने चीनमध्ये अनेक राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. फ्रेंच नौदलाची सर्वांत शक्तिशाली आणि धोकादायक असलेली विमानवाहू युद्धनौका ‘मार्ने’ ही नुकतीच भारतात सदिच्छा भेटीवर आली आहे. ही विमानवाहू युद्धनौका मुंबईत पोहोचताच चिनी नौदल सतर्क झाले आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. भारत आणि फ्रान्सच्या जवळीकतेने चीनसह अन्य देशांनाही तितकाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


दरम्यान, फ्रान्सकडे शक्तिशाली ‘मार्ने’ ही विमानवाहू युद्धनौका असली तरी भारतही फ्रान्सपेक्षा काही कमी नाही. भारताकडे ‘आयएनएस विक्रांत’ हे शक्तिशाली विमानवाहू जहाज आहे, ज्याचा जगातील धोकादायक विमानवाहू जहाजांमध्ये समावेश होतो. विशेष म्हणजे, भारत आणि फ्रान्स यांची जवळीक ही काही नवी नाही. दोन्ही देश हे जुने संरक्षण भागीदार आहेत. नुकतेच दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सहकार्य क्षेत्रासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण करारही झाले.

फ्रान्सने जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली मानली जाणारी ‘राफेल’ लढाऊ विमानेही भारताला दिली. ‘राफेल’ करारावरून भारतात मोठा वादंग उठल्यानंतरही फ्रान्सने या व्यवहारात कोणताही बदल केला नाही. ‘राफेल’ करारामुळे भारताच्या हवाई दलाला आणखी मजबूती मिळाली. तसेच, पाकिस्तानसह अन्य देशांनाही योग्य तो संदेश गेला.


एवढेच नाही तर फ्रान्सने भारताचा ‘संरक्षण कॉरिडोर’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ची यशस्वी वाटचाल पाहून संरक्षण क्षेत्रात भागीदारी करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. फ्रान्स हा भारताचा सर्वांत महत्त्वाचा आणि विश्वासार्ह मित्र मानला जातो. फ्रान्सला भारतासोबत संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करायचे असून त्यांना त्यांच्या फ्रेंच तंत्रज्ञानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला आणखी मजबूत आणि शक्तिशाली बनवायचे आहे. या मुद्द्यावर भारत आणि फ्रान्समध्ये चर्चादेखील सुरू आहे.



दरम्यान, नुकतेच मुंबईत दाखल झालेले फ्रेंच नौदलाची ही ‘मार्ने’ नामक विमानवाहू युद्धनौका अणुऊर्जेवर चालते. भारतभेटीवर आलेली ही युद्धनौका काही दिवसांत पुन्हा मायदेशी म्हणजेच फ्रान्सला रवाना होणार आहे. अणुऊर्जेवर चालणारी ही विमानवाहू युद्धनौका ’चार्ल्स डी गॉल’च्या कॅरियर स्ट्राईक ग्रूपचा (उडॠ) एक भाग आहे. या युद्धनौकेचे नेतृत्व फ्रेंच कमांडर पियरे-अल्बान पेनक्रेजी यांच्याकडे आहे.


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना माहीत आहे की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळचे मित्र आहेत. या दोन नेत्यांची भक्कम ‘केमिस्ट्री’ही चीनसाठी चिंतेचे कारण बनली आहे. ’चार्ल्स डी गॉल’ आणि इतर ‘सीएसजी’ जहाजे फॉरबिन आणि प्रोव्हन्स गोव्यात ठेवण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कमांडर पेनक्रेजी यांनी भारताच्या ‘वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस’ अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, बरेच दिवस हे जहाज बंदरातच होते. यादरम्यान फ्रान्सच्या पथकाने भारतातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटीसुद्धा दिल्या.


गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समधील मैत्री वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. संरक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतात. ही घनिष्ठ मैत्री चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग जाणून आहेत. त्यामुळे फ्रान्सची वाढती जवळीक ही खटकणारी बाब तर होतीच, परंतु आता ‘मार्ने’ या शक्तिशाली युद्धनौकेच्या भारतभेटीने चीनच्या चिंतेत आणखी भर पडणार हे नक्की...


- 7058589767



Powered By Sangraha 9.0