दमदार ! पाऊल पडते पुढे...!

30 Jan 2023 19:42:40
modi


गेल्या दशकात भारतात ज्या आमूलाग्र सुधारणा झपाट्याने झालेल्या दिसतात, त्यात प्रत्येक भारतीयाने दिलेले योगदान अतिशय बहुमूल्य आहे, मग ती ‘डिजिटल’ क्षेत्रातील क्रांती असो की इतर देशांचा भारताकडे बघण्याचा (आधीच्या तुलनेत) आताचा सकारात्मक दृष्टिकोन...! यातून भारताची वाटचाल दमदार होताना दिसते, त्यामुळे ‘मोदी क्वश्चेन’सारख्या निर्बुद्ध मुद्यांना सामान्य जनता भिक घालत नाही हेदेखील अधोरेखित करणे गरजेचे वाटते.


भारताला राष्ट्रवादी हिंदू देश असे उपहासात्मक म्हणणे आजकाल विदेशी ठरावीक माध्यमे आणि त्यांची तळी उचलणारी या देशातील तथाकथित अल्प जमात धन्यता मानत आहे, मात्र ते कधी इसाई राष्ट्रवाद हा शब्द प्रयोग करण्याचे धाडस करीत नाहीत, असे उत्तर देऊन भारताचे कुशाग्र बुद्धीचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी नेमके त्यांच्या भित्रेपणावर बोट ठेवले.


पुण्यात आयोजित त्यांच्या ’द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर न अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद (’भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’) या कार्यक्रमात त्यांनी अशा तथाकथित भारताला बदनाम करण्याचा कार्यक्रम आखलेल्या कंपुला सडेतोड उत्तर देत गेल्या दहा वर्षांत भारतात जे आमूलाग्र बदल होताहेत ते लोकांच्या भल्यासाठीच होत असल्याचे उदाहरणासह पटवून दिले.

...आणि खरोखरच घडतेही तसेच आहे. कारण, भारतात झालेली ‘डिजिटल’ क्रांती हे त्याचे ठळक उदाहरण आहे. ग्रामीण संस्कृतीशी एकरूप असलेल्या भारतीयाला तू गावातच खितपत पड अशी जी आधीच्या सरकारांची वागणूक लोकांप्रती होती ती आता पूर्णतः बदलली आहे, स्वांतत्र्य मिळून देखील गुलामगिरीत राहा, नोकरशहांच्या जोखडात सामान्य माणसाला अडकवून ठेवत त्या सरकारांनी धोरणे राबविली त्यामुळे ना भारताच्या नागरिकाला धड शहरात रमता येत नव्हते आणि ना कधी ग्रामीण भागातील समस्यांच्या विळख्यातून बाहेर निघता येत नव्हते. नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान होताच ही सर्व बंधने दूर केलीत.


 ज्या गावातील लोकांना बँकेचे पासबुक हाताळता येत नव्हते, त्याला व्यवहारचातुर्य बनण्याची मुभा दिली. प्रत्येक नागरिकाचे (बँक खाते) पासबुक, शिवाय जीवनविम्याची हमी, प्रत्येकाच्या घरात मोबाईल फोनमुळे सहज होणारे आर्थिक व्यवहार यामुळे सामान्य माणूस आपल्या जगण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होत आहेत हे मान्य करू लागला. आज ‘डिजिटल क्रांती’ हे या सरकारच्या अशा भ्रष्टाचारमुक्त धोरणाचे मोठे यश आहेत, थेट खात्यात जमा होणारी रक्कम भारतीयाला त्याच्या जगण्यातील काळानुरूप बदलला प्रोत्साहित करू लागली, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारे या सामान्य माणसाचे थेट योगदान दिसू लागले. यासाठी मोदी सरकारने कधीच लाभ घेणार्‍या नागरिक कोणत्या जातीचा अथवा धर्माचा आहे हा भेदभाव केलेला दिसत नाही, मग हा हिंदुस्थान नावाने प्राचीन परंपरा असलेल्या भारताचा हिंदू राष्ट्रवाद असेल, तर त्यात गैर काय?


digital india


 मूठभर लोकांना केवळ या पृथ्वीतलावावरील बहुसंख्य हिंदूंच्या भारतातील हे वर्तन केवळ एका धर्मापुरते मर्यादित वाटत असेल तर तो त्यांच्या संकुचित विचारसरणीचा दोष आहे. त्यामुळे ना मोदी विचलित होतील, ना हिंदूराष्ट्राभिमानी कोट्यवधी हिंदुस्तानी विचलित होतील. भारत हा ‘वसुधैव कुटुंबकम’ अंगीकारणारा देश आहे. ‘जी २०’ राष्ट्रांनी दाखविलेला विश्वास भारताची ही कार्यपद्धती मान्य करतो हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. गेल्या काही काळात भारत जगातील ज्या बलशाली राष्ट्रांच्या दबावात आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपले विदेश धोरण अवलंबित होता.


ज्यामुळे शेजारी राष्ट्र पाकिस्तानदेखील सतत भारतावर गुरकावत राहिले आणि त्यामुळे भारताची काय अधोगती झाली हे कुणीही मान्य करेल. मात्र, नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि भारताच्या विदेश धोरणातील बदल हे सामान्य माणसालादेखील उमजू लागले. भारतातील असंख्य निरपराध लोकांची अतिरेकी पाळून हत्या घडविणार्‍या देशाची उरी, बालाकोटसारखे धाडसी निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानची तर जिरवलीच, पण त्या आडून भारतावर दबाव आणू पाहणार्‍या बलाढ्य राष्ट्रांनादेखील कठोर संदेश देत आमच्या कारभारात लुडबुड करू नका हा इशारा दिला. त्यानंतर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राष्ट्रांचा तर बदललाच मात्र जी अन्य लहान राष्ट्र होती ती देखील भारताकडे एक मित्र राष्ट्र म्हणून विश्वासाने बघू लागली. हे खरे भारताच्या विदेश धोरणाचे मोठे यश आहे त्यामुळे ‘जी २०’ राष्ट्राचे भारताकडे यजमानपद येणे आणि या सर्व राष्ट्रातील लोकांना भारत देश नेमका काय आहे हे दाखविण्याची संधी भारताने साधली.

जागतिकीकरण स्वीकारण्यास भारताने उशीर केला त्याचवेळी ही संधी चीनने साधली. मात्र, येथील त्यावेळेसच्या सत्ताधीशांनी भ्रष्टाचाराचे पोषण करण्यात धन्यता मानली आणि चीन आपल्यापुढे निघून गेला, आज हेच लोक भारताची १९६२ मध्ये त्यांच्या काळातील चीनने बळकावलेली जागा जणू काही मोदींच्या काळात चीनच्या ताब्यात गेल्याचा आविर्भाव आणून या सरकारला दोष देण्यात धन्यता मानतात. मात्र, त्यांनी उदारीकरण काळात तंत्रज्ञान स्वीकारून वाटचाल केली असती, तर चीनची दादागिरी एवढी वाढली तर नसती. मात्र, आपल्याच देशातील युवकांचे कौशल्य उपयोगात आणता आले असते. मात्र, तेव्हाचे सरकार ‘टू जी’ घोटाळे करण्यात मश्गूल राहिले, यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर बोकांडी बसला, आज मोदी सरकारने राबविलेले धोरण इतके उपयुक्त ठरत आहे की, आपल्याच देशातील तरुणांचे कौशल्य विकसित करीत या क्षेत्रात आपण आघाडी घेत आहोत. भारताचे... होय ! हिंदू राष्ट्राचे हे बदलत्या काळानुसार पडणारे ’दमदार पाऊल’ आहे हे मान्य करावेच लागेल.


-अतुल तांदळीकर



Powered By Sangraha 9.0