सर्दी-पडसे आणि घरगुती उपचार

    03-Jan-2023
Total Views |
 flu

सध्याचे बदलते तापमान व वातावरणात होणार्‍या सततच्या बदलांमुळे विविध संसर्गजन्य रोगांचे आजार बळावले आहेत. तेव्हा, अशा आजारांपासून आपला बचाव कसा करावा व इंग्रजी नवीन वर्षाची एकंदरच सुरुवात आरोग्यपूर्ण कशी करावी, याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया...


खरंतर डिसेंबर-जानेवारी या दरम्यान थंडीही असतेच. पण, या वर्षी सतत थंडी नाही. काही दिवस दरवर्षीपेक्षा अधिक थंडी भासते व अन्य दिवशी उन्हाळ्यातील एक दिवस असावा, असे प्रचंड उकडते. भारतातील तसेच विदेशातील इतर ठिकाणी होणार्‍या वादळांमुळे किंवा अतिबर्फवृष्टीमुळे यावर्षी नेहमीच्या सरासरीपेक्षा काही दिवसांसाठी थंडी जास्तच प्रमाणात जाणवली. तसेच दरवर्षीपेक्षा हवेतील प्रदूषण ही विशेषत: मोठ्या शहरांमधून यंदा अधिक प्रमाणात दिसून आले. विविध ठिकाणी चाललेले बांधकाम, खोदकाम व थंडी या तिन्हीच्या मिलाफामुळे विविध आरोग्यविषयक तक्रारी उत्पन्न झाल्या. विशेषत: श्वसन संस्थेशी निगडित. तेव्हा, त्याविषयी माहिती जाणून घेऊया.

सध्या सर्दी-पडसं घरोघरी असेच एकंदर चित्र दिसून येते. त्याचबरोबर घसा दुखणे, आवाज बसणे, कोरडा खोकला अशाही तक्रारी आहेत. औषधोपचाराने थोडे बरे वाटले, पण पुन्हा या तक्रारींचा जोर वाढतो. काहींना डेंग्यू व तत्सम रोगांचीही लागण झाली. काहींना डोळे येणे, डोळे लाल होणे, चिकटणे इ. लक्षणे जाणवतात. नेहमीच्या सांधेदुखीचे दुखणेही या ऋतूमध्ये अधिकच बळावते. श्वसनाच्या विविध तक्रारीही तोडीस तोड उभ्या आहेत. दूषित हवा हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण. पण, या लक्षणांची तीव्रता व सातत्याने, वारंवार होणार्‍या दुखण्याला आपली प्रतिकारशक्तीदेखील तितकीच जबाबदार आहे. तेव्हा, लक्षणांची तीव्रता व अवधी कमी करण्यासाठी काही साधे सोपे उपाय केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो. त्याबद्दल थोडीशी विस्ताराने माहिती करुन घेऊया.
 
सुका खोकला ज्यांना सतावतोय, त्यांची हमखास झोपमोड होते. कारण, खोकल्याची उबळ प्रामुख्याने रात्री, मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे असतेच असते. हे टाळण्यासाठी रात्री कानात कापूस घालावा. गळ्याभोवती उबदार (जसे मफलर) गुंडाळावे. (हलके गुंडाळावे, गच्च नव्हे) ज्या खोलीत झोपाल, ती खोली खूप गार नसावी.लादीवर झोपत असाल, तर गार लादीवर झोपणे टाळावे. घोंगडी/चटई/जाझम काहीतरी अंथरुन मग झोपावे. पंख्याखाली, खिडकीजवळ (जेणेकरून थंड हवेचा स्पर्श कमी होईल) झोपू नये.

औषधोपचार सुरु असल्यास त्यांचे वेळेत सेवन करावे. रात्री उशिरा औषध घेताना गार पाणी घेऊ नये. खोकल्याची उबळ होत असल्यास गरम पाणी प्यावे. तोंडात ज्येष्ठमधाचा तुकडा धरावा. बेहड्याची साल चोखावी. लवंग चोखावी किंवा हळद-मध चाटण घ्यावे. चाटण घेतल्यावर त्यावर पाणी पिऊ नये. त्या चाटणाचा घशाला आतून लेप/थर थोडा वेळ राहू द्यावा. लहान मुलांच्या गळ्यात लसणांची माळ घालावी. याने कफ कमी होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी चेहर्‍याला, मानेला, छातीला तेल लावावे, चोळावे व मग वाफ घ्यावी. वाफ घेताना त्यात दोन थेंब निलगिरी तेलाचे घालावेत. नाकात गाईचे तूप दोन थेंब घालावे. कपाळ-डोकं जड वाटत असल्यास वेखंडाचा दूधातून किंवा तूपातून लेप लावावा. गळ्याला ही लावल्यास फायदा होतो.

सकाळी शौचशुद्धी झाल्यावर मुखप्रक्षालन,दंतधावन झाल्यावर गरम पाण्यात हळद व मीठ घालून गुळण्या कराव्यात. दिवसभरातून तीन-चार वेळा गुळण्या केल्यास उत्तम. दिवसभर तहान लागेल तेव्हा गरम पाणीच प्यावे. लादी खूप थंड असल्यास पायात मोजे/पादत्राणे घालावीत. घराबाहेर पडताना आवर्जून नस्य करावे (नाकात गाईचे तूप दोन-दोन थेंब घालून बाहेर पडावे.) औषधी तेलाने नस्य करायचे असल्यास तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. वाफही कशी घ्यावी, किती वेळ घ्यावी, कोणी घ्यावी, कोणी नाही, याबद्दल तज्ज्ञ वैद्यांना नक्की विचारावे. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा औषध म्हणून एखादे द्रव्य/घटक वापरले जाते, तेव्हा त्याचा गुण येण्यासाठी विशिष्ट मात्रेत वा पद्धतीनेच ते वापरणे गरजेचे आहे, अन्यथा ‘अति तेथे माती’ या म्हणीप्रमाणे होतं व अपायांना सामोरे जावं लागतं. आहारदेखील प्रत्येकाला तसाच सहन होत नाही. खूप गोड, तिखट, खारट, आंबट इ. सगळेच सारखे पचवू शकत नाहीत. जर अन्नाची ही स्थिती आहे, तर औषधदेखील एकाला बरे वाटले म्हणून तसेच त्याच प्रमाणात दुसर्‍याने स्वतःच्या बुद्धीने वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. त्याने तर अपाय झाला, तर तो फायदा करण्याऐवजी नुकसान करेल, याचा विचार नक्की करावा.

आहारातून सर्दी-पडसे असताना थंड तापमानाचे व थंड प्रकृतीचे अन्नपदार्थ यांचे सेवन करु नये. तसे थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, सरबते, आईस्क्रिम इ. तसेच रात्रीच्या वेळेस फळे खाणे टाळावे. खूप कफ असताना दिवसाही केळी, पेरू, सीताफळ टाळावीत. तळलेल्या गोष्टी टाळाव्यात. गरम पाणी प्यावे किंवा तुळस, बेल, गवती, चहा, लवंग, डाळिंबाचे साल इत्यादीचा काढा करून गरम-गरम प्यावा. काही वेळेस खोकल्याची खूप उबळ येते. पाणी पिणेही शक्य होत नाही. असे असल्यास थोडी खडीसाखर आधी खावी वा चोखावी. गरम पिशवीने मान, घसा, गळा, छाती, पाठ, तळ शेकावे व नंतर गोडतेल/मोहरीचे तेल दोन चमचे (फक्त) गरम करून चिमटीभर मीठ घालून प्यावे. सुका खोकला कमी होण्यासाठी स्नेहपानाची गरज असते, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच ते करावे.

बरेचदा सर्दी, खोकला, ताप असताना रात्री शांत झोपस लागत नाही. सकाळी थकवा, मरगळ जाणवते. अशा वेळेस शारीरिक व मानसिक विश्रांती घ्यावी. कामावरून रजा घेतल्यास घरीदेखील सतत लॅपटॉप/मोबाईलवर काम, करमणुकीचे कार्यक्रम बघू नयेत. जेवढी विश्रांती, झोप घेतली जाते, तेवढे लवकर बरे वाटते, तजेला वाढतो आणि थकवा दूर होतोतोंडाला चव नसल्यास, भूक लागलेलीनसल्यास लंघन करावे. अशा वेळेस बिस्किट्स खाऊ नयेत. भाताची पेज, त्यात तूप, मीठ, लिंबू किंवा थोड्या भाताच्या लाह्या किंवा भाजणी थालिपीठ खावे. तळलेले, चमचमीत तिखट पदार्थ टाळावेत. भूक लागली की पचायला हलका असा आहार घ्यावा. मांसाहार करणार्‍यांनी चिकन सूप घ्यावे. पण, अन्य मांसाहार टाळावा. झोपणे, आराम करणे जशी शारीरिक विश्रांतीसाठी गरजेचे आहे, तसेच लंघन करणे हे पचनशक्तीसाठी गरजेचे असते.

ताप येऊन गेला की, शरीराला पूर्ववत होण्यास थोडा कालावधी लागतो. तसेच पचनशक्तीसुद्घा पूर्ववत होण्यास वेळ लागतो. म्हणून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड इ. संक्रामक आजारांनंतर वजन कमी होणे, खूप दिवस थकवा राहणे, सांधे दुखणे, ताठरणे, भूक मंदावणे इ. बरीच लक्षणे नंतरही शिल्लक राहतात. ही लक्षणे पूर्णपणे दूर होईपर्यंत पथ्यपाणी करावे. (थोड्या फार प्रमाण बदल केल्यास चालतो.) पण, पुन्हा पुन्हा त्यांची लागण होऊ नये, असे वाटत असल्यास काळजी घेणे उत्तम.डोळे लाल होणे, चुरचुरणे, वाहणे, चिकटणे, दुखणे, खुपणे यापैकी कोणतीही लक्षणे दिल्यास साध्या पाण्याने डोळे अधूनमधून पुसावेत. सूर्यप्रकाशापासून डोळ्यांना जपावे. तसेच उजेडापासून व रेडिएशनपासूनसुद्घा दूर राहावे. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यांनुसार औषधोपचार करावेत. उन्हातून/घराबाहेर पडतेवेळी डोळ्यांवर चश्मा/गॉगल घालावा. ऊन व धुळीपासून डोळे सुरक्षित ठेवावेत. याप्रमाणे काही विशिष्ट बदल जर दैनंदिन जीवनात केले, तर वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाहीत व झाल्याच, तर त्यांची तीव्रता व अवधी कमी राहतो.




वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व
पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)