द्रौपदी मुर्मू यांच्या वाटचालीचा धावता आढावा

    29-Jan-2023
Total Views |
President of India Draupadi Murmu


द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिल्या वनवासी राष्ट्रपती लाभल्या आहेत. त्यांच्या वाटचालीचा धावता आढावा घेणारे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या ‘जयकर’ ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल डॉ. शां. ग. महाजन यांनी लिहिले आहे. डॉ. महाजन यांनी यापूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ’रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन’ हे चरित्र लिहिले आहे आणि त्याच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर काहीच महिन्यांत डॉ. महाजन यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अर्थात, हे करताना यासाठीचे संदर्भ कोणत्याही पुस्तकात सहज उपलब्ध नव्हते, ही अडचणही त्यांनी विशद केली आहे. तेव्हा अनेक वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमे यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. येथे अवश्य नमूद केली पाहिजे ती बाब म्हणजे, डॉ. महाजन वयाच्या नव्वदीत आहेत आणि त्यांच्या नावावरदेखील ९० हून अधिक पुस्तके आहेत.


प्रस्तुत पुस्तकाची रचना लेखकाने दोन भागात केली आहे. पहिला भाग हा मुर्मू यांच्या वाटचालीशी आणि त्या राष्ट्रपती होण्याच्या प्रवासाशी निगडित आहे, तर दुसरा भाग हा राष्ट्रपतीपद याच्याशी निगडित आहे. पहिल्या भागात लेखकाने मुर्मू यांच्या जीवनप्रवासाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. मुर्मू यांचे बालपण, शिक्षण, राजकारणात त्यांनी केलेले पदार्पण, नगरसेवक, आमदार म्हणून त्यांची झालेली निवड, झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांची झालेली नियुक्ती याचा थोडक्यात मागोवा लेखकाने घेतला आहे. मुर्मू यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात सहन करावे लागले- त्यांच्या मुलांचा, पतीचा मृत्यू त्यांना पाहावा लागला. त्यातून सावरलेल्या मुर्मू यांनी आपल्या पतीच्या आणि मुलांच्या स्मृत्यर्थ पहाडपूर येथे निवासी शाळा सुरू केली, असा उल्लेख लेखकाने केला आहे.


 या आढाव्यानंतर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील ठळक घडामोडींचा मागोवा लेखकाने घेतला आहे. विविध वृत्तपत्रांत त्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख यांचे संकलन केले आहे. यशवंत सिन्हा आणि मुर्मू यांच्यात झालेल्या लढतीतील विविध कंगोर्‍यांचे हे संकलन या निवडणुकीतील विविध टप्प्यांची माहिती देणारे आहे. प्रचारासाठी मुर्मू यांनी विविध राज्यांचा केलेला दौरा, निवडणुकीत कोणत्या राज्यातून कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, मुर्मू यांचा झालेला विजय, त्यानंतर झालेला जल्लोष आणि अभिनंदनाचा वर्षाव इत्यादी भाग लेखकाने वृत्तांच्या आधारे संकलित केला आहे. मुर्मू या राष्ट्रपती झाल्या आणि त्यांनी त्या पदाची सूत्रे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वीकारली. मावळते राष्ट्रपती कोविंद यांच्यावर योगिता साळवी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये लिहिलेला ’समर्पित कारकिर्द’ हा लेख (२४ जुलै २०२२) देखील पुस्तकात लेखकाने आवर्जून समाविष्ट केला आहे.


 राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू यांनी केलेले भाषण, त्यात व्यक्त केलेल्या भावना याही पुस्तकात वाचायला मिळतील. काही वृत्तपत्रांत मुर्मू यांच्या निवडीनंतर प्रसिद्ध झालेले अग्रलेखदेखील पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत.पुस्तकाच्या दुसर्‍या भागात राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया, राष्ट्रपतींचे अधिकार, काही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील तणावपूर्ण संबंध इत्यादी माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतीभवनाबद्दल दिलेली माहिती रंजक. ही वास्तू उभारायला ब्रिटिशांना १७ वर्षे लागली होती, अशी माहिती लेखकाने दिली आहे. राष्ट्रपतीभवनाच्या अंतरंगाचे पैलूही लेखकाने उलगडून दाखविले आहेत. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होण्याच्या निमित्ताने या पदाशी निगडित विविधांगी माहिती लेखकाने संकलित केली आहे. वाचकांना एकाच ठिकाणी अनेक बाबींची माहिती त्यामुळे मिळू शकेल. मजकुराला पूरक छायाचित्रे पुस्तकात अंतर्भूत करण्यात आली आहेत.


पुस्तकाचे नाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
लेखक : डॉ. शां. ग. महाजन
प्रकाशक : युनिव्हर्सल प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : १४०
मूल्य : रु. २००
९८२२८२८८१९


-राहूल गोखले

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.