कोणतीही शक्ती भारताला संपवू शकत नाही!

पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

    29-Jan-2023
Total Views |
Narendra Modi
 
नवी दिल्ली: “भारताला भौगोलिक आणि वैचारिकदृष्ट्या तोडण्याचे अनेक प्रयत्न अनेकवेळा झाले. मात्र, कोणतीही शक्ती भारताला संपवण्यास समर्थ नव्हती आणि कोणतीही शक्ती भारताला आजही संपवू शकत नाही,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. राजस्थानमधील भिलवाडा येथे आयोजित भगवान देवनारायण यांच्या 1111व्या ‘अवतरण महोत्सवा’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“भारत हा केवळ एक भूभाग नाही, तर आपली नागरी संस्कृती, सौहार्द आणि अमर्याद संधी यांची हा देश अभिव्यक्ती आहे. जगातील इतर अनेक प्राचीन संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. मात्र, भारतीय संस्कृतीत असलेल्या लवचिकतेमुळे आणि आपल्या चिवट स्वभावामुळे भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे. भारताला भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या तोडण्याचे अनेक प्रयत्न होत असले तरी कोणतीही शक्ती भारताला संपवू शकली नाही आणि भविष्यातही संपवू शकणार नाही,”असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भगवान देवनारायण यांचा संदेश आणि त्यांची शिकवण पुढे नेण्यात गुज्जर समाजाच्या नवीन पिढीच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. ते पुढे म्हणाले, “गुज्जर समाजाचेही सक्षमीकरण करतील आणि देशाला पुढे जायलादेखील मदत करतील,” असे त्यांनी नमूद केले. राजस्थानच्या विकासासाठी 21व्या शतकाचा काळ महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी संघटित होऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. भारताने संपूर्ण जगात सिद्ध केलेल्या आपल्या सामर्थ्यामुळे, योद्ध्यांच्या या भूमीचा अभिमानही वाढला आहे. भारत आज इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी करत, जगातील प्रत्येक मोठ्या व्यासपीठावर अखंड आत्मविश्वासाने बोलत आहे. आपण आपले संकल्प पूर्ण करून जगाच्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरायला हवे,” असेही पंतप्रधान म्हणाले.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.