श्याम मानव, इतके कराच!

    28-Jan-2023
Total Views |
 
Shyam Manav
 
बागेश्वरधाम सरकार पिठाधिश्वर धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या विरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे प्रा. श्याम मानव नागपूरमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्यानुसार तक्रारही दाखल केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला असे चौकशीअंती स्पष्ट दिसत नाही, असा निर्वाळा दिला. पुढे शास्त्री आणि मानव या दोघांनीही एकमेकांना आव्हान दिले. या घटनेचा उहापोहकेल्यानंतर काही प्रश्न मनात आले, ते या लेखात विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
 
बागेश्वरधाम सरकार पिठाधिश्वर धीरेंद्र कृष्णा शास्त्री हे फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवतात, असे अंनिसचे श्याम मानव म्हणाले. त्यानंतर दररोज त्यावर अनेक नवनवीन चर्चा झाल्या. धीरेंद्र शास्त्री यांचे म्हणणे की, ”गेल्या डिसेंबर महिन्यात नाताळच्या वेळेसच त्यांनी दमोह मध्य प्रदेश येथील 165 कुटुंबातील 368 व्यक्तींची पुन्हा हिंदू धर्मात ‘घरवापसी’ केली. त्यांनी पूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यानंतरच त्यांच्यावर ख्रिस्ती आणि चर्चधार्जिण्या संस्था-व्यक्तींकडून आरोप करण्यात येत आहेत. ते हिंदू धर्माचा प्रसार-प्रचार करतात, प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमानजींचे पूजन करतात आणि जनमानसात त्यांचे स्तवन करतात, म्हणूनच त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे.”
 
श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या विरोधानंतर रामदेव बाबा तसेच अखिल भारतीय संत समिती आणि निरंजन आखाडाही धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या समर्थनार्थ उतरला.त्यांनी म्हटले की, ”धीरेंद्र शास्त्री हिंदूंचे पुनर्वसन करतात, आध्यात्मिक दृष्टीने हिंदू धर्माचे संघटन करतात, त्यामुळे वामपंथी आणि ख्रिस्ती चर्च संस्था त्यांना विरोध करत आहे. त्यांच्यावर आरोप करत आहेत.” इतकेच काय भारताच्या कानाकोपर्‍यातून करोडो हिंदू जमेल त्या माध्यमातून धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या समर्थनार्थ उतरले. जबलपूर येथील भिष्मदेव शर्मा यांनी तर श्याम मानव यांच्या विरोधातच याचिका दाखल केली. त्या याचिकेत नमूद केले की, स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी श्याम मानव यांनी करोडो हिंदूंच्या भावनाना ठेच पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांचे व्याख्यान शहरात होऊ नये, म्हणून नागपूर येथे नागरिकांनी निवेदन दिले होते. त्यांचे मत होते की, श्याम मानव हिंदू धर्म, आस्था, संत यांच्या विरोधात बोलून समाजस्वास्थ्य खराब करतात. कालपरवा श्याम मानव यांना कुणीतरी धमकीही दिली. त्यामुळे आता तर श्याम मानव यांच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली. 24 तास सात जण त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात केले जाणार आहेत.
  
दुसरीकडे श्याम मानव यांनी काय म्हटले की, ते देव-धर्माच्या विरोधात नाहीत. त्यांनी आजपर्यंत बुवाबाजीची 200 प्रकरण उघडकीस आणली आहेत. त्यांचे गुरू म्हणे ए. टी. कोव्हूर नसून विनोबा भावे, दादा धर्माधिकारी आणि ‘तरुण भारत’चे पूर्व संपादक माधव वैद्य आणि दि. बा. घुमरे होते. तसेच, आपण धीरेंद्र शास्त्री यांना पाखंडी म्हटले नसून ते फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवतात.
 
या सगळ्या प्रकरणाचा वेध घेताना श्याम मानव आणि त्यांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ज्या स्वप्रचितीचा आग्रह धरते, त्यानुसार श्याम मानव यांनी म्हटलेले वरील उद्गार यांचे विवेचन केले तर? त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संकेतस्थळावर एक चक्कर टाकायलाच हवी. जर श्याम मानवांचे गुरू विनोबा भावे, दादा धर्माधिकारी आणि वैद्य किंवा घुमरे हे आहेत, तर त्यांच्या विचारांचा कुठेही स्पष्ट उल्लेख या संकेतस्थळावर होताना दिसत नाही. आपण श्रीलंकेचे रहिवासी असलेल्या ख्रिस्ती ए. टी. कोव्हूर यांचे शिष्य नव्हतो, असे श्याम मानव म्हणतात. मात्र, त्यांच्या संकेतस्थळावर ‘युजफूल लिंक्स’ म्हणून श्याम मानव यांचे व्हिडिओ आणि ए. टी. कोव्हूर अशा दोन लिंक्स टाकलेल्या आहेत. मग हे कोव्हूर आणि त्यांचे जे काही विचार आहेत, ते श्याम मानव त्यांच्या संकेतस्थळावरून का बरं प्रसारित करत असतील? तसेच श्याम मानव ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या स्थापनेबद्दल आणि सुरुवातीच्या कार्याबद्दल लिहितात की, सुरुवातीला ‘रॅशनॅलिस्ट असोसिएशन’, ‘बुद्धी प्रामाण्यवादी मंच’, ‘मानवीय नास्तिक मंच’, लोक विज्ञान संस्था त्यांच्या सुरुवातीला ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चे काम करायचे. यातीलच काही लोकांनी एकत्र येऊन मग ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. हे सगळे सांगण्याचा मुद्दा हा की, त्यांनी ज्या संस्थेचा उल्लेख केला ती ‘रॅशनॅलिस्ट असोसिएशन’ ही संस्था श्याम मानव यांनी नाकारलेल्या ए. टी. कोव्हूर यांच्या विचारांवर चालणारी संस्था आहे. थोडक्यात, श्याम मानवांनी कालपरवा कोव्हूर यांचे शिष्यत्व नाकारले तरी ते खरे आहे का? असाच प्रश्न पडतो.
 
तसेच श्याम मानव म्हणतात की, आम्ही देवधर्माच्या विरोधात नाही. त्यांच्या या विधानाचे हिंदू स्वागतच करतात. पण, त्यांच्या या विधानावर प्रश्न उपस्थित होतील, असे वास्तव आहे. ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे ‘लढा’ नावाचे मासिक प्रकाशित व्हायचे (आता होते की नाही माहिती नाही) ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चा ‘लढा’आणि त्याबद्दल जागृती करण्याचे काम हे मासिक करते, असे श्याम मानवासंहित त्यांच्या सर्वच सहकारी सदस्यांचे म्हणणे असणारच, तर या मासिकांमधील लेख वाचले. प्रत्येक अंकात कुठच्या न कुठच्या बुवाबाजीचा पर्दाफाश कसा केला, याचा वृत्तांत असायचा. त्यानंतर जे लेख असायचे त्यातले मजकूर वाचले की वाटते, आपण ‘अंधश्रद्धा निर्मूलना’संदर्भातील साहित्य वाचतोय की टिपिकल हिंदूविरोधी अभियान चालवणारे तद्दन फालतू काही तरी वाचतोय? गाय, ब्राह्मण, मनुवाद हिंदू चालीरीती यांच्या विरोधात एककलमी जाहिरात चाललेलीवाटावे, असे साहित्य. यामध्ये स्वामी विवेकानंद हे कसे प्रखर साम्यवादी आहेत आणि भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत ब्रिटिशांचा कसा वाटा आहे आणि संविधानातील मसुद्यावर ब्रिटिशांच्या उत्तम प्रशासनाची छाप आहे, असे सांगणारे लेख.
 
या ‘लढा’ मासिकातील एका लेखात दत्तप्रसाद दाभोलकर लिहितात की, “बरे झाले 1857चे बंड फसले नाही, तर पेशवाई आली असती आणि आमच्या शाळा बंद पडल्या असत्या. पायात काठी आणि हातात मडके आले असते. ही स्थिती परत आली असती. बाबरी मशीद उद्ध्वस्त करून या देशातील सामाजिक सद्भावना नाहीशा करून अल्पसंख्याक लोकांच्या धार्मिक भावना दुखवून त्यांना चिरडणार्‍या मंडळींनी जोतिबा फुले काय म्हणाले हे लक्षात घ्या,” असे लिहून या दाभोलकरांनी पुढे सोमेश्वर मंदिर पाडल्यावर जोतिबा फुलेंनी कसा आनंद व्यक्त केला, असा संदर्भ दिला आहे. या संपूर्ण मासिकामध्ये रा. स्व. संघ आणि त्यातही ‘समरसता मंचा’ला दूषणे देण्याचे काम इमानेइतबारे केले आहे. देव आणि धर्मविषयक भूमिका मांडताना श्याम मानव लिहितात, ”हा समाज धर्माला विरोध म्हणजे नीतिमूल्यांना विरोध समजतो. अशा अवस्थेत उगाच धर्मविरोधी भूमिका घेऊन नीतिमूल्ये विरोधी आहोत, अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करून आपल्या कार्याची आपण हानी करत आहोत. देव आहे का नाही, या वादात न पडता देव या कल्पनेची निर्मिती कशी झाली ही समजून घ्यावी.” पुढे देव हे माणसाच्या भीती, एकटेपणातून माणसाने निर्माण केले, याचे ते विस्तृत विवरण देतात. त्यात ते लिहितात, ”हीच गोष्ट आंबेडकरवादी चळवळीतील सामान्य जनतेची. त्यांनी बाबासाहेबांचे शब्द प्रमाण मानून देव-धर्म सोडला. पण, हे देव-धर्म सोडवण्यामागे जी एक संपूर्ण वैज्ञानिक विचार करण्याची प्रक्रिया होती, ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे देव-धर्म सोडलेली लोक ही कर्मकांड जपतात.”
 
याचाच अर्थ “देव-धर्म सोडवण्यामागे एक वैज्ञानिक विचार करण्याची प्रक्रिया आहे,” असे श्याम मानव मानतात. जर त्यांचा देव-धर्माला विरोध नाही, तर मग देव-धर्म सोडवण्याची वैज्ञानिक प्रक्रिया वगैरे बद्दल ते इतके आस्थेने का लिहितात?
 
बहुसंख्य लोकांचे म्हणणे आहे की, श्याम मानव केवळ हिंदूंवरच टीका करतात. त्यांच्याच श्रद्धांवर प्रश्न उपस्थित करतात. असो. श्याम मानव आणि त्यांची ‘अंनिस’संघटना अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कार त्यातून झालेली फसवणूक, शोषण यावर काम करते म्हणे. तर हे सगळे लिहिताना गेल्या वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो.
 
छत्तीसगढच्या दुर्गम जंगलात जात असताना एक सुंदर मंदिर दिसले. काही लोक तिथे रांगोळी घालत होते. या अंधार्‍या दुर्गम जंगलात मंदिर पाहून बरे वाटले. गाडीतून उतरून तिथे जाणार इतक्यात काही युवकच आमच्याकडे आले. कोण कुठून आलात? माझी केशरचना आणि एकंदर दिसणे यावरून ते युवक म्हणाले, “केरला से नन हैं क्या. आईये आईये.” मी म्हंटले ते काय आहे मंदिर आहे का? तर त्यांचे म्हणणे नाही हे नवीन चर्च आहे. ते काय आहे ना आमचा राऊरपाडा ख्रिस्ती झाला. त्यामुळे इथे पूजा होणार आहे. संपूर्णगावाचे ख्रिस्तीकरण कसे? का बरं झालात असे विचारल्यावर ते 20 -21 वर्षांची सुदृढ युवक म्हणाले, ”काही महिन्यांपूर्वी आमच्या इथे पाद्री आलेले. त्यांनी त्यांच्यासोबत आमचे आरोग्य तपासण्यासाठी गाडी आणि मशिनीपणआणल्या होत्या. त्यामध्ये आमच्या देहाच्या आतले चित्र दिसत होते. (एक्सरे) काय सांगायचे आम्ही काम करून इतको थकायचो, अंग दुखायचे. पण, त्यांनी दिलेल्या उदीमुळे आमचे अंग दुखणं थांबलं. पण, आमच्या शरीराच्या चित्रामध्ये दिसलं की, काही लोकांचे हृदय फाटले होते, तर काही लोकांच्या किडन्या तुटल्या होत्या. आम्ही लवकरच मरणार होतो. पण, त्या पाद्रीबुवा आणि तुमच्यासारख्याच दिसणार्‍या नननीआमच्यासाठी प्रार्थना केली.
 
सांगितले की, येशूकडे दया आहे. त्या आकाशातल्या बापाची पूजा करा. तुम्ही बरे व्हाल. वाचाल. आम्हाला महिनाभर पूजा करायला सांगितले उदी दिली. एक महिन्यानंतर ते पुन्हा आले आमच्या शरीराच्या आतल्या भागाचे चित्र परत काढले.(एक्सरे) तर काय सांगायचे आमचे फाटलेलेे हृदय तुटलेल्या किडन्या सरळ झाल्या होत्या. आम्ही थकायचो ते पण बंद झाले होते. हा त्या येशूच्या प्रार्थनेचा चमत्कार आहे. आम्ही सगळे वाचलो ते त्याच्यामुळे नाहीतर काळीज फाटून, आतडे किडनी तुटून आम्ही कधीपण मेलो असतो.” त्यांचे ऐकून काय बोलावे ते सुचलेच नाही. मात्र, आता सूचत आहे की, छत्तीसगढ झाले, झारखंड झाले. या असल्या भागात दुर्गम जंगलात श्याम मानवांसारख्यांची गरज आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडू पाहणार्‍या श्याम मानवांनी झारखंड, छत्तीसगढ नव्हे, मुंबईच्या वस्त्यावस्त्यांवर होणार्‍या चमत्कार आणि त्यातून होणारी फसवणूक शोषण, अत्याचार आणि धर्मांतर यावरही त्यांची कृपादृष्टी वळवावी. कितीतरी वस्त्या आहेत जिथे मूल होत नाही, पती दुसर्‍या बाईकडे जातो, गरिबी आहे, आजारपण आहे, यावर घरातले देव फेका आणि येशूची भक्ती करा, तुमच्या सुटतील म्हणणारे लोक भेटतील. हे सांगणारे लोक हिंदू नसतात. धीरेंद्र शास्त्रींनी श्याम मानवांना रायपूरला बोलावले तिथे ते गेले नाहीत. पण, मुंबई तर आपल्या महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे मुंबईमधल्या या चमत्कारांचा भांडा फोड करायला श्याम मानवांनी नक्की यावे? आणि हो, हे असे चमत्कार करू म्हणणारे हिंदू लोक नाहीत. ही नोंद ठेवा. मग श्याम मानव इतके कराच!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.