व्यावहारिक वेदांत उत्तरार्ध

    28-Jan-2023
Total Views |
 
Swami Vivekananda
 
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित संस्कृत अभ्यासक आणि ‘संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’च्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. कला आचार्य यांचे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ठाणे येथे ‘व्यावहारिक वेदांत’ या विषयावर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. कला आचार्य यांनी अतिशय सोप्या शब्दांत स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत ‘व्यावहारिक वेदांता’चा अर्थ यावेळी उलगडून सांगितला. त्यांच्या याच भाषणाचा हा उत्तरार्ध देत आहोत.
 
आधी बघितले त्याप्रमाणे या सर्व संत-महंत-संप्रदाय यांना एका सूत्रात बांधले पाहिजे. आजचा युवक हे काम निश्चितपणेच करू शकतो. भले युवकांना वाटत असेल की, मी विवेकानंदांच्या संप्रदायाचा भाग होऊ शकत नाही. संस्कृत ग्रंथ वाचले नाही. त्यांचे तत्त्वज्ञान आचरू शकत नाही. पण, मी या सर्वांना एका व्यासपीठावर आणू शकतो. ‘व्यावहारिक वेदांता’मध्येही विवेकानंदांनी ‘आपण सर्व एक आहोत’ असे सांगितलेले आहे. आज आपण या विविध संप्रदायांना एका व्यासपीठावर आणून, एक करून एकात्मता साधू शकतो. ‘विवेक व्यासपीठ’नेसुद्धा हे काम करण्यास हरकत नाही, असे मला वाटते.
 
विवेकानंदांचे विश्वधर्माविषयी विचार काय आहेत, ते पाहूया. विविध धर्म आहेतच, तसेच एका धर्मामध्येसुद्धा विविधता आहे. म्हणजेच धर्मानुसार विविधता असणारच. आता आपण फुलांचं उदाहरण पाहूया. फुलांमध्येसुद्धा गुलाब, जाई, जुई, चमेली असे प्रकार आहेत. त्यांचा गंध, रूप यामध्ये वेगळेपण आहे. केवळ गुलाबाचाच विचार केला तरी त्यात गावठी गुलाबाचा सुगंध वेगळा असतोच ना! इतकंच नव्हे, तर चाफ्याच्या फुलावर भुंगा बसत नाही, असं म्हणतात. का बरं बसत नसेल? त्याविषयी एक वचन आहे की, चाफ्याचं फूल सुंदर आहे, भुंगासुद्धा त्या फुलामध्ये रमू शकतो, पण बलियसि ईश्वरेच्छा! ईश्वराची इच्छा त्यांना एकत्र आणायची नाही. प्रत्येक फूल, त्याची निर्मिती, त्यामागचा हेतू, फुलाचा स्वभाव यात वेगळेपण आहे. याप्रमाणे आपण विचार केला पाहिजे की, जगात अनेक धर्म आहेत. पण, कोणत्याही धर्माने, त्याच्या धर्मग्रंथांनी, संप्रदायाने अधर्माचा, अनीतीचा पुरस्कार केलेला नाही वा करू नये. कोणत्याही धर्माने असत्याची स्तुती केलेली नाही. हे सर्व धर्म परस्परपूरक आहेतच, म्हणून विश्वधर्म, विश्वधर्म असं जे म्हटलं जातं, त्याविषयी विवेकानंद म्हणतात, “हे सर्व धर्म आहेतच. परंतु, जो विश्वधर्म आपण म्हणतो, तो नवीन तयार करायचा नाही. तो अस्तित्वात आहेच. पूर्वापार काळापासून तो समाजाला प्राणवायू पुरवित आहे...” आता या धर्मांमध्ये ‘युनिफॉरमिटी’ आणता कामा नये. प्रत्येक धर्माचं स्वत:चं अस्तित्व, वेगळेपण मान्य करावं, स्वतंत्र अस्तित्व असू द्यावं. फक्त ‘युनिटी’ मात्र असायला हवी. ‘भवतु विश्वमेकम् एकनीडम्।’ असे असायला हवे. ‘भवतु’ हा मी नवीन जोडलेला शब्द आहे. मुळात ते तसे नाही. ऋग्वेदामध्ये शेवटच्या सूक्तात म्हटले आजे की,
 
समानी व आकूति: समाना हृदयानि व:।
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ॥
 
शेवटंच वाक्य महत्त्वाचं आहे की, समानं चित्तं समान हृदयम्। की सर्वांची हृदयं सारखी असू दे. त्यामध्ये विचार सारखे असो आणि ’यथा व: सुसहासति।’ म्हणजे ज्यामुळे सगळे जण एकत्र चांगल्याप्रकारे राहू शकतील. धर्म अनेक असतील, पण त्यांचं या प्रकारचं ऐक्य आपल्याला हे विश्वधर्माचा संदेश देऊ शकतो. हिंदू धर्मात आणि म्हणून प्रत्येक धर्माचं वैशिष्ट्य आहे, हिंदू धर्म हा आध्यात्मिक बलावर बहरला. ख्रिश्चन धर्माने करुणेचा आधार घेतला. इस्लाम धर्म समानतेच्या तत्त्वावर पोसला गेला. या सगळ्यांमध्ये समन्वय असावा, असं विवेकानंदांना वाटतं. ते म्हणतात की, धर्मप्रवाहामध्ये बौद्ध धर्माला नक्कीच महत्त्वाचं स्थान आहे. आद्य शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान थोडं शुष्क आहे. त्याला बौद्ध धर्माने आणि रामानुजार्चायांच्या भक्तिमार्गाने त्याला एक सौम्य स्वरूप प्राप्त करून दिले. भगवान बुद्धांचा मानव धर्म, आचार्य रामानुजांचा भक्तिमार्ग आणि निर्गुण ब्रह्म या सगळ्यांच्या धारणेवर हिंदू धर्म आणि हिंदू दर्शनाचे पोषण झाले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. परंतु, दुर्दैव असे की, बौद्ध धर्म आपल्यापासून दुरावला. बौद्ध दर्शन खरंतर उपनिषदांवर आधारित आहे. परंतु, हे कदाचित थेरवादी बौद्ध अनुयायांना माहीत नसावे. आता बौद्ध धर्म हा उपनिषदांवर आधारित आहे, हे कोणत्या आधारावर म्हणतो? तर परं सुखं निर्वाणम्। निर्वाण म्हणजेच परमसुख, आनंद होय. आपल्याकडेसुद्धा आनंद हेच ब्रह्म मानले जाते. ‘सत् चित आनंद’ हे वचनच आहे. बौद्ध धर्माने केवळ हिंसात्मक यज्ञाला विरोध केला, यज्ञसंकल्पनेला नाही. म्हणून विवेकानंद म्हणतात, “ब्राह्मणांची बुद्धी व तत्त्वज्ञान याच्याशिवाय बौद्ध धर्म उभा राहू शकत नाही आणि ब्राह्मण बौद्धांच्या हृदयाशिवाय राहू शकत नाही.” इथे ब्राह्मण म्हणजे अर्थातच ब्रह्माचे प्रतिपादन करणारा धर्म किंवा व्यक्ती. त्या दोघांचे वेगळे होणे, अलग होणे भारताच्या अवनीतीचे कारण घडले आहे. त्यामुळे वैष्णव संप्रदाय आणि बौद्ध धर्म यांनी तत्त्वज्ञानाला प्रेम भावनेचा आयाम दिला आणि खंडणमंडण रूपी, वादप्रतिपाद रूपी अशा त्या दर्शनाला त्यांनी थोडं सौम्यस्वरूप दिलं.
 
एकदा एका युवकाने स्वामीजींना विचारलं की, “स्वामीजी, मी खूप ध्यान करतो. एकांतामध्ये पूजा करतो, उपासना करतो. पण, माझ्या मनाला शांती मिळत नाही?” स्वामीजी त्याला म्हणाले, “पहिल्यांदा खोली बंद करून, डोळे बंद करून बसणे थांबव. खिडक्या, दारं उघड. शेजारी शेकडो उपाशी आहेत, कुणी आजारी आहे, कुणी निराधार आहे, त्यांना मदत कर. जे दीनदुबळे आहेत, त्यांची सेवा कर. जे आजारी आहेत, त्यांना औषध दे. जे भुकेलेले आहेत, त्यांना अन्न दे आणि जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान दे.” या प्रकारे विवेकानंदांनी तत्त्वज्ञान, दर्शन आणि त्या दर्शनाची प्रायोगिकता काय आहे, तर एकच ब्रह्म सर्वांमध्ये ओतप्रोत भरून राहिले आहे, म्हटल्याबरोबर ध्यान नुसतं की ध्यान करणं, एका पायावर उभं राहणं यांनी आपल्याला काही साध्य होणार नाही. यामुळे कदाचित आपली आध्यात्मिक उन्नती होईल, आपल्याला मोक्ष मिळेल. पण, आपण या समष्टीचा भाग आहोत, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
 
समष्टीसाठी काय करावं, याविषयी स्वामी विवेकानंदांनी परखड मत मांडले आहे.
 
“आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची, पोलादी नसांची गरज आहे. आपल्याला अत्यंत बलवान, जबरदस्त संकल्पशक्तीची गरज आहे. कठोर निश्चयशक्तीची गरज आहे. ज्या इच्छाशक्तीला कोणी संपवू शकणार नाही, विरोध करू शकणार नाही. विश्वाचे रहस्य त्यात असेल. त्यातील गूढ उलगढू शकेल, अशा दुर्द्यम्यशक्तीची गरज आहे. तिला मग भलेही महासागराच्या तळापर्यंत जावे लागले तरी चालेल, मृत्यूशी समोरासमोर सामना करावा लागला तरी न रडता, न घाबरता कोणतेही साहस करण्यामध्ये माघार घेता येणार नाही, अशी इच्छाशक्ती हवी आहे.” असे ओजस्वी विचार मांडून ते पुढे म्हणतात, ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।’ केवला उठ म्हटलं नाही, तर उठल्यावर कर्मयोग करायला सांगितला. कशासाठी उठायचं आहे, ते सांगितलं. निद्रिस्त, निद्रेत असणार्‍या समाजाला कर्तव्याची जाणीव करून दिली. स्वामी विवेकानंदांचं तत्त्वज्ञान पुढे घेऊन जाणं आपलं काम आहे.
कर्मयोगाचे पुढचे उदाहरण म्हणजे, जेव्हा धर्मक्षेत्रावर अर्जुन निराश झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता होय.
धर्मक्षेत्रावर अर्जुन निराशा होऊन बसला होता. त्याचं मुख सुकून गेलं होतं आणि तो खाली का बसला, याबाबत विवेकानंदांनी आवर्जून सांगितले आहे की, तो युद्धाला घाबरून खाली बसला नाही. माझ्यासमोर माझेच नातेवाईक आहेत, त्यांना कसं मारू, या विचाराने शोकाकुल होऊन खाली बसला. गीता फक्त त्याक्षणी अर्जुनासाठी जरी असली तरी ती क्षात्र धर्माने काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन करणारी आहे. गीता त्यांनी रणांगणावर का सांगितली, तर श्रीकृष्ण स्वत: क्षत्रिय होते आणि क्षात्र धर्माला उद्देशून काय काम करायला पाहिजे, हे त्यांना सांगायचे होते. एखाद्याला मारणं ही हत्या होऊ शकते. म्हणजे कोणी कोणाला तरी मारणं ही हत्याच आहे. परंतु, आपल्या वैर्‍याला मारणं, त्याचा ’वध’ करणं ही हत्या होऊ शकत नाही. तो क्षात्र धर्मच आहे. उलट क्षत्रियाने आपला धर्म पाळला नाही, तर त्याचे पातक लागू शकते. हे ज्ञान क्षत्रियाला का बरं दिले? तर आत्मा अमर आहे, हे कळणे आवश्यक आहे. शरीर नाशवान आहे. पुनर्जन्म होत राहतात, हे क्षत्रियाला समजल्यावर त्याला आत्मिक बळ मिळू शकते.
‘मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।’ आपल्या इंद्रियांशी, त्यांच्या त्यांच्या विषयाशी होणारा संपर्क हा नित्य आहे आणि म्हणून त्यांचा विचार करता कामा नये. कारण, आज आपल्याला एखादी गोष्ट अनुकूल वाटू शकते. उष्ण पाणी हिवाळ्यात अनुकूल वाटेल. परंतु, तेच उन्हाळ्यात प्रतिकूल वाटेल. तीच गोष्ट अनुकूल वाटणं प्रतिकूल वाटणं त्या वस्तूवर प्रसंगावर त्या घटनेवर आधारित असेल, तर मग आपण आपल्या इंद्रियांच्या विषयाकडे धावणं आणि त्यांच्यामागे धावून सर्व आयुष्य भोग मिळवण्यात घालवणं त्यात काही अर्थ नाही. भोग घेऊ नका असं म्हटलं नाही, पण आपण संयम ठेवला पाहिजे.
 
गीतेमध्ये तत्त्वज्ञान सांगितले आहेच. परंतु, गीतेमध्ये यज्ञावर, वेदांवर टीका केलेली दिसते. अगदी मुन्डकोपनिषदामध्येसुद्धा यज्ञावर टीका केलेली आहे. का? तर यज्ञ हे काहीना काही फळ मिळावे, यासाठी केलेले आहेत. काहीना काही इच्छा ठेवून केलेले आहेत. विवेकानंदांनी विविध यज्ञ सांगितले आहेत. प्राणायाम हासुद्धा यज्ञच आहे. म्हणजे यज्ञाचा पूर्णपणे धिक्कार न करता, त्याला नवीन स्वरूप देण्यामध्ये गीतेचा मुख्य वाटा आहे. ध्यान आणि तप माणसाला पवित्र करणारे आहेत, म्हणून त्यांचा त्याग करायचा नाही. जे काही यज्ञाविषयी सर्व आहे- ‘यज्ञमय श्रेष्ठतमः श्रेष्ठतमः कर्मम्’ त्याविषयी पुनर्विचार करायला हवा आणि त्यांनी यज्ञाचं स्वरूप कसं हवं सांगितला. ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हा तर महत्त्वाचा श्लोक आहेच. कर्मावर आपला अधिकार आहे म्हणून आणि फळावर नाही, असं म्हटल्यावर फळ मिळणार नसेल तर कर्म का करू, अशी एक उदासीनता प्राप्त होऊ शकते आणि म्हणून त्याठिकाणीसुद्धा तोही विचार करायला पाहिजे की, कर्म करायला पाहिजे. तो आपला स्वभावच असला पाहिजे आणि तो तसा स्वभाव असेल आणि कर्म करत असू तर ते कर्म आपल्या बंधनात टाकत नाही.
 
तसेच, गीतेमध्ये स्थितप्रज्ञ विचार सांगितलेला आहे. स्थितप्रज्ञ असणं हे अत्यंत कठीण आहे. अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितींमध्ये समान विचार ठेवावा लागतो. एकवेळ अनुकूल मिळाल्यावर शांत राहणं कदाचित सोपं असेल. परंतु,प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला हे का मिळालं, नाही याचा खेद करत राहणं, ही कृती होता नये.
 
पुढे आपली इंद्रिये विषयांपासून दूर करण्यास सांगितली आहेत. इंद्रिय आवरून घ्यायला सांगितली आहेत. एकवेळ आपण इंद्रिय आवरून घेऊ, पण ’रस’ पासून दूर होणे अवघड आहे. रस म्हणजे अनुभूतीची आठवण येणे. इंद्रियांना झालेल्या अनुभूतीची आठवण आपल्याला येत राहते. मन त्यापासून निवृत्त होत नाही. कारण, रस ही एक जीवनाला रसपूर्ण करणारी गोष्ट आहे. रस एकदा मिळाला की, तो पुन्हा पुन्हा मिळावा अशी इच्छा होते, तिथे संयम ठेवायला हवा. परम्यात्माची अनुभूती होणं हाही रसच आहे, आनंद आहे आणि एकदा तो आनंद मिळाला, ती अनुभूती झाली की, हे इंद्रियानुभव फिकेच वाटू लागतात. म्हणून आपल्याला आपल्या इंद्रियांवर जय मिळवायला हवा. हे झालं नाही, तर मनुष्याचा अध:पात कसा होतो, हे गीतेत सांगितले आहे. म्हणून स्थितप्रज्ञ व्हायला हवे. स्थितप्रज्ञकडे करुणा, मैत्री असणे आवश्यक आहेत, हीच लक्षणं आदर्श भक्ताची आहेत. कर्म करत राहणं हे आपला स्वधर्म आहे; अन्यथा राग, लोभ आपल्याला विनाशाकडे नेण्यास सुरुवात करतात.
 
जो वेदांत स्वामी विवेकांनंदांनी सांगितला, तो वेदांत गीतेमध्ये आलेला आहे. सर्व ठिकाणी समभाव असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु, हे करताना मातीचा ठेकूळ आणि सोनं या जागी पण समभाव हवा. परंतु, कोणाला काही देण्याचा विचार असेल, तर तिथे मातीचे ठेकूळ देऊन कसे चालेल? तिथे सोनेच द्यायला हवे. म्हणजेच व्यावहारिक ज्ञानही तेवढेच आवश्यक आहे. व्यवहार हा व्यवहार आहे. मनाने अलिप्त होणे, आवश्यक आहे.
 
योगविषय सखोल राजयोग पुस्तकांत लिहिले आहे. अत्यहार, अल्पहार, अतिनिद्रा, कमी निद्रा यासगळ्यावर विजय मिळवायचा याविषयी त्यांनी बरेच वेळा योगावर राजयोगावर त्यांनी अर्थ प्रत्येक सूत्रांच त्यांनी विवेचन केले आहे, त्यावर विचार मांडले आहे. जेव्हा आपण विवेकानंदांचे विचार वाचतो तेव्हा ती त्यांची एकतर भाषणं असतात. जी त्यांनी परदेशामध्ये दिलेली असतात. ती भाषणं कोणीतरी लिहून घेतो. ती लिहिताना तो स्वत:चेही विचार त्यात जोडून घेतो. म्हणजेच पूर्ण जसेच्या तसे विवेकानंदांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. फक्त ’काम’ या विषयीसुद्धा अनेकांचे अनेक विचार असतात. त्यामुळे वाचक जेव्हा म्हणतो की, मी विवेकानंदांना वाचले आहे. तेव्हा आपण त्यांचे ’खरे विचार’ जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
शेवटी मला असं वाटतं की, विवेकानंदांनी जे म्हटले आहे की, ’उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ म्हणजे जागा हो, आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सतत प्रयत्न करत राहा. आपण युवा दिन साजरा करताना युवकांच्या खांद्यावर असणारी या विचारांची धुरा पहिली पाहिजे. तटस्थता, स्थितप्रज्ञता, व्यावहारिकता हे अंगी बाळगले पाहिजे. युवकांनी हे तत्त्वज्ञान व्यावहारिकरित्या पुढे नेणे आवश्यक आहे, तर हा युवा दिन खर्‍या अर्थाने साजरा होईल. धन्यवाद!
 
-डॉ. कला आचार्य
 
(शब्दांकन : वसुमती करंदीकर)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.