बाळासाहेबांच्या आठवणीत रमले मान्यवर

24 Jan 2023 15:28:52
balasaheb thackeray


मुंबई
: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी त्यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात आले आहे. याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर,विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अ‍ॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते.

चित्रकार किशोर नादवडेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे तैलचित्र असून विधानभवनातील मुख्य सभागृहात ते लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना यावेळी मान्यवरांनी उजाळा दिला.
 
तैलचित्राचे आनावरण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंमुळेच मी आज या व्यासपीठावर आहे. त्यांच्यामुळेच मी आजचा क्षण अनुभवतो आहे. बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रातील अखंडता कायम आहे. त्यांनी धर्मांमध्ये कधीच भेदभाव केला नाही.”या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बाळासाहेबांमुळेच आज या पदावर विराजमान : अ‍ॅड. राहुल नार्वेकर

बाळासोहब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण निमित्त आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “बाळासाहेब होते म्हणून हा अखंड महाराष्ट्र राहिला आहे, त्यांच्यामुळे मी इथे आहे. सत्तेची सर्व ताकद त्यांच्या हातात असताना ही त्यांनी साधे महापौरपद किंवा इतर पद स्वत:कडे किंवा कुटुंबाकडे ठेवले नाही, हा त्यांचा गुण अनुकरणीय आहे. त्यांनी जे काही होते ते सर्व शिवसैनिकांना दिले हा त्यांचा मनाचा मोठेपणा हेाता.”नार्वेकर पुढे म्हणाले, “बाळासाहेब हे सेक्युलर नेते ही होते, त्यांना कोणत्याही धर्माबद्दल जातीबद्दल दुजाभाव दिला नाही म्हणून ते सेक्युलर आहेत.


माझ्या राजकीय आणि सामाजिक जीनवनातील आजच सर्वात मोठा क्षण आहे की, बाळासाहेबांच्या तैलचित्राचे आज येथे अनावरण झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पहिली मागणी केली की बाळासाहेब यांचे तैलचित्र लावण्यात यावे, ती मागणी तत्काळ मंजूर करून बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आज या तैलचित्राचे अनावरण झाले हा दिवस आमच्यासाठी विशेष असल्याचेही ते म्हणाले.”

मुंबईच्या महासगरासारखे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व : देवेंद्र फडणवीस

“बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व मुंबईच्या महासगरासारखे होते. ते वेळप्रसंगी शांत तर कधी तुफानासारखे असायचे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.फडणवीस पुढे म्हणाले, “बाळासाहेबांचे तैलचित्र येथे लागले पण सत्तेसाठी येथे येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही,” असा टोलाही त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता लगावला.

बाळासाहेबांच्या आठवणी सांगतांना, फडणवीस पुढे म्हणाले, “शिवसेनेत छगन भुजबळ यांच्या बंडानंतर राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर व्यंगचित्र काढले, त्यावर हक्कभंग आर. आर. पाटील यांनी आणला. त्यावेळी बाळासाहेबांना समितीसमोर येण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी लोकशाहीचा सन्मान करत चार वेळा ते समितीसमोर हजर झाले. बाळासाहेब आपल्या विचारावर आणि कृतीवर किती ठाम होते,” याचे हे उदाहरण असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “समितीतील सदस्यांना बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर होता ते बाळासाहेबांची चौकशी करत त्यांना काय हवे नको विचारत त्यावेळी बाळासाहेब मिष्किलपणे सांगत, ‘मी पैसे सोडून सर्व खातो, असे उत्तर त्यांनी समितीतील एका सदस्याला गोड पदार्थ ऑफर केल्यावर दिले.


मोठे होण्यासाठी आवश्यक असलेला मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता,” असे सांगत फडणवीस म्हणाले, “बाळासाहेबांनी बोललेला शब्द त्यांनी कधीच मागे घेतला नाही. राजकारणातील जातीव्यवस्थेचा पगडा दूर करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे विचारधन जोपासणे गरजेचे असून, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या बाळासाहेबांचे तैलचित्र प्रेरणादायी ठरेल,” असेही फडणवीस यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.
 
पाकिस्तान घाबरायचा तो फक्त बाळासाहेबांनाच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची कारकीर्द आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांच्या वलयाचा आवाका सांगतांना शिंदे म्हणाले की,“पाकिस्तान हा देश कुठल्याही पंतप्रधानांना वा राष्ट्रपतींना घाबरला नाही, ते घाबरायचे फक्त बाळासाहेबांनाच. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या नेत्यांचे गल्लीबोळातल्या समस्यांवरही लक्ष होते. म्हणून ते बलाढ्य नेते ठरले,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे.बाळासाहेबांचा पगडा आमच्यावर लहानपणापासून होता, त्यामुळेच बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचे आम्ही धाडस केले, असे सांगून शिंदे म्हणाले बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास होता. त्यांच्यामुळेच सामान्य लोक सत्तेच्या प्रवाहात आले. त्यातूनच माझ्यासारखा एखाद्या शेतकर्‍याचा, गरिबाचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला तो त्यांच्यामुळेच असे सांगून शिंदे म्हणाले, “जिथे अन्याय होतो तिथे पेटून उठा, हीच बाळासाहेबांची शिकवण होती त्यांनी एकदा शब्द दिला की दिला. त्यांनी कधीही शब्द फिरवला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि ताकद त्यांनी आम्हाला दिली.



धाडस महत्त्वाचं असते त्यासाठी हिंमत लागते. त्यासाठी तसे गुरू लागतात. आनंद दिघे साहेब आज असते, तर त्यांना आजचा कार्यक्रम बघून उर भरून आला असता,” असेही शिंदे या वेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब नेहमी सांगायचे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगाच्या पाठीवरची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. धाडस आणि आत्मविश्वास हे आम्हांला बाळासाहेबांनी दिले त्यातूनच आम्ही घडलो. बाळासाहेबांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती, देशभक्ती होती. त्यामुळे त्यांनी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी कधीही तडजोड केली नाही,” असेही शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.




Powered By Sangraha 9.0