‘पिफ’मधील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

24 Jan 2023 17:13:07
list-of-marathi-films-in-piff-2023


पुणे
: ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर केली. फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत फाऊंडेशनचे सचिव रवी गुप्ता हेदेखील यावेळी उपस्थित होते. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताह्मणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

२ ते ९ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मुकुंदनगर येथील थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर या ठिकाणी सायं ५.३० वाजता उद्घाटन होईल. अली अब्बासी दिग्दर्शित ‘होली स्पायडर’ यावर्षीची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून तर ‘फायनल कट’ ही दिग्दर्शक मिशेल हाजानाविसियस यांची फिल्म ‘क्लोजिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात येणार आहे.तांत्रिक कारणामुळे यावर्षी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार नाहीत. त्याऐवजी कॅम्प परिसरातील ‘आयनॉक्स’ या ठिकाणी स्कीन वाढविण्यात आली आहे.

व्याख्याने व कार्यशाळा
३ ते ८ फेब्रुवारी दरम्यान व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ए श्रीकर प्रसाद, चैतन्य ताह्मणे, शाजी करून, राहुल रवैल, अभिनेते जॉनी लिव्हर, दिग्दर्शिका अरुणा राजे व डॉ. लक्ष्मी लिंगम तसेच अभिनेत्री विद्या बालन हे आपले मत मांडतील.
निवड झालेले चित्रपट व दिग्दर्शक
मदार (मंगेश बदार), ग्लोबल आडगाव (अनिल साळवे), गिरकी (कविता दातीर आणि अमित सोनावणे), टेरेटरी (सचिन मुल्लेम्वार), डायरी ऑफ विनायक पंडित (मयूर करंबळीकर), धर्मवीर; मुक्कम पोस्ट ठाणे (प्रवीण तरडे), पंचक (जयंत जठार आणि राहुल आवटे)
Powered By Sangraha 9.0