मुंबई-गोवा महामार्गाला ‘ग्रीनफिल्ड’चा वेग

कोकणच्या पर्यटनवृद्धीची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

    24-Jan-2023
Total Views |
ekanth shinde


ठाणे
: कोकणच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत. तसेच ‘समृद्धी’ महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेच्या धर्तीवर लवकरच मुंबई-गोवा महामार्ग ‘ग्रीनफिल्ड अ‍ॅक्सेस कंट्रोल’ रस्ता बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. कोकणच्या पर्यटनवृद्धीसाठी ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून ‘कोस्टल रोड’चेही रुंदीकरण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती मैदानात आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, “कोकणच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ‘ग्रीनफिल्ड अ‍ॅक्सेस कंट्रोल’ असा महामार्ग बनवणार असल्याचा निर्णय आम्ही घेतल्याचेही ते म्हणाले.

कोकणात पर्यटनाला वाव असल्याने त्यासाठी चांगले ’इन्फ्रास्ट्रक्चर’ व उत्तम ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण व्हावी, यासाठी ’एमएसआरडीसी’च्या माध्यमातून सिंधुदुर्गातील ‘कोस्टल’ रस्त्यांचेही रुंदीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येथील समुद्र किनारे एकमेकांना जोडले जाऊन पर्यटनवाढीला मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे, स्नेहलता सीताराम राणे, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते. राणे दाम्पत्याने भव्य भित्तिचित्राची प्रतिमा सदिच्छा भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मालवणी महोत्सवात प्रथमच मुख्यमंत्र्यांची उणीव पूर्ण झाली, अशी भावना सीताराम राणे यांनी व्यक्त केली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.