'शेतकऱ्यांच्या गुलामीमुळे भारत गरीब' - साहित्य संमेलनात हबीब यांची राज्यकर्त्यांवर टीका

    24-Jan-2023
Total Views |
 
मुंबई : "पूर्वी कधी तरी कोठून कोणी आत्महत्या केल्याची खबर यायची. आज मात्र त्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अशी बातमी शिवेच्या आत घडू शकते. उद्या कदाचित उंबऱ्याच्या आत देखील. अशी भीती वाटावी असे झाले आहे." पत्रकार, साहित्यिक व शेतकरी नेते अमर हबीब बीड येथील घाट नांदूर येथे बोल्ट होते. घाट नांदूर गावात मृदगंध साहित्य संमेलन २१ जानेवारीपासून सुरु झाले आहे. या वर्षी या संमेलनाचे अध्यक्षपद अमर हबीब यांनी भूषविले.

amar habib 
 
अमर पुढे म्हणाले, "‘शेती हे ज्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे ते शेतकरी’ अशी शेतकरी या शब्दाची व्याख्या आहे. शेतकरी हवालदिल आहे. आस्मानी संकट आहेच. पण सुलतानी संकट त्याहून जास्त भयंकर आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात शेतकरी सुखी झाला नाही. दु:ख वाढतच गेले. आज अनेक जण जीव देत आहेत व जे जीव देत नाहीत ते मरण जगत आहेत. अनेकांना वाटते की, हे गरिबीमुळे घडत आहे. वास्तविकता तशी नाही. भारतीय शेतकऱ्यांची दुर्दशा गुलामीमुळे झाली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गुलामीचा आहे, हे अजून बऱ्याच लोकाना कळलेले नाही. सरकारला तर अजिबात नाही. आपल्या देशातील सर्व समस्यांच्या तळाशी ‘शेतकऱ्यांची गुलामी’ हे कारण आहे. ही गुलामी पिढ्यानपिढ्याची आहे. राजे बदलले की गुलामीचे स्वरूप बदलायचे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गुलामी राहिली. फक्त स्वरूप बदलले. राजे , वतनदार घरात घुसून धान्य उचलून न्यायचे. आता कायदे करून शेतकऱ्यांना गुलाम बनवले जाते. सीलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आज शेतकऱ्यांचा गळफास बनले आहेत."
 
 
24 January, 2023 | 15:9
 
यावेळी अमर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. अनेक कसोट्यांवर ग्रामीण शेतकरी जीवन व्यतीत करत आहे सांगत त्यांनी शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती, शैक्षणिक सुविधांचा अभाव, वाढते खर्च, उत्पादन वाढत असताना उत्पन्न वाढत नसल्याची कारणं, ग्रामीण साहित्य, शेतकरी साहित्य, वेठबिगारी, ग्रामीण लेखक नोकरदार व बांडगुळी साहित्याविषयी आपली मतं मांडली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.