सकारात्मक मानसशास्त्र

    24-Jan-2023
Total Views |
 
Psychology
 
 
 
‘सकारात्मक मानसशास्त्र’ हा नवीन विषय आरोग्यातील आजाराच्या किंवा रोगाच्या संकल्पनेच्या पलीकडे विस्तारित झाला आहे आणि सकारात्मक दृष्टीने निरोगी व सशक्त असणे म्हणजे नक्की काय, हे परिभाषित करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
जीवनात नकारात्मक भावना कोणीही टाळू शकत नाही आणि आपण ते टाळू शकतो व आपल्याला ते जमेल, असा विचार करणे, हे देखील वास्तववादी वाटत नाही. परंतु, जीवनातील अपरिहार्य शोकांतिकेमुळे आयुष्यात घडणार्‍या चांगल्या गोष्टी उद्ध्वस्त होण्यापासून कशा रोखाव्यात, आयुष्य कसे सुरक्षित करावे, हे सर्वात आनंदी मंडळींना व्यवस्थित माहीत असते आणि हे लोक सर्वात निरोगीदेखील असू शकतात. तुम्हाला निरोगी व्हायचे असेल, तर तुमच्या मनाची आनंदित बाजू प्रकाशित ठेवा. सकारात्मक विचार करा. सतत आजाराबद्दल बोलण्यापेक्षा सुदृढ असण्याबद्दल विचार करा. अशाप्रकारचे सर्व सल्ले छान वाटतात ऐकायला, पण खरे वाटत नाहीत, अस्पष्ट वाटतात. तथापि, अनेक शास्त्रीय पुराव्यांवरून असे दिसून येते की, जीवनाबद्दलची तुमची प्रसन्नवृत्ती, तुमचे आरोग्य खरोखर सुधारू शकते आणि गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेतून तुमची रोगमुक्ती लवकर करू शकते. आशावाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या गुणवत्तेवर तुमच्या मनाचाही प्रभाव पडतो, ही भावना व्यक्तीला सर्वात जास्त मदत करते, असे वाटते.
 
सकारात्मक दृष्टिकोन लोकांना शस्त्रक्रियेतून जलद बरे होण्यास किंवा कर्करोग, हृदयविकार आणि एड्ससारख्या गंभीर आजारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यास कशी आणि का मदत करतो? हे कोणालाही खरोखर समजत नाही. परंतु, तोच आजार आणि तीच उपचारपद्धती असतानासुद्धा काही लोक उत्तम प्रगती दाखवतात, तर काही ढासळत जातात. वाढत्या पुराव्यांवरून असे सूचित होते की, मानसिक सामर्थ्याच्या रोगप्रतिकारक शक्तींवर प्रभाव होत असतो. काही संशोधकांना वाटते की, तुम्ही जर निराशेने ग्रस्त असाल, तर तुमच्या रक्तप्रवाहात विनाशकारी तणाव संप्रेरकांची पातळी वाढू शकते, जी शरीराला हानिकारक ठरते. अर्थात, हेदेखील शक्य आहे की, जीवनाबद्दल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची अधिक प्रेरणा मिळत जाते. तुमच्या आयुष्यात अशा लोकांना आकर्षित कराल, जे तुमच्या आरोग्याला चालना देऊ शकतात.
 
मानसशास्त्रज्ञांना एक सिद्धांत लक्षात आला होता की, सकारात्मक भावना अनुभवणार्‍या लोकांना रोगाचा धोका कमी असतो. या सिद्धांतानुसार, संशोधकांनी एका महत्त्वाच्या अभ्यासातून 18 ते 54 वयोगटातील 334 लोकांचे मूल्यांकन केले, ज्यामध्ये विशेष करून आनंद आणि विश्रांती यांसारख्या सकारात्मक भावना तसेच चिंता, द्वेष आणि नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावनांचा अनुभव घेण्याच्या प्रवृत्तीचे मूल्यांकन केले गेले. त्यानंतर सहभागींना सामान्य सर्दी असलेल्या अनुनासिक थेंबांचे इंजेक्शन दिले गेले. ज्या लोकांनी अधिक सकारात्मक भावना व्यक्त केल्या, त्या लोकांमध्ये सामान्य सर्दी होण्याची शक्यता कमी दिसून आली. तेव्हापासून, मानसशास्त्रज्ञांनी ‘सकारात्मक मानसशास्त्र’ नावाच्या संशोधनाच्या नवीन क्षेत्रात सकारात्मक वाटणे आणि सुदृढ असणे, यामधील दुव्याचा शोध सुरू ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा नवीन विषय आरोग्यातील आजाराच्या किंवा रोगाच्या संकल्पनेच्या पलीकडे विस्तारित झाला आहे आणि सकारात्मक दृष्टीने निरोगी व सशक्त असणे म्हणजे नक्की काय, हे परिभाषित करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
तुम्ही रोगासारखी जीवनाची गडद बाजू नाकारली पाहिजे किंवा प्रत्येक संकटाचा सकारात्मक म्हणून अर्थ लावला पाहिजे, अशी अपेक्षा नाही. पण, जेव्हा आपत्ती समोर येऊन ठेपते तेव्हा निराशा किंवा नियतीवादाला बळी न पडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वैयक्तिकरित्या नियतीने दुःख भोगण्यासाठी निवडले गेले आहे, असा निष्कर्ष काढणे आणि रोगाशी प्रतिकार करावयाच्या सर्व आशा सोडून देणे, ही केवळ आजारपणाशी निभावून नेण्याची संकुचित कृती असू शकत नाही. सामान्यपणे अशी वृत्ती सामान्य जीवनातदेखील प्रवास करण्यासाठी सक्षम मानता येत नाही. हे ओळखण्याचा प्रयत्न करा की, तुमचे दु:ख आणि वेदना, कितीही खरी आणि खोल असली, तरी ती एका विशाल आयुष्याच्या ‘पेंटिंग’चा एक छोटासा भाग आहे आणि या ‘पेंटिंग’मध्ये वेदनेशिवाय आनंद, यश, समाधान असे अनेक घटक समाविष्ट आहेत. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे, तुमच्या वेदनांचा उपयोग चांगल्यासाठी करण्याचा प्रयत्न करणे. कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि यासारख्या अनेक दीर्घ जीवघेण्या आणि अक्षम्य आजारांनी ग्रासलेले अनेक लोक सांगतात की, ते त्यांच्या आजाराला अनमोल भेट मानतात. आजारपणाने त्यांना आयुष्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व, प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि आयुष्यातील अनेक घटनांचे प्राधान्यक्रम सरळ करण्यास शिकवले.
 
काहीवेळा त्यांना असेही आढळून आले की, त्यांच्याकडे आज अशा अनेक गोष्टी करण्याची क्षमता आहे, जी त्यांना पूर्वी कधीच मात नव्हती की, ते करू शकतात. उदाहरणार्थ, कर्करोगाने स्तन गमावल्यामुळे काही स्त्रियांनी परिपूर्ण शरीर तयार करण्यात आपली सर्व शक्ती ओतणे आज थांबवले आहे. परिणामी, त्यांना साहित्य, लिखाण, संगीत किंवा खेळ यांसारख्या इतर आवडी आणि कलागुणांचा शोध लागला. अपंगत्वाच्या आजारामुळे उच्चप्रतीची नोकरी सोडून देण्यास भाग पाडल्यामुळे इतर लोकांना शिल्पकला, बागकाम किंवा इतर आवडींचा पाठपुरावा करता आला आहे. अर्थातच, अशा परिस्थितीत जर तुम्ही उत्साही दृष्टिकोन ठेवला, तर जीवनातील धक्केदेखील तुमच्या कल्पनेच्या पलीकडे बक्षीस आणू शकतात. एक लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या जीवनातील बिकट परिस्थिती बदलता नाही आली, तरीही तुम्ही तुमचा दृष्टिकोन नक्की बदलू शकता! तुम्हाला मदत हवी असल्यास, मानसोपचार, किंवा आरोग्य व्यावसायिकांशी बोला. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दलचे विचार आणि भावना बदलून तुमचे शारीरिक आरोग्य कसे सुधारू शकता, याचा विचार आपण पुढील काही लेखांतून करणार आहोत.
वास्तव मनाने निर्माण केले आहे. आपले विचार बदलून आपण आपले वास्तव बदलू शकतो.
प्लेटो, ग्रीक तत्वज्ञ
 
 डॉ. शुभांगी पारकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.