पाकिस्तानाची अंधारयात्रा

‘ग्रीड’ बंद पडल्याने संपूर्ण देशभरात ‘ब्लॅकआऊट’

    24-Jan-2023
Total Views |
Pakistan power cut

कराची : आर्थिक संकटामुळे आधीच चाचपडणार्‍या पाकिस्तानात सोमवारी सर्वत्र ‘ब्लॅकआऊट’चा अनुभव तेथील लाखो नागरिकांना आला. पाकिस्तानला वीजपुरवठा करणारा मुख्य ’ग्रीड’ बंद पडल्याने तब्बल १२ तास तेथील नागरिकांना अंधारात काढावे लागले. यात राजधानी इस्लामाबादसह, कराची आणि लाहोर या मोठ्या शहरांनाही वीजसंकटाचा जबर फटका बसला.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली असून, शासनकर्त्यांनी काटकसरीचा मार्ग अवलंबला आहे. त्यातच सध्या थंडीचे दिवस असल्याने काही वेळेसाठी काही शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यातूनच तांत्रिक समस्या उद्भवल्याने मुख्य ‘ग्रीड’ बंद पडला. त्याच्या दुरुस्तीला १२ तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने त्या कालावधीत पाकिस्तानचा बहुतांश भाग पूर्णपणे अंधारात होता.

दरम्यान, पाकिस्तानसमोर विजेचे संकट दिवसेंदिवस भेडसावत आहे. त्यातूनच त्यांनी कामगार कपात, तसेच कार्यालयांच्या वेळा अलीकडे आणल्या आहेत. विवाह समारंभात मोठ्या रोषणाई करण्यास बंदी घातली आहे. तसेच विजेवर चालणार्‍या वाहनांवरही बंदी घालण्यात आली. या वीजबचतीतून देशाचे काही कोटींचे चलन वाचेल, असा आशावाद तेथील शासनकर्त्यांना आहे.

जागतिक बँकेने अतिरिक्त कर्ज देण्यास केलेली मनाई, अमेरिकेने फिरवलेली पाठ तसेच ज्या चीनच्या भरवशावर पाकिस्तान हवेत उडतो, त्या चीनमध्ये कोरोनाचा वाढलेला कहर यामुळे पाकिस्तान सद्या एकाकी पडला असून आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अन्न, पाणी आणि वीजेचेही संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे पाकिस्तानींमध्ये राज्यकर्त्यांविरोधात प्रचंड असंतोष वाढत आहे.

चार महिन्यात दुसर्‍यांदा वीजेची समस्या निर्माण झाल्याने सत्ताधारी पक्षावर चहुबाजुंनी टीका होत आहे. वीज बंद असल्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाले तसेच अन्य उपक्रमांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. येत्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी व्यक्त केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.