भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

    24-Jan-2023
Total Views |
prasad lad republic day

सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान आमलात आले आणि भारत हे एक प्रजासत्ताक गणराज्य राष्ट्र म्हणून नावारूपास आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३ वर्षांनी संविधान लागू झाले. परंतु लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही! या व्याख्येस अनुरूप असे शासन, ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. लोकशाहीला प्राधान्य देणारा आपला अनेक वर्षांचा इतिहास आहे. परकीयांची कितीही आक्रमणे झाली, तरी हाच इतिहास आपल्या देशाला एकसंघ ठेवत आला आहे.

मागील ७० वर्षांच्या काळात काही ठराविक कुटुंबांच्या हातात सत्तेच्या चाव्या एकवटलेल्या होत्या. परंतु २०१४ साली पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकांनी बहुमताने निवडून दिलेले सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय प्रजासत्ताक अधिक सक्षम झाले. यावेळी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणारे हिंदवी स्वराज्य व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा खरा सन्मान करणारे सरकार केंद्रात आले. योग्य आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच्च स्थानी बसू शकते, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत देशाच्या लोकशाहीची व्याख्या अधिक बळकट होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय लोकशाहीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. एका आदिवासी कुटुंबातील महिला व्यक्ती आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. आपल्या देशाच्या संविधानाचा व लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी विद्यार्थी भारतात येत आहेत. हीच आपल्या लोकशाहीची खरी ओळख आहे.

 
“राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा...!” हे ब्रीदवाक्य आपली आजची लोकशाही शिकवते. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी पदभार स्वीकारल्यापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांवर देखील योग्य व्यक्तींचे, सर्वसामान्य व्यक्तींचे नाव कोरले जात आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आणि समाजकार्य करणारी मंडळी आता दिसून येत आहेत. मागील ८ वर्षांच्या काळात पद्म पुरस्कारांबद्दलची अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांना अभिमान वाटेल तसेच राष्ट्र गौरव वाढेल असे अनेक निर्णय देखील केंद्र सरकारने मागील काळात घेतले आहेत. राष्ट्र आणि लोकशाही या भावनेला अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनी एक जागरूक नागरिक म्हणून देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये देखील आपण समजून घ्यायला हवीत. लोकशाही मार्गाने एखादे राज्य चालत असताना, त्या राज्यातील नागरिकांनी फक्त हक्कांची मागणी करून चालणार नाही, तर आपल्या कर्तव्याप्रती दक्ष राहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. हे जेव्हा आपल्या देशातील नागरिकांच्या लक्षात येईल, त्याचवेळी भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होणार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या संविधानाची प्रास्ताविका समजून घेऊन, त्याला अनुरूप असा देश घडवण्यासाठी काम केले पाहिजे. संविधानातील मूल्य समजून घ्यायला पाहिजेत. देशाप्रती तेवढीच निष्ठा बाळगली पाहिजे.


भारत हा देश विविधतेने नटलेला असला तरी त्यातील एकताच आपली खरी ताकद आहे. आपली लोकशाही बळकट करणारी हीच ताकद आपण टिकवून ठेऊन, देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपली लोकशाही आणि आपली संस्कृती वृद्धिंगत होऊन, जगाला अधिक दिशादर्शक ठरणार आहे.हे प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र काम केलेल्या ज्ञात अज्ञात सर्व थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन करतो!

जगभरात राहणाऱ्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
 
जय हिंद! जय महाराष्ट्र!

 
- प्रसाद मिनेश लाड

विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र

भाजपा प्रतोद, महाराष्ट्र विधान परिषद


 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.