वंचित बहुजनांची आघाडी

    24-Jan-2023
Total Views |
 prakash ambedkar and uddhav thackeray
 
‘सत्तेपासून दूर राहिलेल्या बहुजनांची आघाडी’ असे शिवसेना आणि नव्या मित्रपक्षांचे गणित आहे. ज्यांचे घोडे सत्तेच्या गंगेत कधीच न्हाले नाही, त्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे गतीने गर्तेत चालले आहेत.


बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजधानी मुंबईत निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनाच्या सभागृहात लावण्यापासून ते त्यांच्या स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यापर्यंत अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. कार्यक्रमांच्या या भाऊगर्दीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद येथे पक्षाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार असल्याचे महाराष्ट्राला सांगितले. महाराष्ट्रात संख्याबळाचा खेळ इतका विचित्र आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना कडबोळी करत स्वत:चे राजकीय वर्चस्व टिकवावे लागते.


 देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलेला पाच वर्षांचा कालावधी सोडला, तर ते भाग्य अन्य कुणाला लाभल्याचे ऐकवात नाही. योगायोग असा की, ज्यावेळी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहातील सोहळ्यात उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांसोबत पाट लावण्याचा मुहूर्त साधत होते, त्याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बाळासाहेबांचे स्मरण करताना त्यांना केवळ ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणणे कसे चुकीचे आहे, हे सांगत होते. कधी काँग्रेस, कधी प्रजा समाजवादी पक्ष, कधी मुस्लीम लीग, तर कधी भाजप अशा सगळ्याच पक्षांशी बाळासाहेबांनी निवडणुकांमध्ये युती केली. त्यामुळे ते फक्त ‘हिंदुहृदयसम्राट’ होते असे म्हणणे रास्त नाही, असा अजितदादांच्या भाषणाचा रोख होता.


एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना व ‘मातोश्री’च्या अंगणातली फळे व फुले ज्या ऊर्जेवर बहरतात किंवा जगतात, त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना जीवाच्या आकांताने उतरावे लागेल, यात शंका नाही. मुळात तोळामासा राहिलेला आजचा त्यांचा पक्ष, त्यात या पक्षाला आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आधी लावलेल्या सवयी व आता त्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यासमोर आहे. ज्यांना काहीच मिळालेले नाही ते कुठे जाणार, हा मोठा पेच शिवसेनेसमोर असेल. यावर्षी बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त निघणारी ‘सामना’ची जाहिरातींनी समृद्ध गलेलठ्ठ पुरवणी शिवसेनेच्या मागे उभ्या असणार्‍या धनशक्तीचा परिचय देत असे. यावर्षी ती रोडावली. उरलेल्या कार्यकर्त्यांच्या जाहिरातीवरच ती पुरवणी निघाली. उद्धव ठाकरेंच्या सेनेचे वास्तव हे असे आहे. यात ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गेले, तर निष्ठेने फक्त शिवसेनेला चिन्ह पाहून मतदान करणार्‍या मतदारांनाही मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.


 prakash ambedkar and uddhav thackeray
उद्धव ठाकरेंसमोरचे आव्हान आता मतांची बेगमी करण्याचे आहे. बाळासाहेब हे जसे मोठे कलावंत होते, तसेच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे राजकारणीही होते. पक्ष चालविणे, त्याचा सतत विस्तार करीत राहणे, राजकीय मोर्चेबांधणी करत राहाणे हा आपला पिंड नाही, याची त्यांनी पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांशी विषयानुरूप संघर्ष निवडायचा, पण त्या पक्षांशी सलगीचे संबंध ठेवायचे, असे त्यांचे राजकारण होते. मात्र, हे करीत असताना त्यांनी काही वैचारिक भानही ठेवले. उद्धव ठाकरेंना नेमके हेच साधता आले नाही. सत्तेसाठी त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, एकगठ्ठा मुस्लिमांची मते या सगळ्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला आणि शिवेसेनेचे तुकडे झाले.


सत्तेचे खेळ मोठे मजेशीर असतात. माणूस एखाद्या मार्गाने सत्ता मिळाली की, तोच मार्ग एकमेव मानायला लागतो. खूप मोठी राजकीय प्रतिभा असल्याशिवाय ही कोंडी फोडता येत नाही. उद्धव ठाकरेंचेही असेच झाले. राजकारणात ज्यांना वापरले जाते, ज्यांच्याशी युत्या केल्या जात नाहीत, अशा सगळ्यांनाच जवळ घेऊन आता त्यांना सत्ता मिळवायची आहे.मागे त्यांनी जातीयवादी मराठा महासंघ व त्यानंतर ब्राह्मणद्वेषावर उभ्या असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही युती केली होती. या युतीचे काय परिणाम झाले? नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याचा काही परिणाम झाला का? याचे मूल्यमापन करायला उद्धव ठाकरेंना कदाचित अद्याप वेळ मिळालेला नसेल. बाकी सगळे सोडा, पण मराठा महासंघ किंवा संभाजी ब्रिगेड यांचे ज्या मराठा समाजासाठी ते संघटना चालवत असल्याचा दावा करतात, त्या समाजासाठी केलेले भरीव योगदान काय?


असा सवाल उपस्थितीत उभा केला, तर त्याचे उत्तर काही केल्या मिळणार नाही. कारण, या मंडळींनी असे फारसे काही केलेलेच नाही. प्रकाश आंबडेकरांचेही असेच काही आहे. परवा त्यांच्या भाषणाचा रोखही मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा अंत निसर्गनियमानुसार होणारच आहे, असा होता. आता त्यांचा हा तर्क मानला, तर तो व्हायचा तेव्हा होईल, पण तुमचे काय? या प्रश्नाचे उत्तर काही केल्या सापडत नाही. अशा मेळाव्यातून काय साधणार हे उद्धव ठाकरेंनाच माहीत. एकदा केलेल्या असंगाशी संगाची शिक्षा उद्धव ठाकरेंना पुरेपूर मिळाली आहे. मात्र, अद्याप त्यांना त्याचे आकलन झालेले नाही. सत्ता हे साधन असते, साध्य नाही. सगळ्याच घराणेशाही पक्षांचे जे होते, तेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे होणार, यात शंका नाही!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.