आजार जगाचे, औषध भारताचे!

    23-Jan-2023   
Total Views |

आजार जगाचे, औषध भारताचे!


‘वसुधैव कुटुम्बकम्’ या मंत्राद्वारे भारत जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देत आहे. हाच विश्वबंधुत्वाचा भाव आता ‘हील इन इंडिया’ या उपक्रमामुळे अधिक दृढ होणार आहे. कोरोना काळात संपूर्ण जगाला औषधे - लसींचा पुरवठा करणारा भारत या उपक्रमाद्वारे संपूर्ण जगाच्या आरोग्याची काळजी घेण्यास सज्ज होणार आहे.

 
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये जगातील अनेक देशांप्रमाणे भारतामध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण, अतिशय वेगाने पसरणार्‍या या विषाणूचा सामना करण्यासाठी कोणत्याच देशाची तयारी नव्हती आणि आरोग्य सुविधादेखील तयार नव्हत्या. मात्र, भारताने अतिशय अल्पावधीतच म्हणजे विषाणूची साथ सुरू झाल्यापासून अवघ्या सात ते आठ महिन्यांमध्ये देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना अभूतपूर्व अशी बळकटी प्रदान केली. याच कालावधीत भारतामध्ये वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली. त्यामध्ये ’पीपीई किट’, ‘व्हेंटिलेटर’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यानंतर ‘भारत बायोटेक’ने अवघ्या नऊ महिन्यांमध्ये कोरोनावरी पहिली भारतीय लस शोधून काढली आणि त्याचे उत्पादनही सुरू केले. त्यानंतर ‘सीरम इन्स्टिट्यूट’नेही ‘ऑक्सफर्ड - अ‍ॅस्ट्राझेन्का’च्या लसीचे उत्पादन सुरू केले.
लसींचे उत्पादन करून भारताने देशांतर्गत गरज तर भागवलीच. मात्र, त्याचवेळी जगातील जवळपास ३० देशांना लसींची पुरवठाही केला. केवळ लसींचाच नव्हे, तर कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या अमेरिकेस अतिशय आणीबाणीच्या क्षणी ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चा पुरवठा भारताने केला होता. त्यामुळे आरोग्यसुविधा आणि उपचार यामध्ये भारताचे प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याचाच पुढचा भाग म्हणजे, आता भारत संपूर्ण जगासाठी आपल्या देशातील आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यासाठी सज्ज होत आहे.
भारताकडे यंदाच्या वर्षी ‘जी २०’चे अध्यक्षपद आहे. देशभरात ’जी २०’शी संबंधित विविध विषयांवर बैठकांना प्रारंभ झाला आहे. सध्या सुरू असलेल्या ‘जी २०’ ‘इंडिया हेल्थ ट्रॅक’ दरम्यान ‘जी २०’ हेल्थ वर्किंग ग्रुपची पहिली बैठक केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पार पडली. त्यामध्ये ‘मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल’ (एमव्हीटी) या विषयावर बैठक झाली. ‘एमव्हीटी’ म्हणजे जगभरातील रूग्णांसाठी दर्जेदार आणि परवडणार्‍या दरात आरोग्य सेवा देण्यासाठी व्यवस्था तयार करणे. ‘जी २०’ या जागतिक व्यासपीठावर त्यावर चर्चा घडवून आणणे आणि त्यासाठी सर्वसमावेश धोरण बनविण्यास गती देण्याचा मुख्य उद्देश आहे.
‘इंडिया हेल्थ ट्रॅक’च्या पहिल्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी जगभरातील आरोग्यसेवा प्रवेशातील असमानता कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. या सत्रास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘एमव्हीटी’ धोरणास गती देण्याची गरज व्यक्त केली. बैठकीमध्ये ‘एमव्हीटी’स चालना देण्यासाठी जगभरात सर्वसमावेशक धोरण आराखड्याची गरज व्यक्त करण्यात आली. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक परदेशी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी येत असतात. त्यास अधिक गती देण्यासाठी या चर्चेस अधिक महत्त्व प्राप्त होते.
‘जी २०’ अध्यक्षपदाच्या काळात विकसित आणि विकसनशील देशांकडे समानतेने पाहण्याचे भारताचे धोरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातील प्रत्येक नागरिकास समान आरोग्य सुविधा मिळाव्या, यास भारताचे प्राधान्य आहे. त्यासाठी ‘इंडिया हेल्थ ट्रॅक’अंतर्गत जगभरातील आरोग्यसेवेतील असमानता कमी करण्यासाठी मजबूत व्यवस्था तयार करण्यासाठी भारताने योजना आखण्यास प्रारंभ केला आहे. बैठकीदरम्यान भारताने मूल्याधारित आरोग्यसेवेच्या अंमलबजावणीची गती वाढविण्यावर आणि जगभरातील सार्वत्रिक आरोग्याचे साध्य करण्याच्या दिशेने गती देण्यावर भर दिला आहे.
दर्जेदार उपचारांसह आधुनिक आणि पारंपरिक औषधांची उत्तम सांगड घालण्यात भारत सक्षम आहे. भारतीय आरोग्यसेवेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती जगातील सर्वात स्वस्त आरोग्य सेवा आहे. भारताने ‘आयुष’च्या माध्यमातून पारंपरिक वैद्यकीय उपचारांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या १९४ सदस्य देशांपैकी १७० हून देशांनीही पारंपरिक औषधांचा वापर स्वीकारला आहे. वेदना व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन म्हणून पारंपरिक औषधोपचार पद्धती जगभरात प्रस्थापित होत आहे. ‘आयुष’द्वारे भारतातील सर्वांसाठी परवडणारी आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.


‘वसुधैव कुटुम्बकम्’ या मंत्राद्वारे भारत जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणार्‍या भारताने आता आरोग्यसेवेच्या बाबतीतही या मंत्राचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘इंडिया हेल्थ ट्रॅक’च्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.भारत आता ’हील इन इंडिया’ हे नवे धोरण राबविणार असल्याची माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी दिली आहे. ‘हील इन इंडिया’ उपक्रमांतर्गत परदेशातील रुग्णांसाठी भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि जगभरातील रुग्णांना मदत करण्यासाठी भारताला वैद्यकीय आणि मूल्याधारित आरोग्य सेवेसाठी जागतिक केंद्र बनवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. ‘हील इन इंडिया’ धोरणास भारतात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या ‘रिमोट हेल्थकेअर’ व्यवस्थेचाही लाभ होणार आहे.

साधारणपणे कोरोना काळापासूनच ’रिमोट हेल्थकेअर’मुळे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित माहिती अगदी घरपोच सहज मिळू लागली आहे. भारतात वेगाने वाढत असलेल्या ‘५जी’ इंटरनेटमुळे तर भारत जगातील आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडविण्यास सज्ज झाला आहे. भारतात असलेले १३ लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर, ३४ लाख परिचारिका आणि आठ लाख आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी) डॉक्टरांद्वारे भारत ‘ग्लोबल साऊथ’सह जगातील सर्व देशांतील रुग्णांना दर्जेदार आणि स्वस्त वैद्यकीय सेवा पुरवणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.