...अन् ओसाड खाणी बहरल्या!

    22-Jan-2023   
Total Views |
mine restoration



सोने, कोळसा किंवा अन्य धातूंचा साठा संपल्यानंतर खाण वापराविना पडून राहते. परंतु, याच खाणींचे खड्डे नव्या पद्धतीने वापरण्याचे प्रयोग यशस्वी झाले असून, ओसाड खाणी बहरू लागल्या आहेत. पुढील काही दशकांत जगभरात कोळशाचा साठा संपुष्टात येण्यास सुरूवात होईल. तेव्हा याच खाणींचा वापर आणि पुनर्निर्मिती करण्याचे अन्य मार्ग शोधण्याची गरज भासेल. जगाच्या काही भागात यावर काम सुरू झाले आहे. एकीकरणाआधी पूर्वी जर्मनी कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध होते. परंतु, बर्लिनची भिंत पडल्यानंतर हा उद्योग कोलमडला. त्यानंतर येथील लुकेशिया प्रदेशातील २५ उघड्या आणि भकास लिग्नाईट खाणींचे एका सुंदर तलावात रूपांतर करण्यात आले. त्यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलला असून पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली आहे.



ब्रँडनबर्ग आणि सॅक्सनी राज्यातील स्प्री आणि ब्लॅक एल्स्टरसह अनेक प्रमुख नद्यांचे पाणी या पूर्वीच्या खाणींमध्ये पोहोचवण्यात आले. यासोबतच सुमारे ३० हजार प्रजातींचे प्राणी आणि वनस्पतीही या भागात आणण्यात आल्याने येथील जैवविविधता वाढण्यास मदत झाली. तेव्हापासून, येथील गायर्सवाल्डे आणि पार्टवित्स तलाव पर्यटकांसाठी ’हॉट स्पॉट’ बनले आहेत. लोअर लुसाटियामधील गायर्सवाल्डे गावातील लिग्नाईट खाणीत पार्टवित्स तलाव तयार करून २०१५ मध्ये तो पूर्णपणे भरला गेला. तलावाचा स्वच्छ निळा रंग ‘क्विकलाईम’मुळे आहे, जो निष्क्रिय खाणीचा आंबटपणा तटस्थ करण्यासाठी पाण्यात मिसळला गेला. ही जागा पोहण्याबरोबरच ‘बोटिंग’साठी उत्तम आहे. पूर्वेकडील मोयरो ओपनकास्ट खाणीचेही ग्रोसरॉशेन सरोवरात रूपांतर करून सरोवराच्या किनार्‍यावर द्राक्षांचे बाग उभे राहिले आहे.

 विशेषतः उत्खननाच्या ठिकाणी आढळणारी आम्लयुक्त माती वनस्पतींच्या वाढीसाठी घातक आहे. परंतु, द्राक्षलागवडीसाठी ती उत्कृष्ट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, वाईन उत्पादक या द्राक्षांपासून ‘व्हाईट वाईन’, ‘रोझ वाईन’, ‘रेड वाईन’ आणि ‘स्पार्कलिंग वाईन’ची निर्मिती करत आहेत.२०१६मध्ये बंद झालेल्या न्यूझीलंडमधील सोन्याच्या खाणीचाही पुनर्विकास करण्यात आला असून २६० हेक्टरपैकी निम्म्याहून अधिक भाग आजूबाजूच्या डोंगरावर कोरून परिसर पूर्ण हिरवागार करण्यात आला आहे. आतापर्यंत या परिसरात बीच आणि स्थानिक मनुका प्रजातींची आठ लाख रोपे लावण्यात आली असून वर्षअखेरीस आणखी दोन लाख रोपांची, तर काठावर ६४ हजार पाणथळ वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. जुन्या टेलिंग्स धरणाला स्थिर करण्यासह पक्षिजीवनाने परिसर समृद्ध करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. उर्वरित खडकाचा आणि जमिनीचा आकार बदलणे, हाही या ठिकाणी जैवविविधता वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. एक दशकापूर्वी येथे खाण होती, हेदेखील आता ओळखू येत नाही.

अमेरिकेत तर खाण कंपन्यांना खड्डे पुनर्वसन करण्यास भाग पाडले जाते. खाणीतून बाहेर पडणारे दगड आणि इथल्या मातीत इतका रासायनिक कचरा आहे की, मातीचा थर टाकल्याशिवाय वनीकरण कठीणच. परंतु, वेस्ट व्हर्जिनियाच्या मोठ्या खाणीच्या परिसरात अशा मातीत लॅव्हेंडर वनस्पतीने तग धरला. कोरड्या भागात सहज उगवणारी ही वनस्पती ‘अ‍ॅडपॅलाशियन बोटॅनिकल’ कंपनीच्या मदतीने भूमध्य समुद्राच्या आसपासच्या कोरड्या, खडकाळ जमिनीत पूर्वीच्या खाण परिसरात लावली जात असून त्यापासून कंपनीने सुगंधी तेल, सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. लॅव्हेंडरवर मधमाशा आणि परागकणदेखील येतात, जे येथील जैवविविधता टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतात.

जुन्या खाणींच्या संवर्धनाबरोबरच लॅव्हेंडर पिकवण्यासाठी मजुरांची आवश्यकता असल्याने कोळसा उद्योगातील बेरोजगारांना इथेच रोजगारही मिळतो. जर्मनीतील कॉटबुस शहरातील लुसाटिया कोळसा खाणीत मानवनिर्मित तलावाच्या माध्यमातून २१ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष्य आहे.चीनच्या आतील मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील बुर्टाई कोळसा खाण सुमारे २०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात १.१२ दशलक्ष सौर पॅनेलसह पुनर्निर्मित करण्यात आली आहे. हा खाण परिसर पुन्हा हिरवागार करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर या विशाल खाणीचा वापर सौरपॅनेल बसवण्यासाठी करण्यात आला आहे. खाणींच्या खड्ड्यांचे पुनर्वसन खर्चिक आणि जटील असले तरी, त्याने होणार्‍या फायद्यांसह पर्यावरणातील बदलदेखील नक्कीच आश्वासक आहे, हे मात्र नक्की...




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.