२०२३ कुणाचे? ‘एल निनो’ की ‘ला निना’

    22-Jan-2023
Total Views |
global temperature
 

सध्या सगळीकडे गुलाबी थंडी पसरली आहे, परंतु, हा छोटासा काळ संपल्यावर येत्या २०२३ वर्षात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शकता हवामान तज्ज्ञांनी मांडली आहे. शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे की, या वर्षी, ‘एल निनो’ हवामानाच्या घटनेच्या पुनरागमनामुळे जागतिक तापमान ‘न भूतो न भविष्यति’ वाढू शकेल आणि अभूतपूर्व उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल. याविषयी ऊहापोह करणारा हा लेख..
 
 
मला खात्री आहे की, या वर्षी आपल्या सर्वांनी हिवाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. किंबहुना, काहीजण असेही म्हणतील की, यावर्षी अभूतपूर्व थंडी होती. पण, हा थंडीचा काळ लवकरच संपणार आहे. या वर्षी तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर होणार्‍या हवामान बदलांमुळे आपल्याला दैनंदिन आयुष्यातदेखील बदल करावे लागू शकतात.

सप्टेंबर २०२२ मध्ये तिसर्‍या वर्षात प्रवेश करणारी ’ला निना’ (La Nina) ही हवामानाची घटना २०२३ पर्यंत चालू राहण्याची शक्यता नाही, असे हवामान संशोधनाचे अंदाज सांगतात. ‘ला निना’ घटना तिसर्‍या वर्षी परत येणे, ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. सध्याची ’ला निना’ परिस्थिती, तुलनेने कमकुवत असूनही विलक्षण दीर्घकाळापर्यंत टिकली आहे. त्याची सुरुवात २०२०मध्ये झाली आणि सलग तिसर्‍या वर्षीदेखील पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अनुभवली गेली आहे. यामुळे ही परिस्थिती एक दुर्मीळ ‘ट्रिपल-डिप घटना’ म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. १९५० पासून नोंदवलेले इतर तीन वर्षीय ‘ला निना’ घटना १९९८-२००१, १९७३-१९७६ आणि १९५४-१९५६ या वर्षांमध्ये अनुभवल्या गेल्या आहेत.


’ला निना’च्या चौथ्या वर्षाची शक्यता जवळजवळ नाहीच म्हणता येईल. कारण, चार वर्षांच्या ‘ला निना‘ परिस्थितीची कधीही नोंद झाली नाही आहे आणि तीन वर्षांचीच घटना ही दुर्मीळ आहे. त्याऐवजी, ‘कोलंबिया क्लायमेट स्कूल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अ‍ॅण्ड सोसायटी’च्या अंदाजानुसार, पुढील वर्षी ‘न्यूट्रल’ किंवा ‘एल निनो‘ (El Nino) हवामान परिस्थितीची सुरुवात होण्याची शक्यता मनाली जाते आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ‘ला निना’ परिस्थिती म्हणजे भारतीय उपखंडात कमी तीव्र तापमान. गेल्या तीन वर्षांसासरखेच या वर्षी पण भारतात सप्टेंबर महिन्यात खूप पाऊस व्हायचे कारणहीदेखील हा तिसर्‍या वर्षात लांबलेली ‘ला निना’ परिस्थिती असू शकते. ही बहुचर्चित ‘एल निनो‘ आणि ‘ला निना‘ म्हणजे नक्की काय आहे ते बघूया?



global temperature


’एल निनो’ आणि ’ला निना’ हे दोन्ही ’एल निनो सदर्न ऑसिलेशन’ (El Nino Southern Occillation - ENSO) प्रणाली म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका मोठ्या हवामानातील घटनेचे भाग आहेत. प्रशांत महासागरात सामान्य स्थितीत, ’ट्रेड विंड्स’ विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात. या ’ट्रेड विंड्स’च्या वाहण्याने दक्षिण आणि मध्य अमेरिकेतून म्हणजेच कोलंबिया, इक्वाडोर, पेरू तसेच उत्तरेकडील मेक्सिको इत्यादी देशांजवळचे उबदार पाणी समुद्राच्या पृष्ठभागावरून आशियाकडे सरकवले जाते. या उबदार पाण्याच्या प्रवाहामुळे दक्षिण आणि मध्य अमेरिकेजवळील समुद्रात, समुद्राच्या पोटातून थंड पाणी वर येते. या प्रक्रियेला ‘अपवेलिंग’ (Upwelling) म्हणतात.

‘एल निनो‘ आणि ‘ला निना‘ या दोन विरोधी हवामान प्रक्रिया, सामान्य ‘एल निनो सदर्न ऑसिलेशन‘ परिस्थितीला तोडतात. ‘एल निनो‘ आणि ‘ला निना‘ या दोन्ही परिस्थितीचे हवामान, जंगलातील आग, नैसर्गिक परिसंस्था आणि अर्थव्यवस्थांवर जागतिक पातळीवर परिणाम होतात. या दोन्ही हवामान घटना सामान्यत: नऊ ते १२ महिने टिकतात. परंतु, काहीवेळा एका पक्ष जास्त वर्षेदेखील टिकू शकतात. साधारणपणे, ‘एल निनो‘ परिस्थिती ‘ला निना‘पेक्षा जास्त वेळा उद्भवते.

‘एल निनो‘मध्ये मध्य-पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते. या कालावधीत ‘ट्रेड विंड्स’ किंवा पूर्वीय वारे, म्हणजेच, विषुववृत्ताजवळ वाहणारे पूर्व-पश्चिम वारे कमकुवत होतात. ‘एल निनो’मुळे हे वारे दिशा बदलतात आणि पश्चिम प्रशांत महासागराकडे हे वारे वाहू लागतात. या बदलाने अमेरिकेच्या पूर्वी किनारपट्टीजवळचे पाण्याचे तापमान वाढू लागते. यांना पश्चिमीय वारे किवा ‘वेस्टरलीज’ असे म्हणतात. या पाण्याच्या तापमानात झालेल्या वाढीने समुद्राच्या पोटातून वर येणारे गार आणि पोषक पाणी पृष्ठभागावर येणे थांबते व याच्या परिणामाने किनार्‍याजवळ ‘फायटोप्लँक्टन’ आणि छोट्या इतर जीवांची संख्याही कमी होते. जे मासे ‘फायटोप्लँक्टन’ खातात, त्यांच्यासंख्येवरदेखील परिणाम होतो. या घटनांमुळे संपूर्ण अन्नसाखळीतले जीव प्रभावित होतात आणि संपूर्ण पृथ्वीच्या अनेक परिसंस्था विस्कळीत होतात.
 
पृष्ठभागावरील उष्णतेचे पुनर्वितरण समुद्राच्या वरच्या हवेच्या प्रवाहावर परिणाम करते. पूर्वेकडील वारे कोरडे आणि स्थिर आहेत, तर प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील वारे उबदार आणि आर्द्र आहेत. प्रशांत महासागराने पृथ्वीचा जवळजवळ एक तृतीयांश भाग व्यापला असल्याने, त्याच्या तापमानात होणारे बदल आणि वार्‍याच्या दिशेमध्ये आणि तापमानामध्ये होणार्‍या बादलांमुळे जागतिक हवामानाच्या पद्धतींमध्ये बदल दिसू लागतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग पॅटर्न’मुळे होणार्‍या व्यत्ययामुळे हे बदल नजीकच्या काळात अजून तीव्र स्वरूपात दिसू लागले आहेत. ‘एल निनो‘ भारतीय उपखंडात जास्त उष्णता आणि कमी पावसासाठी कारणीभूत ठरतो, असे निरीक्षण केले गेले आहे.
 
शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे की, या वर्षी ‘एल निनो‘ हवामानाच्या घटनेच्या पुनरागमनामुळे जागतिक तापमान ‘न भूतो न भविष्यति’ वाढू शकेल आणि अभूतपूर्व उष्णतेच्या लाटांचा भारताला सामना करायला लागू शकतो. प्रारंभिक अंदाज सूचित करतो की, ‘एल निनो‘ २०२३ नंतरदेखील परत येईल, ज्यामुळे जगभरात तीव्र हवामान वाढ दिसून येईल आणि त्यामुळे जगाचे तापमान १.५ डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त वाढेल. जगाने अनुभवलेली शेवटची मोठी ‘एल निनो‘ घटना घडली ती २०१६ साली. हे वर्ष, मानवसमाजातील नोंदल्या गेलेल्या इतिहासातला सर्वात उष्ण वर्ष ठरले. तापमानाबरोबरच ‘एल निनो’चा कमी पावसाशी देखील संबंध आहे आणि तसेच अचानक घडणार्‍या हवामान घटनांशीदेखील आहे. उदाहारणार्थ, अचानक येणारा मुसळधार पाऊस किंवा वादळं इ.

मानवजन्य हस्तक्षेपामुळे झालेल्या अलीकडील हवामान बदलांशी हे जोडले गेल्यास, आपण खात्री बाळगू शकतो की, परिस्थिती आपल्या अपेक्षेपेक्षा वाईट असू शकते. मानवी क्रियाकलापांमुळे उत्सर्जित होणार्‍या हरितगृह वायूंनी आतापर्यंत सरासरी जागतिक तापमानात सुमारे १.२ अंश सेंटीग्रेड वाढ झाली आहे. यामुळे आधीच जगभरात आपत्तिजनक परिणाम झाले आहेत. अमेरिका आणि युरोपमधील उष्णतेच्या लाटेपासून ते पाकिस्तान आणि नायजेरियातील विनाशकारी पुरापर्यंत लाखो लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणूनच, युनायटेड किंगडम, हवामानशास्त्र कार्यालयातील प्रमुख, प्रोफेसर अ‍ॅडम स्काईफ यांनी टिप्पणी केल्याप्रमाणे, पुढचे मोठे ‘एल निनो’ आपल्याला १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त सरासरी तापमानवाढीकडे नेण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

२०२३ हे अलीकडच्या इतिहासातील पहिले वर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही जेव्हा सामान्यापेक्षा १.५ अंशाने तापमान संपूर्ण पृथ्वीवर जास्त असेल. आपल्याला ठाऊक आहे की, हवामान,‘एल निनो’तील बदलांमुळे ‘एल निनो‘घटनांचे परिणाम अधिक मजबूत होणार आहेत आणि मानवनिर्मित हवामान बदलाच्या परिणामांमध्ये हे जोडल्यास, हे बदल अजून भीषण परिस्थिती निर्माण करू शकतात, हेदेखील आपण जाणतो. जर आपण या दोन गोष्टी एकत्र ठेवल्या, तर हे समजणे सोपे आहे की, पुढील ‘एल निनो‘ दरम्यान पृथ्वीवर अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा दिसण्याची शक्यता आहे. शिवाय, २०२४ हे वर्ष २०२३ पेक्षा जास्त उष्ण असण्याची शक्यतादेखील अंदाजानुसार खूप जास्त आहे.

संभाव्य ‘एल निनो‘चे प्रमाण अद्याप अस्पष्ट आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग’मधील प्रोफेसर अ‍ॅण्डी टर्नर यांनी माहिती दिली की, जरी अनेक ‘सीजनल’ अंदाजाचे मॉडेल्स २०२३ च्या उन्हाळ्यापासून मध्यम ताकदीच्या ‘एल निनो‘ स्थितीचे आगमन सुचवत असले, तरीही एप्रिल ते जून २०२३ पर्यंत संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होईल. काहीही असो, एक गोष्ट निश्चित आहे की, आगामी वर्षात पावसाळ्यात कमी पाऊस पडून अधिक कोरडा आणि अधिक उष्ण उन्हाळा आपल्या नशिबी असू शकतो. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर, तसेच सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर आपण सज्ज राहायला हवे, असे मला वाटते.
- डॉ. मयूरेश जोशी



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.