प्रवीण नेत्तारू हत्या – पीएफआय कट्टरतावाद्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल

    21-Jan-2023
Total Views |

प्रवीण नेत्तारू
 
 
नवी दिल्ली : कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कट्टरतावाद्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये पीएफआयवर हत्या घडविण्यासाठी प्रशिक्षण आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
गेल्या वर्षी २६ जुलै रोजी दक्षिण कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तारू यांची हत्या झाली होती. पीएफआयच्या कट्टरतावाद्यांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता, त्यानंतर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. एनआयएने याप्रकरणी शुक्रवारी बंगळुरूच्या एनआयए विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

 
समाजात दहशत, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्यासाठी पीएफआय छुप्या पद्धतीने दहशतवादी घटना घडवून आणत आहे. पीएफआयने २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचा आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी 'सर्व्हिस टीम' किंवा 'किलर स्क्वॉड' नावाच्या गुप्त पथकाची स्थापना केली होती. या पथकातील सदस्यांना शस्त्रास्त्रे वापरण्याचे तसेच हल्ल्याचे प्रशिक्षण, पाळत ठेवणे आणि तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पीएफआयच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार गेलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले होते, असे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
 
 
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 120ब, 153अ, 302 आणि 34 त्याचप्रमाणे युएपीए कायद्याचे कलम १६, १८, २० आणि २५ (१)(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहम्मद शियाब, अब्दुल बशीर, रियाझ, मुस्तफा पिचर, मसूद केए, कोडाजे मोहम्मद शेरीफ, अबुबकर सिद्दीक, नौफल एम, इस्माईल शफी के, मोहम्मद इक्बाल, शहीद एम, मोहम्मद शफीक जी, उमर फारुक एमआर, अब्दुल कबीर सी.ए, मोहम्मद इब्राहिम शाह, सानुल आबिद वाय, शेख सद्दाम हुसेन, झाकीर ए, एन अब्दुल हरीस, थुफेल एमएच यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.