मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर डॉ. स्मिता काळे बंडगर

21 Jan 2023 14:25:28

 डॉ. स्मिता काळे बंडगर

 
मुंबई : वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा जोपासणार्‍या डॉ. स्मिता काळे बंडगर यांची मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. डॉ. स्मिता काळे बंडगर या उच्चशिक्षित असून त्या भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या मुंबई विभागाच्या संयोजक आहेत. त्यांनी सामाजिक व पक्ष पातळीवर डॉक्टरांचे मोठे संघटन केले असून झोपडपट्टीत राहणार्‍या महिलांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.


डॉ. स्मिता काळे बंडगर यांचे वडील आबासाहेब बंडगर (बंडगर सर) हे दुष्काळ भागातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आल्यावर त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत कौतुकास्पद कार्य केले. त्यांनी दुष्काळी भागातील गोरगरीब मुलांना अल्प दरात शिक्षण मिळावे म्हणून, मुंबईत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेमध्ये आता हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या कार्याचा वारसा डॉ. स्मिता काळे जोपासत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांची मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड केली आहे.
 
या समितीवर विद्यमान आमदार मिहीर कोटेचा, आमदार अतुल भातखळकर, डॉ. स्मिता काळे यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. मुंबईसारख्या उपजिल्हा नियोजन समितीवर प्रथमच धनगर व मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षित तरुण महिलेला सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व समाजातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0