खोणी आणि शिरढोण येथील लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ

    21-Jan-2023
Total Views |

म्हाडा

 
कल्याण : कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ आणि इतर कारणांमुळे ‘म्हाडा’ने बांधलेल्या परवडणार्‍या घरांचा ताबा देण्यास उशिर झाल्याने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांच्या शेवटचा दहा टक्क्यांचा हफ्ता माफ करण्याची मागणी केली जात होती. या मागणीला यापूर्वी तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. परंतु, आता नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली असून या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोण प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे 1 लाख 63 हजार रुपयांनुसार सर्व नागरिकांचे 32 कोटी 62 लाख रुपये वाचले आहेत. या घरांसाठीची 2018 साली सोडत काढण्यात आली होती. तर 2021 पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते. एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी अडकले होते. त्यातच कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते. त्यामुळे शेवटचा हफ्ता माफ करण्याची मागणी केली जात होती. याबाबत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रव्यवहार देखील केला होता.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.