परदेशातील अनेक उद्योगसंस्थांची गुंतवणुकीसाठी पसंती भारताकडे : गीता गोपीनाथ

21 Jan 2023 15:23:04
 
Geeta Gopinath
 
 
मुंबई : परदेशातील अनेक व्यवसाय आणि कंपन्या भारताकडे गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून पाहत आहेत. ते चीनसह इतर देशांपासून फारकत घेत भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) उपव्यवस्थापकीय संचालिका गीता गोपीनाथ यांनी बुधवारी दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सांगितले.
 
 
गीता गोपीनाथ म्हणाल्या, "भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असली तरी कामगार कायदे आणि भूसंपादनाच्या आघाडीवर अजूनही सुधारणांची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवरील समस्यांसाठी सर्व देशांची एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून गट-तटाच्या प्रवृत्तीपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्यामुळे जागतिक विकास दराला धक्का बसण्याची शक्यता अधिक आहे."
 
 
"करोना आणि त्यांनतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे देशांना राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षेबद्दल अधिक चिंता वाटू लागली आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर देश विविध गटांत विभागले जातील अशी धोरणे हाती घेण्यात येत आहेत. जागतिक प्रतिकूलतेच्या वातावरणात भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी कौतुकास्पद आहे. मात्र त्याचवेळी उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठी मोठ्या सुधारणांची गरज आहे." गीता गोपीनाथ म्हणाल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0