ठाणे जिल्ह्यात नव्या प्रकारच्या पठाराचा शोध

21 Jan 2023 13:18:15

पठार

 
 
मुंबई : आजवर सह्याद्रीच्या मुख्य धारेवर आढळून आलेली बेसाल्टची पठारे आणि सह्याद्रीत आणि कोकणात असलेली जांभ्याची पठारे अभ्यासकांना माहीत होती. मात्र, समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर वसलेले बेसाल्ट दगडाचे पठार नुकतेच अभ्यासकांना आढळून आले आहे. समुद्रसपाटीपासून १५६ मीटर उंचीवर असलेले, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे बेसाल्ट दगडाचे पठार ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात आढळले आहे. या पठारावर वनस्पतींच्या २४ विविध कुळांतील ७६ प्रजातींची नोंद झाली आहे.
 

 
पुण्यामधील ’आघारकर संशोधन संस्था’ गेली दहा वर्षे सह्याद्रीतील विशेषतः खडकाळ पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करत आहे. खडकाळ पठारावर मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. त्यामुळे ही पठारे एक महत्त्वपूर्ण अधिवास ठरतात. या पठारांवर पावसाळ्यापुरतेच पाणी उपलब्ध होते. तसेच, माती आणि अन्नांश ही मर्यादित प्रमाणात असतात. ‘आघारकर संशोधन संस्थे’च्या चमूने अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात असलेले बेसाल्टच्या पठाराचा शोध लावला. येथील अतिविषम परिस्थितीत प्रजाती कशा टिकाव धरतील याचा अभ्यास करण्याची ही संधी या निमित्ताने मिळणार आहे.
 
दरम्यान, जागतिक पातळीवर जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण आणि धोक्यात असलेल्या भारतातील चार ‘ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’पैकी एक सह्याद्रीची रांग आहे. या रांगेत आढळलेल्या या नव्या पठारावरील प्रजातींचा अभ्यास केल्यास हवामान बदलामुळे प्रजातींच्या अतिजीवितेवर (Survival) होणार्‍या परिणामांविषयक माहितीचा साठा त्यातून खुला होण्याची शक्यता आहे. या माहितीमुळे खडकाळ पठारांचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व व त्यांच्या संवर्धनाच्या गरजेविषयी जनजागृती करण्यास मदत होईल. ‘आघारकर संशोधन संस्थे’चे संशोधक मंदार दातार यांच्यासोबत डॉ. अबोली कुलकर्णी, भूषण शिगवण आणि स्मृती विजयन यांनीही या पठाराचा अभ्यास केला.

 
खडकाळ पठाराचा हा चौथा प्रकार

 
महाराष्ट्रात बेसाल्ट, कमी उंचीचा जांभा आणि जास्त उंचीचा जांभा खडक अशा तीन प्रकारची खडकाळ पठारे आढळून आली होती. आता या चौथ्या प्रकाराचा आम्हाला शोध लागला आणि आम्ही त्यावर अभ्यास केला. कोकणातील जांभ्याच्या खडकांसारख्याच वनस्पती इथेही आढळून आल्या.
 
 
- मंदार दातार, संशोधक, आघारकर संशोधन संस्था
 
 
Powered By Sangraha 9.0