अभ्‍यासिका या सामुहिक ज्ञान संवर्धनाचे केंद्र – धनंजय कवी

20 Jan 2023 18:57:22

धनंजय कवी



ठाणे : व्‍यायाम शाळेत जसे शरिर सौष्‍ठवाचे काम होते तसे अभ्‍यासिका या सामुहिकरित्‍या ज्ञानवर्धन करण्‍याचे केंद्र आहेत. कोणतीही गोष्‍ट जेव्‍हा ती सामूहिकरित्‍या केली जाते तेव्‍हा त्‍यांचा लाभ हा परिणामारक आणि सर्वसमावेशक होत असतो. समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या शिवशक्‍ती अभ्‍यासिकेत देखील असेच सामुहिक ज्ञानवर्धनाचे काम होईल. असा विश्‍वास अभ्यासिका प्रकल्पाचे कोकण प्रांत प्रमुख धनंजय कवी यांनी व्‍यक्‍त केला.


समर्थ भारत व्‍यासपीठाने शिवशक्‍ती मित्र मंडळाच्‍या सहकार्याने श्रीनगर येथील वारलीपाडा भागात शिवशक्‍ती अभ्‍यासिका सुरू केली असून, या अभ्‍यासिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्‍न झाला त्‍यावेळी धनंजय कवी बोलत होते. यावेळी समर्थ भारतचे संचालक उल्‍हास कार्ले, अजय जोशी, सुजय कुलकर्णी, निखिल सुळे, श्रीराम दातार, अदिती दाते यांच्यासह अभ्‍यासिका प्रकल्‍पाचे ठाणे शहर समन्‍वयक दीपक दळवी, शिवशक्‍ती मंडळाच्‍या माजी अध्‍यक्षा गौरी चौरसिया,सुशांत देवरूखकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.

 
घरी देवाची आराधन केल्‍यानंतर जो अध्‍यात्मिक आनंद मिळतो त्‍यापेक्षा मंदीरात सामुहिकरित्‍या दर्शन घेतल्‍याने हा आनंद जसा व्दिगुणित होतो तसे घरी अभ्‍यास तर होतोच पण हेच ज्ञानसंवर्धन जर सामुहिकरित्‍या केले तर, त्‍याचा व्‍यापक परिणाम होत असल्‍याने शाळा किंवा गुरूकुल उभे राहिले. तसेच आधुनिक काळात अभ्‍यासिकांच्‍या माध्‍यमातुन हेच काम यशस्‍वीरित्‍या होत आहे.ही अभ्‍यासिका याचेच प्रतिक होईल. असा विश्‍वास धनंजय कवी यांनी यावेळी बोलतांना व्‍यक्‍त केला.


ठाण्यातील सेवा वस्ती म्हणजे झोपडपट्टी, बैठया चाळी अश्या ठिकाणी जिथे मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा नाही. अशा परिसरात अभ्यासिका आणि त्याला जोडून शैक्षणिक सहाय्य असा विद्यार्थी हिताचा हा प्रकल्प असुन अशा अजुन जवळपास ३५ अभ्‍यासिका ठाणे शहरातील विविध भागात सुरू करण्‍यात येणार आहेत. अशी माहिती प्रास्‍ताविकात संस्‍थेचे संचालक अजय जोशी यांनी दिली.


Powered By Sangraha 9.0