पुणे शहर बस वाहतुकीला प्रवाशांची पसंती

20 Jan 2023 16:05:17

‘पीएमपीएमएल बस


पुणे : येथील शहर बस वाहतुकीला प्रवाशांकडून आता उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने एकट्या डिसेंबर महिन्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. गेल्या महिन्यात ‘पीएमपी’च्या तिजोरीत ५१ कोटी, ७७ लाख रुपयांची भर पडली आहे. उत्पन्न आणि प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे ‘पीएमपी’ला दिलासा मिळाला आहे. त्यात ‘पीएमपी’च्या सर्व ‘ई-बस’ आता मार्गांवर धावू लागल्या असून प्रवाशांनी त्यास पसंती दिली आहे.  यामुळे प्रवास सुखकर होत असल्याची प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत. शहराची महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिले जाते.




‘पीएमपी’कडून १ हजार, ६५० बसच्या माध्यमातून ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. १० ते १२ लाख प्रवासी एका दिवसात ‘पीएमपी’द्वारे प्रवास करतात. ‘पीएमपी’चे विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी सुरू केलेल्या विविध प्रयत्नांना यश मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. ‘पीएमपी’च्या मासिक उत्पन्नाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये ५१ कोटी, ५ लाख रुपयांचे उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले होते.


डिसेंबर महिन्यात ५० हजार, ५६४ फेर्‍यांतून ५१ कोटी, ७७ लाखांचे उत्पन्न ‘पीएमपी’ने मिळवले. एकूण फेर्‍यांपैकी २९ हजार, १८६ फेर्‍या ठेकेदारांच्या बसच्या झाल्या, तर ‘पीएमपी’ची मालकी असलेल्या बसच्या २१ हजार, ३७८ फेर्‍या झाल्या. या फेर्‍यांमधून ३ कोटी, ६९ लाख प्रवाशांनी प्रवास केला.


गेल्या आठवड्यात शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्या साडेबारा लाखांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. ‘पीएमपी’कडे दाखल झालेल्या सर्व ‘ई-बस’ मार्गावर आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात ‘पीएमपी’ ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. साधारणतः १६०० ते १६५० बस मार्गावर धावत होत्या. त्यामधून दिवसाला १० ते १२ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. पण, ‘पीएमपी’कडून जास्तीत जास्त बस मार्गावर आणून प्रवाशांना सेवा देण्याच्या सूचना ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्याबरोबरच कोणत्या मार्गावर गर्दी असते, याचादेखील ‘पीएमपी’ने अभ्यास सुरू केला आहे. जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यापासून ‘पीएमपी’च्या दररोज १७०० ते १७५० बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे संख्यादेखील साडेबारा लाखांपर्यंत वाढली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.
४५८ ‘ई-बस’ मार्गावर


‘पीएमपी’च्या ताफ्यात आतापर्यंत ४५८ ‘ई-बस’ दाखल झाल्या आहेत. त्यानुसार भेकराईनगर, डेक्कन, निगडी, वाघोली, बाणेर हे ‘ई-बस’ डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. वाघोली येथील ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तेथून १०५ बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता ४५८ ‘ई-बस’ मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे एकूण बसची संख्यादेखील वाढली आहे.
सुविधा आवडली


पुणे शहरात ‘ई-बस’मुळे प्रवास सुखकर होत असून ही सुविधा आवडली.


-सायली देशमुख, धायरी


वेळेत जाणे सुलभ

 
शहरातील प्रत्येक भागात आता बस सुविधा उपलब्ध झाल्याने कामांच्या ठिकाणी वेळेत जाणे सुलभ होत आहे.


-प्रकाश भालेराव, बाणेर
इंधन खर्च आटोक्यात


शहर बस वाहतुकीमुळे घरातील वाहनावर होणारा खर्च वाचला आहे. ‘सीएनजी’, पेट्रोलवरील खर्च आटोक्यात आला


-महेश कुळकर्णी, डांगे चौक
Powered By Sangraha 9.0