डोंबिवलीत रंगणार मकरोत्सव....

    20-Jan-2023
Total Views |

डोंबिवली मकरोत्सव.


डोंबिवली : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे २६ ते २९ जानेवारी २०२३ . या कालावधीत सायंकाळी ६ वाजता टिळकनगर शाळेच्या पटांगण, डोंबिवली पूर्व येथे मकरोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


मकरोत्सवाच्या पहिल्या पुष्पात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी डोंबिवलीकर आणि जागतिक शांतीदूत संदीप वासलेकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. वसुधैव कुटुम्बकम् , ए वर्ल्ड विथआऊट वाॅर या संदीप वासलेकर यांच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने तसेच सध्याच्या जगातील अस्थिरतेच्या अनुषंगाने जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर हे संदीप वासलेकरांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.


मकरोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता समर्थ भक्त समीर लिमये हे काँर्पोरेट किर्तन सादर करणार आहेत. यामध्ये विशेष करुन मनाच्या श्लोकांमधून दिलेल्या संदेशाचे माणसाच्या दैनंदिन आणि काँर्पोरेट व्यवहारातील महत्व विशद करणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.

 
मकरोत्सवाच्या तिसऱ्या पुष्पात २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रघुलीला एन्टरप्रायझेस निर्मित सप्तसूर झंकारित बोले हा नाट्यसंगीताची अमृत परंपरा सांगणारा आदित्य बिवलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात सध्याचे आघाडीचे तरुण नाट्यसंगीत गायक ओमकार प्रभुघाटे, धनंजय म्हसकर, निमिष कैकाडी, केतकी चैतन्य आणि प्राजक्ता काकतकर गाण्याची बाजू सांभाळणार आहेत. तबल्याची साथ धनंजय पुराणीक आणि आँर्गनवर निरंजन‌ लेले असणार आहेत तर निवेदनाची बाजू प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक सांभाळणार आहे.


मकरोत्सवाच्या चौथ्या आणि अखेरच्या पुष्पात भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ च्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून 'मेरी आवाज ही पहेचान है' हा स्व. लतादीदींनी हिंदी‌ चित्रपटात गायलेल्या शास्त्रीय ढंगातील गाण्यांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संहिता कौशल इनामदार यांनी लिहिली आहे तसेच कौशल इनामदार हेच या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत, संगीत संयोजनाची बाजू कमलेश भडकमकर सांभाळणार आहेत. शरयू दाते, मधुरा कुंभार आणि सुस्मिरता डवाळकर गीते सादर करणार आहेत तर साथसंगतीला तबल्यावर आर्चिस लेले, ढोलक अनिल करंजावकर , ढोलकी कृष्णा मुसळे गिटार अमोघ दांडेकर, मेंडोलीन दिनेश भोसले, बासरी अमर ओक आणि किबोर्डवर अमित गोठिवरेकर आणि दिप वझे असणार आहेत. सांस्कृतिक नगरीतील मकरोत्सवाला जास्तीत जास्त रसिक डोंबिवलीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे मकरोत्सव समिती प्रमुख केदार‌ पाध्ये‌ यांनी केले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.