मालवणी महोत्सवात मिळतेय हौसिंग सोसायटीच्या कामाची माहिती

शिवाईनगरमधील मालवणी महोत्सवात हौसिंग फेडरेशनच्या स्टॉलवर झुंबड

    20-Jan-2023
Total Views |

मालवणी महोत्सव

ठाणे : मालवणी महोत्सव म्हटला की, झणझणीत मसालेदार कोकणी खाद्यसंस्कृतीचे चित्र डोळ्यासमोर येत असते.मात्र, ठाण्यातील शिवाई नगर येथे सुरु असलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या मालवणी महोत्सवात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच हौसिंग सोसायटीच्या विविध कामकाजाची माहिती व साहित्य नागरीकांसाठी उपलब्ध केले आहे. महोत्सवाच्या प्रवेशद्वारावरच ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचा हा स्टॉल तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.

 
कोकण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावतीने ठाण्याच्या शिवाईनगर येथे २२ जाने. पर्यत मालवणी महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात मालवणी खाद्यसंस्कृतीसह महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा व स्थानिक मुलांच्या नृत्य स्पर्धा, दशावतारी नाटक, मराठी गाण्यांचा वाद्यवृंद,कवी संमेलन, डबलबारी भजन अशा भरगच्च सांस्कृतिक मेजवानीसोबतच हौसिंग सोसायटीच्या हिताची माहितीही उपलब्ध केली आहे.महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने लावलेल्या स्टॉलवर हौसिंग सोसायटीसाठी लागणारे उपविधी व अन्य समग्र साहित्य उपलब्ध केले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम २४ अ (१) अन्वये सोसायटीच्या ( सहकारी संस्थेच्या) पदाधिकारी, संचालक व सभासद व सेवकांना शिक्षण व प्रशिक्षण बंधनकारक केल्याने ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनला महाराष्ट राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांनी मंजुरी दिली आहे. तेव्हा ज्यांना असे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांना फेडरेशनच्या स्टॉलवरून अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याशिवाय, सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन कोर्स (सोसायटी मॅनेजर) संदर्भात मार्गदर्शन दिले जाते.

 
सोसायटी निवडणुक प्रक्रियेसाठी मदत
२५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायटीच्या निवडणुक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याविषयीची माहितीही या स्टॉलवरून दिली जाते.विशेष म्हणजे,हे प्रशिक्षण हौसिंग फेडरेशनकडुन दिले जात असुन त्याचे अधिकृत प्रमाणपत्र मिळत असल्याने या प्रशिक्षितांना निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहण्याची पात्रता प्राप्त होते. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.