शंकराचार्यांनंतर राहुल गांधीच...; फारुख अब्दुल्ला यांची मुक्ताफळे

20 Jan 2023 19:03:06

Farooq Abdullah


नवी दिल्ली : कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा करणारे राहुल गांधी हे आद्य शंकराचार्यांनंतर दुसरे व्यक्ती ठरले आहेत, अशी मुक्ताफळे जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी उधळली आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू – काश्मीरमध्ये पोहोचली आहे. तेथे नॅशनल कान्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्षा महेबूबा मुफ्ती, शिवसेना – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माकप नेते नोहम्मद युसूफ आदी उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी यांची स्तुती करण्याच्या नादात फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट आद्य शंकराचार्यांशी केली. ते म्हणाले, शतकांपूर्वी शंकराचार्य येथे आले होते. तेव्हा रस्ते नव्हते तर सर्वत्र जंगल होते. ते कन्याकुमारीहून पायी चालत काश्मीरला आले होते. त्यानंतर राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांनी कन्याकुमारीतून यात्रा काढली आणि ते काश्मीरला पोहोचले आहेत.

 
द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गांधी आणि रामाचा देश आहे, भारतात द्वेष निर्माण केला जात आहे आणि धर्मांना एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहेत. मात्र, हा प्रवास भारताला एकसंघ करेल, असाही दावा अब्दुल्ला यांनी केला आहे.


Powered By Sangraha 9.0