अडचणींचा अस्त करणारा ‘उदय’

20 Jan 2023 22:25:54
उदय जगताप


गरिबीचे चटके, दहावीतले अपयश, वडिलांचे निधन, व्यवसायात विश्वासघात, कर्जबाजारीपणा, घरात लाखोंची चोरी आणि हार्टअटॅक... अशा असंख्य अडचणींवर मात करत यशस्वी उद्योजक ठरलेल्या उदय जगताप यांच्याविषयी...


नाशिकमध्ये एका छोट्या झोपडपट्टीत जन्मलेल्या उदय शिवाजीराव जगताप यांना लहानपणीच गरिबीचे चटके सहन करावे लागले. उदरनिर्वाहासाठी आई-वडील सकाळी भाजीपाला विकून नंतर शेतमजुरी करत. मनपाच्या शाळा क्र. ५५ मधून उदय यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे पुणे विद्यार्थी गृह महाराष्ट्र विद्यालयात प्रवेश घेतला. शालेय खर्च भागविण्यासाठी उदय सुट्टीच्या काळात काकडी-मसाला चणे विकणे, पाणपोईवर पाणीवाटप करणे, लग्नात वाढपी म्हणून करणे अशी कामे करत असत. गरिबीचा भार आणि दुसरीकडे मार्गदर्शनाचा अभाव यांमुळे उदय यांना दहावीत अपयश आले आणि दुसर्‍या प्रयत्नात त्यांनी दहावीत यश मिळवले. परंतु, पैसा कमावणे गरजेचे असल्याने त्यांनी ‘नेहरू रोजगार योजनें’तर्गत सहा महिन्यांचा वायरमनचे प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी काही कंत्राटदारांकडे रोजंदारीवर काम केले. नंतर पंचवटी महाविद्यालयात त्यांनी अकरावीत वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला.

बारावीत अचानक वडिलांचे निधन झाल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुन्हा उदय यांनी लाईट फीटिंगची कामे करण्यास सुरूवात केली. यानंतर वेगळी वाट निवडत त्यांनी अवघ्या पाच हजारांच्या भांडवलासह ’उदय डेकोरेटर्स’ नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. गोडाऊन नाही, ना स्वतंत्र जागा, सर्व साहित्य उघड्यावरच... फक्त पाऊस आला की साहित्य झाकायचे. २००३च्या नाशिक येथील कुंभमेळ्यात त्यांना दोन साधूंनी ‘मंडप डेकोरटर्स’चे काम दिले. परंतु, त्या साधूंनी चांदीची नाणी उधळल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात ४० जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साधू फरार झाले आणि उदय यांना व्याजाने पैसे घेऊन केलेल्या कामाचा मोबदला मिळालाच नाही. परिणामी, उदय कर्जबाजारी झाले आणि सगळं साहित्य विकून त्यांना कर्ज फेडून व्यवसाय बंद करावा लागला.

यादरम्यान अनेकदा आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात आले. परंतु, हातात कला आहे, त्यामुळे कधीही उपाशी राहणार नाही, हा विचार करून त्यांनी लढण्याचा इरादा पक्का केला. यावेळी पत्नी सोनल यांनी हिंमत आणि साथ दिली. एका मंडप डेकोरेटरकडे ते सुरुवातीला तीन हजार पगारावर काम करू लागले. कामाचे कौशल्य पाहून पगार वाढत गेला आणि झोपडीतून बंगल्यात राहण्याचे स्वप्न खुणावू लागले. बचतीच्या पैशांत जागा विकत घेऊन बंगला बांधण्याला सुरूवात केली आणि त्याचवेळी बिल्डर पैसे घेऊन पळून गेला आणि आईदेखील आजारी पडली. या परिस्थितीतही सावरत त्यांनी घराचे स्वप्न पूर्ण करत घराला ‘स्वप्नपूर्ती’ असे नाव दिले. यानंतर उदय यांनी २०१५ साली नोकरी सोडून स्वतःचा स्वतंत्र ‘उदय लाईट्स’ या नावाने व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांनी मंडप बाजूला करून फक्त लाईट्सचा व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला अनेकांनी पैसे बुडवले, कामगार काम सोडून गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुतण्यांना या व्यवसायातील बारकावे शिकवले. हळूहळू व्यवसायाची भरभराट होत गेली. स्वतःचे जनरेटर, मालवाहू वाहन, अद्ययावत तंत्रज्ञानाचे साहित्य, गोडाऊन बांधले. इतक्या वर्षात कधीही त्यांच्या कामात अपघात घडलेला नाही. वेळ कोणतीही असो, प्रत्येक कामाच्या ठिकाणी ते स्वतः जातीने उपस्थित राहतात. नाशिकमध्ये पार पडलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व ’लाईटिंग’ची कामेही त्यांना मिळाली. विद्युत रोषणाईच्या साहाय्याने त्यांनी तिरंगा बनवला, ज्यामुळे त्यांचे विशेष कौतुक झाले. मालेगाव येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे कामही त्यांना मिळाले. अनेक आमदार, खासदार, मंत्री, प्रतिष्ठितांचे अनेक कामे त्यांनी केली आहेत. नाशिक जिल्ह्यात ‘स्पेशल लाईट्स इफेक्ट’साठी उदय यांना सध्या ओळखले जाते.

 २०० वॅट लाईट्सचा प्रयोग नाशिकमध्ये प्रथम त्यांनी सुरू केला. सध्या नाशिकमध्ये सर्वाधिक २०० वॅटचे ’लाईट फोकस’ त्यांच्याकडेच आहेत. या लाईट्समुळे वीजबचत कमी होते आणि पर्यावरणबचतही होते. कोरोना काळात लग्न सोहळ्यांवर बंदी आल्याने त्याचा फटकाही त्यांना बसला. गतवर्षी त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल ५० लाखांच्या पुढे गेली. सध्या त्यांच्यामुळे पाच जणांना रोजगार मिळाला असून विशेष म्हणजे, या सर्वांना दररोज घरचे जेवण दिले जाते. उदय यांना प्रतीक जगताप, आशुतोष जगताप, रोहित जाधव, दिनेश पांडे, संतोष कासार, अलास्का लॉन्स यांचे यांचे सहकार्य लाभले. भविष्यात जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रातही व्यवसायाच्या बळावर नाव कमावण्याची त्यांची इच्छा आहे. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक जणांना काम शिकवले आहे. त्यातील अनेकजण सध्या यशस्वी व्यावसायिक झाले आहे. २०१५ साली घरी २० लाखांची चोरी झाली, तरीही त्यांनी पुन्हा व्यवसायात उभारी घेतली, हे विशेष.

‘नाशिक फ्रेण्ड सर्कल’, ‘मैत्री कट्टा’ यांच्या माध्यमातून उदय सामाजिक कार्यातही हातभार लावतात. २०२१ साली हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. प्रामाणिक प्रयत्न यश मिळवून देतात. ‘’माझ्याकडे कुणीही गरजू आला तरीही त्याला मी काम शिकवतो. या व्यवसायात पैसा निश्चित आहे. परंतु, कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असण्याबरोबरच मेहनतही तितकीच घ्यावी लागते. काम करताना कोणताही अपघात होऊ नये, याची मी काळजी घेतो,” असे उदय सांगतात. आयुष्यात असंख्य अडचणींवर मात करून यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास करणार्‍या उदय जगताप यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!







Powered By Sangraha 9.0