'भारत जोडो'च्या प्रचाराला 'पेड पत्रकारिते'चा टेकू

SC व्होटबँक वळविण्यासाठी पैसे वाटल्याचीही चर्चा

    20-Jan-2023
Total Views |

भारत जोडो


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेल्या भारत जोडो यात्रेवरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 'भारत जोडो' यात्रा यशस्वी करण्यासाठी काही पत्रकारांना हाताशी धरत पेड पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही दावे केले जात असून 'भारत जोडो'च्या प्रचाराला 'पेड पत्रकारिते'चा टेकू दिल्याचे आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एससी मतदारवर्गावर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही घटकांना विशिष्ट जिल्हे आणि भागांमध्ये प्रचार कारण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, पैसे देण्यात आलेल्या मंडळींमध्ये काही पत्रकार, समाज माध्यमांवर लिखाण करणारी मंडळी आणि इतर काहींचा समावेश आहे. तसेच करण्यात आलेल्या दाव्यात या मंडळींना प्रचारासाठी देण्यात आलेली रक्कम, त्याचा तपशील, रक्कम किंवा मोबदला कुठल्या माध्यमात देण्यात आला त्याची माहिती आणि नेमक्या कोणत्या भागात त्या मंडळींनी काम करायचे आणि यात्रेचा प्रभाव वाढवायचा याची तपशीलवार माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास निश्चितच करण्यात आलेली भारत जोडो यात्रा ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात आली होती. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून प्रवास करत ही यात्रा पुढे रवाना झाली खरी पण यात्रा महाराष्ट्रात असताना मात्र अनेक वादाच्या घटनांना काँग्रेसला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे तर यात्रेला महाराष्ट्रातून काढता पाय घ्यावा लागतो का अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, या सगळ्या विषयांच्या पलीकडे जाऊन आता यात्रेच्या यशस्वीतेसाठी काही पत्रकार आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना पैसे देऊन काही भाग आणि वर्गांमध्ये यात्रा यशस्वी करण्यासाठी छुपे कॅम्पेन चालवल्याचा आरोप केला जात आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.