प्रेक्षकांना आस्वादक बनवणारा समीक्षक!

02 Jan 2023 19:44:02
 
sudhir
 
 
 
 
 
आज चित्रपटसृष्टीची होत असलेली वाताहत आपण पाहतो आहोत. एकेकाळी या चंदेरी दुनियेचा सुवर्णकाळ होता. चित्रपट म्हणजे निखळ मनोरंजन अशी कल्पना एकेकाळी होती. मात्र जसे घराघरात टेलिव्हिजन येत गेले तशी मनोरंजनाची व्याख्या बदलली, ते पाहून चित्रपटांना आपल्यात बदल करणे गरजेचे होते. आता रसिक प्रेक्षक मनोरंजनासाठी चित्रपटांवर अवलंबून नव्हता. अशावेळी चित्रपटाने लोकशिक्षण देणे व प्रेक्षकांचे समुपदेशन करणे गरजेचे होते. काही प्रमाणात अपवादात्मक पद्धतीत ते झालेही परंतु एकंदर चित्रपट सृष्टी पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांभोवती फिरत राहिल्याने उद्देश आणि इतर महत्वाचे घटक उजेडात आलेच नाहीत. चित्रपट आपले सत्व हरवून बसले. कोरोना महामारीनंतर या चित्रपट सृष्टीला उतरंड लागली. परंतु याच काळात याच सृष्टीतील काही कलाकार, काही निर्माते-दिग्दर्शक वेगळा विचार जरूर करू लागले, त्यामुळे हा पूर्णविराम नाही तर स्वल्पविराम आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु हा व्हिडीओ चित्रपट सृष्टीबद्दल नाही. तर चित्रपटांवर मनापासून प्रेम करणारे, जेष्ठ आणि श्रेष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आहे.
 
२०२३ मध्ये १ जानेवारी रोजी सुधीर नांदगावकर यांचे निधन झाले. चित्रपटांची उत्तम समीक्षा करणारा एक आस्वादक शांत झाला. चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यांनी आस्वादक व्हायला हवं. संगीत, प्रकाश, कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण आणि कथेमागची कथा या सर्वांसहित त्यांनी चित्रपट पाहायला हवा. असं त्यांचं म्हणणं होतं. असा प्रेक्षक निर्माण करण्याची जबादारी समीक्षकाची असते. चित्रपट कसा पाहावा हे समीक्षक समजावून सांगतो. आणि ते काम नांदगावकरांनी चपखल केले होते. १९९२ साली सुनील शेट्टींचा 'बलवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळेपासूनच त्यांनी आपली समिक्ष थांबवली. आणि ते फार मोठ्या उद्योगास लागले. त्यांनी चित्रपट महोत्सव सुरु केले. समाजप्रबोधन करणारे चित्रपट तयार व्हावे, परंतु ही लगेच सत्यात साध्य होणारी गोष्ट नाही परंतु त्यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवेत हे ते जाणून होते.
 
चित्रपट महोत्सव, प्रभात चित्र मंडळ, फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया, चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना 'फिप्रेस्की ' यात त्यांचा वावर सुरु झाला. चित्रपट संस्कृतीत त्यांनी स्वतःला अक्षरश: झोकून दिलं. तेच आपले विश्व मानलं. आज प्रयत्न केले तर पंचवीस वर्षांनी का होईना पण चित्रपट संस्कृती रुजेल यावर त्यांचा विश्वास होता. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट प्रभातच्या सभासदांसाठी आयोजित करावेत यासाठीचा त्यांचा ध्यास कमालीचा होता. त्यांनी साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रातील अनेकांना प्रभातही जोडले. प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रवाहातील चित्रपट पाहावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत.
 
त्यांनी मराठा दैनिकात समीक्षा करत आपल्या करियरला सुरुवात केली. ते संघनिष्ठ. भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही त्यांची राजकारणातील दैवतं. तसेच सत्यजित रे हे त्यांचे चित्रपट सृष्टीतील रोल मॉडेल. सुसंस्कृतपणा हा सर्वांचा सामान धागा. हीच त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी असावी. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जगाकडे ते निरपेक्ष दृष्टिकोनाने पाहत. जो जसा, तो तसा स्वीकारण्याची त्यांची पद्धत होती. एकाद्याला एकाद्या गोष्टीत रस नाही म्हंटल्यावर आपला मुद्दा ते रेटत नसत. ते वेगळं सांगत, चौकटबाहेरचं बोलत. त्यातून त्यांचं वेगळेपण, विचारशक्ती दिसून येई.
 
५ जुलै १९६८ रोजी त्यांनी वसंत साठेसाहेबांसह पुढाकार घेत प्रभात चित्र मंडळाची स्थापना केली. वेगळ्या चित्रपटांना प्लॅटफाॅर्म आणि रसिकांना कलात्मक आनंद मिळावा असा त्यामागे हेतू होता. १९९७ साली त्यांनी मुंबईचा आपला चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे पाऊल टाकून मामी महोत्सव सुरु केला. काही वर्षे त्यांच्याच अधिपत्याखाली तो होई. नंतर मामी महोत्सवाचा प्रवास बदलला. सुधीर नांदगावकर स्वस्थ बसणाऱ्यांतील कधीच नव्हते. त्यांनी थर्ड आय आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सुरु केले आणि परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतून या महोत्सवाचे कामकाज सुरु केले.
 
ते गेले आणि चित्रपट सृष्टीतील एक सतत फिरतं चाक शांत झालं. हा वसा पुढे चालायला हवा. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आपणच करायला हवेत ही माझी मनापासून इच्छा आहे. मुंबई तरुण भारत तर्फे त्यांच्या स्मृतीस सविनय श्रद्धांजली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0