नेहरू सेंटर येथे ' लगीन माझ्या संस्कृतीचं'

    18-Jan-2023
Total Views |

sanskruti
 
 
 
मुंबई : विज्ञान, चित्रकला, ऐतिहासिक वस्तूचे जतन या गोष्टीसाठी नेहरू सेंटर जेवढे लोकप्रिय आहे तेवढेच ते सांस्कृतिक विचार आणि प्रचार करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सर्वोत्तम मनोरंजन आणि दर्जेदार कलाकृती सादर करण्यात सेंटर नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे. शास्त्रीय नृत्य, संगीत, गायन यांना प्राधान्य देताना जुन्या - नव्या नाटकांचा रंग अविष्कार येथे सातत्याने होताना दिसतो. लोक कलाप्रकार हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.
 
 
माणसाची जगण्याची जीवनशैली बदलली आणि काळानुरूप काही लोक कलाप्रकार स्मृतीआड गेल्या. लोककलेचे अभ्यास, संशोधक आपल्या पद्धतीने त्यांची नोंदणी ठेवत आलेले आहेत. काही संस्था अशा लुप्त होणाऱ्या कलाप्रकारांना मूळ ग्रामस्थांना घेऊन गावोगावी त्यांचे प्रयोग करीत असतात. वाघ्या मुरळी, गोंधळ, तारपा, ठाकरं, धनगरी गजा, बाल्या, कोळी, पोवाडा, लावणी, वासुदेव असे अनेक कलाप्रकार प्रेक्षकांना ज्ञात असतात. शहरी कलाकारांनी ते सादर केलेले असते. पण हीच कला परंपरा, रीतीरीवाज म्हणून मुळ कलाकारांकडुन जागवल्या जातात तेव्हा ते प्रेक्षकांना हवे असते.
 
 
नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा लोकनृत्यचा जागर मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. 'लगीन माझ्या संस्कृतीचं' या शीर्षकात हा रंगारंग कार्यक्रम शुक्रवारी, दि. २७ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता वरलीच्या नेहरू सेंटर येथे होणार आहे. लावणी सम्राज्ञ पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या स्मृतीस हा कार्यक्रम अर्पण केला जाणार आहे. प्रसिद्ध नर्तक, नृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. त्यांच्या नृत्य दिग्दर्शनात पन्नास कलाकारांचा ताफा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. विनय अंगज, केतन कुंभार, संदेश मगर यांचे या कलाकृतला सहाय्य लाभले आहे.
 
 
शेलार हे लोककलेचे अभ्यासक आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले आहे. आय. पी. एल, कॉमनवेल्थ या आणि अशा अनेक खेळांच्या महोत्सवाचे जगभरांत कौतुक झाले आहे. त्यात मनोरंजनाची बाजू शेलार यांनी सांभाळलेली आहे. २३ जानेवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून सभागृहाच्या तिकीट खिडकीवर विनामूल्य प्रवेशिका देण्यात येतील.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.