भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या विद्यमाने रविवार, दि. 9 जानेवारी रोजी ‘इतिहास कट्ट्या’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक होते डॉ. बालमुकुंद पांडे, राष्ट्रीय संघटनमंत्री, अखिल भारतीय इतिहास संकलन योजना, नवी दिल्ली. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच. या संपूर्ण कार्यक्रमाचा उहापोह या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताच्या प्रत्येक गावातील इतिहास हा आपल्या पूर्वजांच्या गौरवगाथेचा समृद्ध वारसा आहे. आत्तापर्यंत भारतीय इतिहास म्हणजे काही पराजित, अपमानित आणि गरीब लोकांचा इतिहास, असे विकृत चित्र मुस्लीम व पाश्चात्य इतिहासकारांनी जगामध्ये पसरवले होते. हे चित्र बदलून आपल्या देशाचा इतिहास भारतीय जनमानसात खोलवर रुजलेल्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व शाश्वत जीवनमूल्यांवर आधारित लिहिण्याचे कार्य अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून देशभर सुरु आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी तरुण अभ्यासकांनी पुढे यायला हवे. आपण सीमेवर जाऊन शस्त्र चालवू शकत नाही. परंतु, देशासाठी लेखणी हातात घेऊन, अभ्यासपूर्वक हे चित्र बदलले पाहिजे. ते आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”भारताच्या प्रत्येक गावात घडलेला इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांच्या गौरवगाथेचा समृद्ध वारसा आहे. तो समजून घेऊन, आपल्या भावी पिढीस योग्य मार्गदर्शन करण्यासाठी इतिहासाच्या विद्वानांनी पुढे यायला हवे,” असे डॉ. बालमुकुंद पांडे म्हणाले. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या विद्यमाने रविवार, दि. 9 जानेवारी रोजी ‘इतिहास कट्ट्या’कार्यक्रमामध्ये ते मनोगत व्यक्त करत होते.“भारताचा इतिहास हा केवळ राजघराण्यांच्या लढायांचा इतिहास नसून, तो इथल्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचा इतिहास आहे. तो आपल्या परंपरांमध्ये सामावलेला आहे. त्या परंपरांचा भारतीय समाजमनावरआजही असलेला प्रभाव यांचा समाजशास्त्रीय व सांस्कृतिकदृष्ट्या अभ्यास केला, तर भ्रमाचा पडदा दूर होऊन ज्ञानदीप प्रज्ज्वलित होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर ‘इतिहास कट्टा’ उपक्रमातील ‘साष्टीच्या गोष्टी’ या गप्पांच्या मालिकेतील, पाशुपत संप्रदायातील आद्य शैवगुंफा : जोगेश्वरी या तिसर्या सत्राचे प्रमुख वक्ते, युवा इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांनी दृक्श्राव्य माध्यमातून जोगेश्वरी लेणी या विषयावर अतिशय रंजक पद्धतीने, श्रोत्यांना प्रश्न विचारत, त्यांच्या सहभागाने कार्यक्रम रंगतदार केला.आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी नवीन म्हात्रे यांनी बी.कॉम. नंतर ’इंडोलॉजी’ मध्ये एम.ए केले. प्राध्यापकपदासाठी आवश्यक असलेल्या ‘सेट’ व ‘नेट’ या परीक्षाही ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. आपल्या या ज्ञानाचा समाजाला लाभ मिळावा, यासाठी ते ‘आरंभ हेरीटेज’ या नावाने वारसास्थळांच्या सहलींचेही आयोजन करीत असतात. शिवाय वेगवेगळ्या नियतकालिकांतून ऐतिहासिक विषयांवर लेखन करीत असतात. शाळा महाविद्यालयांतून त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील नाण्यांची प्रदर्शनेही आयोजित करतात.
साष्टीच्या तिसर्या गोष्टीला सुरुवात करताना, त्यांनी सर्वप्रथम वांद्रे ते वसई या भागात सुमारे दोनशेच्या वर गुंफा आहेत, ही माहिती दिली. त्यात कान्हेरीतील 110 गुंफा, कोंडिवटे लेणी येथील 20-25 गुंफा, मागाठाणे येथील गुंफा वगैरे मिळून 150 ते 175 गुंफा या बौद्ध गुंफा आहेत. परंतु, जोगेश्वरी, मंडपेश्वर आणि घारापुरी(एलिफंटा) या तीनच गुंफा या शैव गुंफा असून, जोगेश्वरी येथील गुंफा या आद्य शैव गुंफा आहेत आणि जोगेश्वरी लेणी हे लेण्यांत कोरलेले गुंफा मंदिर आहे हे स्पष्ट केले.कला,स्थापत्य व इतर घटकांचा विचार करून जोगेश्वरी लेण्यांचा काळ हा इ.स. 500-600 इतका ढोबळमानाने ठरविलेला आहे. काही संशोधकांच्या मते, ही लेणी मौर्य, कलचुरी यांनी इ.स. सहाव्या शतकात निर्माण केली असून या लेण्यांच्या तलविन्यासाचे घारापुरी क्र.1 आणि वेरुळ येथील क्र.29 च्या लेण्यांशी साम्य आहे. येथे शिवाची अनुग्रहमूर्ती (रावणावर केलेला अनुग्रह), कल्याणसुंदरमूर्ती, लीलामूर्ती तसेच आचार्य लकुलीशांची शिल्पे आहेत. अशी सचित्र माहिती त्यांनी दिली. तेव्हा अशीच अनुग्रहमूर्ती अंकोरवट येथेसुद्धा आहे, असे तिथे उपस्थित असलेल्या श्रीधर साठे यांनी सांगितले.
गप्पा सुरू असतानाच म्हात्रे पुढे म्हणाले की, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे ही भूमिगत लेणी असून पूर्व आणि पश्चिम दिशेस मुख्य प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारातून लेण्याच्या जमिनीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी 30 ते 40 फूट खाली उतरावे लागते. म्हात्रे यांनी काही रंजक गोष्टी सांगताना वैभवशाली इतिहासदेखील उलगडून दाखवला. ते म्हणाले, “उत्तर कोकणातील सर्वात जुना गणपती जोगेश्वरी लेणी इथे आहे. आयुध पुरुष म्हणजे सुदर्शन चक्र पुरुष, त्रिशुल पुरुष ही संकल्पना असलेली शिल्पे येथे आढळतात. अज्ञानरुपी असुरावर मात करून ज्ञान देणारा नटेश्वर आणि त्याच्या पायाखाली असणारा अपस्मार असुर हे शिल्प आगळेवेगळे आहे.” शैव परंपरेनुसार लौकिक जीवनातील शिवाचा अठ्ठावीसावा अवतार म्हणजे आचार्य लकुलीश. त्यांचा जन्म गुजरातेतील कायावरोहण येथे झाला. गुजरातेतील अहमदाबाद येथे लकुलीश योग विश्वविद्यालय आहे, त्याचा त्यांनी उल्लेख केला. संसारसागरातील हा पशुरूपी जीव, मोहरुपी पाशात जखडलेला असून त्याचा पालक हा शिव आहे, हा शैव परंपरेचा कार्यकारणभाव आहे आणि तो भाव टिपणारी शिल्पे येथे कोरलेली आहेत आणि त्या शिल्पकलेतून उलगडणारी सूक्ते इथे आपसूकच जाणवतात. घारापुरी लेणी आणि जोगेश्वरी लेणी यांच्यात इतके आश्चर्यकारक साम्य आहे की, जोगेश्वरी लेणी म्हणजे घारापुरी लेण्यांची (मिनिएचर) लघु शिल्पाकृती असल्याचा भास होतो, असे म्हात्रे म्हणाले.
अशा प्रकारे नवीन म्हात्रे यांनी सुरेख छायाचित्रांतून जोगेश्वरी लेण्यांची सुंदर सफर घडवली. इतिहास संकलन समितीचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र तन्ना यांनी डॉ. बालमुकुंदजी पांडे यांचा परिचय करुन दिला. मनस्वी सोमण यांनी सुमधुर सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. नवीन म्हात्रे यांना प्रवीण लाडे यांनी ‘डिझाईन’ केलेले स्मृतिचिन्ह देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘व्हिजनरी स्टुडिओज्’चे तूणीर कांबळी व त्यांच्या सहकार्यांनी चित्रीकरणाचे काम सांभाळले. ‘इतिहास कट्टा’ या उपक्रमाचे प्रायोजकत्त्व जनसेवा केंद्र बोरिवली, या सामाजिक संस्थेने स्वीकारले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतिहास संकलन समिती व बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे कार्यकर्ते यांनी बरीच मेहनत केली. डॉ. सुनीता पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- डॉ. सुनीता पाटील