सोमालिया आणि ‘अल-शबाब’

17 Jan 2023 21:33:54
Somalia and Al-Shabaab

"हा ऐतिहासिक विजय आहे. आमच्या सैनिकांनी दहशतवादाचा पायाच समूळ नष्ट केला. त्यांच्या शौर्यामुळे दहशतवाद्यांच्या कब्जामध्ये असलेले हारारधेरे बंदर मुक्त झाले आहे.” असे सोमवार, दि. १६ जानेवारी रोजी सोमालियाचे पंतप्रधान हमजा अबदी बारे यांनी जाहीर केले. सरकार आणि प्रशासन आणि जनताहीआनंदित झाली. २०२३ साल तरी सोमालियासाठी दहशतवादरहीत साल असेल, असे सोमालियन जनतेला वाटले. या सगळ्यांच्या आनंदाला कारणही होते. २००६ सालापासून ‘अल-शबाब’ या दहशतवादी संघटनेने सोमालियामध्ये हिंसेचा अतिमानवी अतिरेक केला आहे.

 
सोमालियामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक सुन्नी मुसलमान आहेत. ते स्वतःला अरेबिक वंशाचे वगैरेही समजातात. देशातील सगळ्यांचा धर्म, भाषा आणि संस्कृती एकच आहे. इतकेच काय तर इतिहास आणि भूगोलही एकच आहे. मात्र, तरीही या देशात ‘अल-शबाब’सारखी दहशतवादी संघटना (पूर्ण नाव अल-शबाब अल-मुजाहिद्दीन) उग्रपणे पाय रोवून आहे.

देशाचा एक दिवस असा गेला नाही की, ‘अल-शबाब’ संघटने’ने कुठे हल्ला केला नाही की आत्मघातकी बॉम्बस्फोट केला नाही की अपहरण केले नाही, दरोडा टाकला नाही. देशात उरलेल्या मोठ्या आणि छोट्यातल्या छोट्याही व्यापार्‍याकडून खंडणी घ्यायची किंवा प्रतीसरकार बनून सोमालिया देशामध्ये वस्तूंच्या अंतर्गत खरेदीविक्रीसाठी स्वतःचा कर लादणे असे अनेक बेकायदेशीर काम करून ‘अल-शबाब’ पैसे कमवतो. देशातील सरकार उखडून टाकून इस्लामिक राज्य आणावे म्हणून म्हणे ‘अल-शबाब’ काम करते.

अमेरिकेने २००८ साली ‘अल -शबाब’ला दहशतवादी संघटना घेाषित केले. जागतिक दहशतवादाचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांंच्या मते ‘अल-शबाब’ने लष्करी शाळा उभ्या केल्या. त्यामध्ये दहा वर्षांखालील मुलांनाच प्रवेश दिला जातो. प्रवेश दिला जातो म्हणजे त्यांचे अपहरण केले जाते किंवा सक्तीने त्यांना तिथे नेले जाते. या मुलांचा बाहेरच्या दुनियेशी संपर्क तोडून टाकण्यात येतो. त्यांच्या बालमनावर जिहाद आणि त्याचे फायदे ठसवले जातात. या बालकांचा वापर पुढे आत्मघातकी हल्ले घडवण्यासाठी केला जातो, तर अशा या ‘अल-शबाब’चे मुख्य केंद्र होते ‘हारारधेरे बंदर.’हारारधेरे हे बंदर सोमालियन सैन्याने ताब्यात घेतले म्हंटल्यावर सोमालियन सरकार आणि सैन्यासाठी हा मोठा विजय होता.

मात्र, १८ तास उलटतात न उलटतात तोच सोमालियाच्या लष्करी तळावर ‘अल-शबाब’च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद संपला नाही हेच तर ‘अल-शबाब’ला जगाला दाखवायचे होते.तसे पाहायला गेले, तर गेले पाच-सहा वर्षं सोमालियामध्ये दुष्काळ पडला. दरवर्षी हजारो बालक कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. देशाला जितक्या संसाधन साधनांची गरज आहे, त्यापैकी देशाकडे तीन टक्केही साधने नाहीत. सोमालियाच्या सरकारची बरीच ऊर्जा आणि अर्थकारण दहशतवाद याविरोधी लढण्यातच संपत आहे.

बरं, ‘अल-शबाब’ हा क्रूर आहे. पण, टोकाचा अतार्किकही आहे. इतका की, या ‘अल-शबाब’ने सोमालियामध्ये समोसे या खाद्यपदार्थाच्या विक्रीला बंदी घातली. का? तर म्हणे समोशाकडे पाहून ख्रिस्ती प्रतीकांची आठवण येते. मुस्लीम सत्ताधारी देशात ख्रिस्ती प्रतीक अप्रत्यक्षही नकोत, असे ‘अल-शबाब’चे म्हणणे, दुसरीकडे ‘अल-शबाब’च्या अतिरेक्यांनी अमेरिका-केनियन लष्करी तळावरही हल्ला केला होता का? तर इस्रायलने जेरूसलेमला राजधानीचा दर्जा दिला, याचे अमेरिकेने समर्थन केले. त्यामुळे अमेरिकेला ‘अल-शबाब’ दुश्मन मानत आहे. आता प्रश्न हा येतो की, देशातील बहुसंख्य मुस्लीम जनता ही कट्टर मुस्लीम धार्मिकता पाळत असताना ‘अल-शबाब’च्या दहशतवाद्यांना आणखीन कोणते इस्लामिक राज्य आणायचे आहे?

 दुसरे असे की, सोमालियाचे ‘अल-शबाब’चे दहशतवादी आणि सोमालियाचे सामान्य मुस्लीम नागरिक यांच्यामधले ‘मुस्लीम ब्रदरहूड’ कुठे आहे? आपल्या देशातील जे लोक ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या नावाखाली पाकिस्तानचा झेंडा नाचवतात, औरंगजेबाची प्रतिमा मिरवतात,अगदी ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या नावाने ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठीही जातात, त्या लोकांनी सोमालियातील बांधवासाठी तिथे जाऊन ‘ब्रदरहूड’ दाखवावा. पण छे, हे शक्यच नाही. कारण, ‘ब्रदरहूड’च्या नावाखाली यांना भारतात केवळ अस्थिरता माजवायची असते. विषयांतर झाले, मात्र सोमालिया देशातूनच नव्हे, तर जगभरातून दहशतवाद संपायलाच हवा!






Powered By Sangraha 9.0